सीता आणि नदी - रस्किन बाँड
एक मोठी नदी होती. डोंगरातून उगम पावलेली, सागराला जाऊन मिळणारी. त्या नदीत एक छोटंसं बेट होतं. नदी त्या बेटाच्या चहूबाजूंनी वाहात असे. काही ठिकाणी त्याच्या काठांना ओरखडे काढीत असे. पण कधीही त्या बेटावरून वाहात नसे. त्या बेटावर एक लहानशी झोपडी होती. मातीच्या भिंती व झाकारलेलं छप्पर. झोपडी एका मोठ्या खडकावर बांधलेली होती. त्यामुळे झोपडीच्या एका बाजूला खडकाची भिंत होती व बाकीच्या तीनच भिंती फक्त मातीच्या होत्या.
बेटावर वाढणाऱ्या हिरवळीवर काही शेळ्या चरत असायच्या. त्यांच्या पाठोपाठ कोंबड्या धावत असायच्या. एकीकडे काकडी, खरबूज, कलिंगड, कोहळे वगैरे लावलेले होते, तर दुसरीकडे इतर भाजीपाला लावलेला होता.
बेटाच्या मध्यभागी एक पिंपळाचं मोठं झाड होतं. खूप जुनं झाड होतं ते. बऱ्याच वर्षांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे एक बी कुठून तरी बेटावर येऊन पडलं आणि दोन खडकांच्या फटीत त्याला आसरा मिळाला. तिथेच ते रुजलं आणि एका छोट्या कुटुंबाला सावली व निवारा देण्यासाठी वाढलं.
आजोबा मासे धरायचं जाळं दुरुस्त करीत होते. गेली दहा वर्षे ते नदीत मासे धरायचं काम करीत होते व निष्णात कोळी होते. लहान चंदेरी चिलवा मासे, सुंदर मोठाले महसीर मासे व लांब मिशांचे शिंगाडा मासे कुठे पकडायचे ते त्यांना नेमकं ठाऊक होतं. पाणी कुठे खोल आहे व कुठे उथळ आहे, तसंच कोणतं आमिष गळाला लावायचं, कोणत्या माशांना किडे आवडतात व कोणत्या माशांना चणे आवडतात तेही त्यांना माहीत होतं. त्यांनी आपल्या मुलालाही मासे धरायला शिकवलं होतं. पण तो शंभर मैलांवर असलेल्या शहरातील एका कारखान्यात नोकरी करायला निघून गेला होता. आजोबांना नातू नव्हता पण एक नात होती. तिचं नाव सीता. मुलांची सर्व कामं तिला येत. फार काय ती कित्येक वेळा मुलांपेक्षा जास्त चांगलं काम करायची. ती लहान असतानाच तिची आई देवाघरी गेली होती. मुलींना यायला हवीत ती सर्व कामं आजीने तिला शिकवली होती. पण आजोबा, आजी, कुणालाच लिहिता वाचता येत नव्हतं. परिणामी सीतालाही लिहिता वाचता काहीच येत नव्हतं.
नदीपलीकडच्या एका गावात शाळा होती. पण सीतेनं ती कधी पाहिली नव्हती. बेटावरच करण्यासारखं काम खूप होतं.
आजोबा जाळं दुरुस्त करीत असताना सीता आत झोपडीत होती. आजीला ताप चढला होता. सीता आजीचं डोकं दाबीत बसली होती. गेले तीन दिवस आजी आजारी होती. तिने काहीसुद्धा खाल्लं नव्हतं. पूर्वीही ती आजारी पडली होती, पण इतकी आजारी कधी पडली नव्हती.
पावसाळी ढगांनी आभाळ भरून आलं होतं. रात्रभर पाऊस पडत होता आणि थोड्याच वेळात तो परत पडू लागणार अशी चिन्हं दिसत होती. या वर्षी पाऊस नेहमीपेक्षा लवकर सुरू झाला होता. जूनच्या अखेरीलाच आला होता. आता जुलै संपत आला होता. नदीला पूर आलेला होता. तिचा राँरावणारा आवाज अगदी जवळून ऐकू येत होता. तो नेहमीपेक्षा जास्त थरकाप उडवणारा होता.
सीता आजोबांपाशी गेली. पिंपळाच्या झाडाखाली त्यांच्यापाशी बसली.
“भूक लागली म्हणजे मला सांगा हं आजोबा,” ती म्हणाली, “मी लगेच भाकऱ्या करीन.”
“तुझी आजी झोपली आहे का?”
“हो, झोपली आहे, पण आता जागी होईल, कारण तिला खूप दुखतंय.”
म्हाताऱ्याने नदीपलीकडे नजर लावली. दाट हिरव्या रानाकडे, काळपट आभाळाकडे पाहात तो म्हणाला, “उद्या जर तिला बरं वाटलं नाही तर मी तिला नदीपलीकडे शाहगंजच्या इस्पितळात घेऊन जाईन. तिच्यावर काय उपचार करायचे ते त्यांना कळेल. काही दिवस तुला एकटीला राहावं लागेल.”
