Bookstruck

सोन्याच्या तीन मोहरा

ग्रीस (युनान) मधल्या एका गावात यानिस नावाचा एक गरीब माणूस राहत होता. तो सकाळ-संध्याकाळ खूप कष्ट करत असे, तरीसुद्धा तो आपल्या बायको-मुलांना पुरेसे अन्न देऊ शकत नव्हता. आपल्या कुटुंबाला चांगले दिवस आले पाहिजेत असा विचार यानिसने केला. त्यासाठी त्याला आपला देश सोडून परदेशात जाणे आवश्यक होते, कारण तिथे चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होत्या. यानिसने आपल्या कुटुंबाचा निरोप घेतला आणि पुरेशी कमाई झाली की तो परत घरी येईल असे वचन दिले. दुसऱ्याच दिवशी यानिस प्रवासाला निघाला. तो तीन आठवडे चालत होता आणि शेवटी टर्कीची पूर्व राजधानी असलेल्या कॉन्स्टँटिनोपलला पोहोचला. त्या मोठ्या शहरात यानिसने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण त्याला यश मिळाले नाही. मग एक दिवस त्याला कळले की एका श्रीमंत माणसाला नोकराची खूप गरज आहे. यानिस त्या श्रीमंत माणसाला भेटायला गेला. त्या वृद्ध श्रीमंताला यानिस खूप आवडला आणि त्याने त्याला लगेच कामावर ठेवून घेतले. यानिसने अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपल्या मालकाची सेवा केली. मालकाने यानिसचा पगार स्वतःकडेच ठेवला आणि सांगितले की, एक दिवस तो सगळा पगार एकदम देईल. अशा तऱ्हेने दहा वर्षे निघून गेली. यानिसला आपल्या कुटुंबाची आठवण येऊ लागली, म्हणून त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. मालक म्हणाला, "यानिस, तू माझी खूप काळजी घेतली आहेस. हे घे तुझ्या दहा वर्षांच्या कमाईच्या सोन्याच्या तीन मोहरा". दहा वर्षे नोकरी करून इतके कमी पैसे मिळाल्याचे पाहून यानिसचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. पण तो काहीच करू शकत नव्हता. त्याने त्या मोहरा घेतल्या आणि तो निघू लागला. जसा यानिस जायला निघाला, तसे मालकाने त्याला परत बोलावले आणि सांगितले, "जर तू मला सोन्याची एक मोहर परत केलीस, तर मी तुला एक खूप उपयोगाचा सल्ला देईन". यानिसने एक मोहर परत केली. मालकाने पहिला सल्ला दिला: "ज्या गोष्टीशी तुझा काही संबंध नाही, त्याबद्दल कधीही चौकशी करू नकोस". त्यानंतर मालकाने दुसरी मोहर मागून दुसरा सल्ला दिला: "एकदा एक रस्ता निवडला की तो सोडू नकोस". शेवटी तिसरी मोहर घेऊन मालकाने तिसरा सल्ला दिला: "रात्री तुला जर राग आला, तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो दाबून ठेव". आता यानिसच्या खिशात दहा वर्षांच्या मेहनतीची एक कवडीही उरली नव्हती. काही वेळ प्रवास केल्यानंतर यानिसला एका झाडावर एक माणूस बसलेला दिसला, जो झाडाच्या पानांना सोन्याच्या मोहरा चिकटवत होता. हे दृश्य अत्यंत विचित्र होते, पण यानिसला मालकाचा पहिला सल्ला आठवला. त्याने काहीच न विचारता पुढे जाणे पसंत केले. हे पाहून तो माणूस खुश झाला आणि म्हणाला, "आजपर्यंत येथून जाणाऱ्या प्रत्येकाने मला प्रश्न विचारून त्रास दिला, पण तू मात्र तुझ्या कामाशी काम ठेवलेस". बक्षीस म्हणून त्या माणसाने झाड हलवले आणि सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडू लागला. यानिसने आपल्या पिशव्या आणि खिसे मोहरांनी भरून घेतले. पुढे प्रवासात त्याला तीन खेचर मालक भेटले जे एकाच दिशेने चालले होते. वाटेत एक धर्मशाळा दिसली. खेचर मालक तिथे थांबायला गेले, पण यानिसला मालकाचा दुसरा सल्ला आठवला: "पकडलेला रस्ता सोडू नकोस". तो बाहेरच थांबला. अचानक मोठा भूकंप झाला आणि ती धर्मशाळा कोसळून आतले सर्व लोक गाडले गेले. यानिस पुन्हा एकदा आपल्या मालकाच्या सल्ल्यामुळे वाचला होता. तो त्या खेचरांना घेऊन आपल्या गावी पोहोचला. रात्रीच्या वेळी तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या बायकोने त्याला ओळखले नाही. त्यानेही आपली ओळख न सांगता बाहेरच्या शेडमध्ये राहण्याची परवानगी मागितली. अचानक त्याला एक तरुण पुरुष घरात शिरताना दिसला. हे पाहून यानिसला प्रचंड राग आला. त्याला वाटले त्याच्या बायकोने दुसरे लग्न केले आहे. त्याने रागाच्या भरात बंदूक काढली, पण तेव्हाच त्याला तिसरा सल्ला आठवला: "सकाळपर्यंत राग दाबून ठेव". सकाळी तो तरुण बाहेर आला आणि आपल्या आईला म्हणाला, "आई, मी आता कामाला जातो". यानिसच्या लक्षात आले की तो तरुण दुसरा कोणी नसून त्याचा स्वतःचा मुलगा होता, जो दहा वर्षांत मोठा झाला होता. यानिसने आनंदाने आपल्या मुलाला मिठी मारली आणि कुटुंबाची भेट घेतली. त्याने आणलेल्या सोन्याच्या मोहरांमुळे त्यांच्या कुटुंबाला पुन्हा कधीही कशाचीही कमतरता भासली नाही.