Bookstruck

सुलक्षणी

कुंतलदेशाचा राजा रविवर्मा याच्या दरबारी खजिनदाराची जागा रिकामी होती. राजा योग्य व्यक्तीच्या शोधात होता, तेव्हा राणीने आपल्या लहान भावाची तारीफ करीत सांगितले— "ही गोष्ट पैशाची आहे, तेव्हा दुसऱ्या बाहेरच्या माणसाला ठेवण्यापेक्षा आपलाच माणूस तिथे ठेवला तर अधिक विश्वासपात्र होईल." पण राजाला ही गोष्ट बिलकुल आवडली नाही. कारण खजिन्यातील धन काही कारणाने कमी-जास्त झाले तर निष्कारण आपल्या मेव्हण्याबरोबरच वैर निर्माण व्हायला कारण होईल. तेव्हा राजाने उत्तर दिले— "चांगलीच गोष्ट आहे, पण मी विचार करून सांगतो!" दुसऱ्या दिवशी सेनापतीने राजासमोर एक प्रश्न विचारला— "महाराज, माझा छोटा भाऊ शिकलेला आहे. परंतु युद्धकलेत तो प्राविण्य मिळवू शकला नाही. त्याला खजिनदाराची नोकरी दिलीत तर मी सेनापती व भाऊ खजिनदार होऊ आणि आपली सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळेल." परंतु राजाला तेही योग्य वाटले नाही. मोठा भाऊ सेनापती व लहान भाऊ खजिनदार बनल्यावर त्यांचेच वर्चस्व वाढेल. त्याच वेळेस विष्णुशर्मा नावाच्या तरुणाने राजाची भेट घेतली व आपला विचार प्रकट केला— "महाराज, मी गणितशास्त्रात प्राविण्य संपादन केले आहे. तेव्हा माझी योग्य ती परीक्षा घेऊन मला आपल्या पदरी खजिनदाराची जागा द्या." राजाने विष्णुशर्माची अनेक तऱ्हेने परीक्षा घेतली व त्याच्या उत्तरांवर संतुष्ट होऊन त्याला खजिनदाराच्या जागी नेमले. परंतु ही नेमणूक राणीच्या व सेनापतीच्या रागाला कारणीभूत झाली. थोड्या दिवसांनी राणीने राजाला विचारले— "आपण विष्णुशर्माला मोठा हुशार व इमानदार समजून खजिनदाराच्या जागी नेमले आहे. तो एक नंबरचा चोरटा आहे. माझी आताच खात्री झाली की, थोड्या वेळापूर्वीच नोकरीच्या शोधात आलेल्या एका माणसाकडून त्याने एक हजार नाणी चोरून घेतली. घरी जाताना तो ती घेऊन जाईल, तरी आपण वेळ न दवडता ताबडतोब खजिन्यात जाऊन हिशोब पाहावा. तो आपल्याला एक हजार नाणी जास्त असलेली दिसतील." राजाने ताबडतोब खजिन्यात जाऊन हिशोब पाहिला. परंतु तो अगदी बरोबर होता. एकही नाणे जास्त नव्हते. विष्णुशर्माची पण झडती घेतली, तेव्हा त्याच्याजवळ काहीही सापडले नाही. आपली झडती घेतलेली पाहून विष्णुशर्माला जरा आश्चर्यच वाटले. पण राजाने त्याच्यावर संतुष्ट होत सांगितले की, "तुझ्या झडतीचे कारण तुला मागाहून सांगण्यात येईल." राणीने आपल्या सखीकडून बातमी मागवली, परंतु कोणत्याही गोष्टीचा उलगडा लागला नाही. असे काय झाले हे राणीलाच कळेना. कारण राणीने आपल्या एका दासीला खजिन्यात एक हजार नाण्यांची थैली गुपचूप ठेवून येण्यास सांगितले होते. तेव्हा ती एक हजार नाणी गेली कोठे? त्याचप्रमाणे सेनापतीनेही एका विश्वासू नोकराकरवी खजिन्यातून एक हजार नाणी चोरून नेली होती. तेव्हा सेनापतीच्या मनात भलतीच शंका येऊ लागली. कारण त्याच्या चोरण्याने खजिन्यातील एक हजार नाणी कमी व्हायला पाहिजे होती. ती नाणी कमी कशी झाली नाहीत? अशा तऱ्हेने दोघांनी ईर्ष्येने एका चांगल्या नीतिवान माणसाला वाईट ठरवण्याचे योजले, परंतु ती योजना परस्परांकडूनच फसली. त्यांना ती गोष्ट उघड न करता गप्प बसावे लागले. जसे चोरी करण्याकरिता भोक पाडायला गेलेला चोर भोकातून विंचू चावला तरी गप्पच बसतो, तसे.