सीतेने गंभीरपणे मान हलवली. आजी लवकर बरी व्हावी असं तिला मनापासून वाटत होतं. तिला ठाऊक होतं की पाण्याचा प्रवाह इतका जोरदार असताना लहानशी नाव नदीपलीकडे न्यायचं कसब फक्त तिच्या आजोबांच्या अंगी होतं. जे काही तुटपुंजं सामान होतं ते बघायला कुणीतरी घरी राहायला हवं होतं.
सीतेला एकटं राहायची भीती वाटत नव्हती, पण नदीचं हे रौद्र स्वरूप तिला नकोसं वाटत होतं. त्या दिवशी सकाळी ती नदीवर पाणी आणायला गेली असताना तिला पाण्याची पातळी वाढलेली दिसली होती. पाणपक्ष्यांनी टाकलेल्या शिटेने भरून जाणारे खडक त्या दिवशी अचानक दिसेनासे झाले होते.
“आजोबा, नदीचं पाणी आणखी वाढलं तर मी काय करायचं?”
“तू आणखी उंच जागी जायचं.”
“समजा पाणी त्या उंच जागीही पोहोचलं तर?”
“तर कोंबड्यांना झोपडीत नेऊन तू देखील झोपडीतच राहा.”
“आणि समजा पाणी झोपडीत आलं तर?”
“तर मग पिंपळाच्या झाडावर चढून बैस. हे झाड चांगलं मजबूत आहे. ते कधी पडणार नाही. शिवाय पाणी काही इतकं वर येणार नाही.”
“आणि शेळ्यांचं काय, आजोबा?”
“मी त्यांना माझ्याबरोबर नेईन, सीता. आजीच्या पथ्याचा आणि औषधाचा खर्च भागवायला त्या विकाव्या लागतील. कोंबड्यांविषयी म्हणशील तर असं कर की तशी वेळच आली तर त्यांना छपरावर ठेव. पण फार काळजी करू नकोस.” त्यांनी सीतेच्या मस्तकावर थोपटलं, “पाणी इतकं वर नाही येणार.”
संध्याकाळी पुन्हा पाऊस पडू लागला. मोठमोठाले थेंब नदीच्या पृष्ठभागावर आघात करू लागले. पण तो साधा पाऊस होता व सीतेला त्या पावसात इकडेतिकडे जाता येत होतं. भिजायची तिला काळजी नव्हती. उलट तिला ते आवडत होतं. झोपडीत आत खूप गरम होतं आणि स्वयंपाकघरातल्या चुलीजवळच्या उष्णतेने तिचे पातळ कपडे सहज वाळून जाण्यासारखे होते.
झोपडीमागच्या खुराड्यात कोंबड्यांना घालण्यासाठी ती पावसात त्यांच्यामागून धावत होती. तपकिरी रंगाच्या एक निरुपद्रवी सापाच्या बिळात पुराचं पाणी शिरलं होतं म्हणून तो उघड्यावर मैदानात आला होता. सीतेने एक काठी उचलली. तिच्या टोकाने तो साप उचलला आणि दूर खडकांमध्ये भिरकावून दिला. तिचा सापांवर मुळीच राग नव्हता. ते उंदीर व बेडूक खातात आणि त्यांची फार वाढ होऊ देत नाहीत.
अखेर सीता आत झोपडीत गेली. तिला सपाटून भूक लागली होती. तिने चणे खाल्ले व शेळीचं थोडं दूध गरम करून घेतलं. आजी एकदा जागी झाली. तिने पाणी मागितलं होतं आणि आजोबांनी पेला तिच्या ओठांशी धरला होता. रात्रभर पाऊस कोसळत राहिला. छपरामधून पाणी गळू लागलं व झोपडीत जमिनीवर पाण्याचं एक छोटंसं तळं तयार झालं. आजोबांनी कंदील लावून ठेवला. उजेडाची तशी जरूर नव्हती, पण उजेडामुळे काहीसं सुरक्षित वाटत होतं.
नदीच्या पाण्याचा आवाज नेहमीच यायचा आणि त्याकडे त्यांचं लक्ष क्वचितच कधी जायचं. पण त्या रात्री मात्र त्या आवाजात बदल झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. वाऱ्याने झाडांच्या शेंड्यांचा सळसळाट व्हावा तशा प्रकारचा खळबळाट त्या आवाजात होता. पाणी खडकावर आदळून दगडगोटे वाहून नेऊ लागलं की खळखळाटाचा आवाज येत होता. काही वेळा जमिनीचा एखादा कच्चा तुकडा पाण्यात कोसळला की गडगडाटाचा आवाज कानावर येत होता.
सीतेला झोप लागली नाही. झुंजूंमुंजूं होताच ती उठली. बाहेर आली. पावसाचा जोर कमी झाला होता. आता त्याची झिमझिम चालू होती. पावसाची ही झिमझिम कित्येक दिवस चालण्यासारखी होती. यावरून एक तर्क करता येत होता की नदी जिथे उगम पावते त्या डोंगरांमध्ये जोरदार पाऊस पडत असावा.
सीता पाण्याच्या काठाशी गेली. तिचा आवडता खडक तिला कुठे दिसेना. ती नेहमी त्या खडकावर बसून मजेत पाण्यात पाय हलवायची. लहान चिलवांचा पळवापळवीचा खेळ बघायची. तो खडक तिथेच होता यात शंका नाही, पण पाणी त्यावरून वाहात होतं. ती वाट पाहत उभी राहिली. पाणी पुढे येत असल्याचं व खळबळत असल्याचं तिला पायांखाली जाणवलं.
सूर्य नुकताच वर येऊ लागला होता. आजोबांनी नाव पाण्यात घातली. आजी आत निजली. ती सीतेकडे टक लावून बघत होती. सीतेशी बोलायचा प्रयत्न करीत होती, पण शब्दच उमटत नव्हते. तिने नुसता सीतेला आशीर्वाद देण्याकरता हात उचलला.
सीता खाली वाकली. तिने वाकून आजीच्या पायांना नमस्कार केला. आजोबांनी नाव हाकारली. लहानशी नाव, त्यात दोन म्हातारी माणसं व तीन शेळ्या - पाण्यावरून सरसरत पलीकडच्या तीराकडे जाऊ लागली. नाव थोडा वेळ पाण्यावर लटलटत राहिली. मग हळूहळू लहान लहान होत गेली. अखेर त्या विस्तीर्ण पात्रावर तिचा एक ठिपका फक्त दिसत राहिला.
सीता आता अगदी एकटी उरली होती. वारा वाहात होता, पावसाच्या थेंबांचा मारा तिच्या तोंडावर होत होता. बेटाजवळून नदीच्या पाण्याचा जोरदार प्रवाह वाहात होता. दूर नदीचा काठ पावसामुळे अस्पष्ट दिसत होता. तिची लहानशी झोपडी होती, पिंपळाचं झाड होतं.
सीता कामाला लागली. कोंबड्यांना दाणे टाकायचे होते. त्यांना दाण्याखेरीज दुसरी कसली काळजी नव्हती. तिने त्यांना मुठभर दाणे, बटाट्याखेरीज साली व शेंगांची टरफलं टाकली. मग केरसुणी घेऊन तिने झोपडी झाडून काढली. चूल पेटवली, दूध तापवले. तिच्या मनात आलं, 'उद्या काही दूध मिळायचं नाही.'
डोंगरावरून गडगडाटाचा आवाज आला - धडाड धुडुम! सीतेला फार वेळ आत बसवेना. ती बाहेर आली. नदीपलीकडे तिने न्याहाळून पाहिलं. नदी खूपच फुगलेली दिसत होती. काठ ओलांडून ती सपाट जमिनीवर पसरली होती. दूर तिकडे लोकांच्या शेतात पाणी शिरलं होतं. त्यातून वाट काढीत लोक आपापली गुरं हाकून नेत होते. त्यांच्या किडुकमिडुक सामानाची बोचकी त्यांच्या खांद्यांवर व डोक्यांवर होती. घरदार सोडून ते उंच जागी चालले होते.
सर्वत्र पाणीच पाणी होतं. जग म्हणजे विशाल नदी झालं होतं. नदीच्या काठावरील रानातील झाडं पाण्यात उगवल्यासारखी वाटत होती. जणू पाणवनस्पतीच! सीतेची धास्ती खरी ठरली. थोड्याच वेळात तिला लाकडाचे ओंडके, लहान झाडं, झुडपं आणि मग एक लाकडी खाट बेटाजवळून वाहात जाताना दिसली. स्वतःकरता स्वयंपाक करायचं तिने ठरवलं. बाहेर बघितलं. खडकांमध्ये तिला पाण्याची तळी साचलेली दिसली. ते पावसाचं पाणी होतं की नदीच्या पुराचं पाणी होतं हे तिला समजेना.
एक कल्पना तिच्या डोक्यात आली. खोलीच्या एका कोपऱ्यात पत्र्याची एक मोठी पेटी होती. ती सीतेच्या आईची होती. त्या पेटीत सर्व उपयोगी किंवा मौल्यवान वस्तू भरून तिला वजनदार करून टाकायचं, म्हणजे ती वाहून जाणार नाही... समजा पुराचं पाणी बेटावर आलंच तर... सीता कामाला लागली. आजोबांचा हुक्का पेटीत गेला. आजीची हातात धरायची काठीही आत गेली. त्याचप्रमाणे धान्याचे व मसाल्याचे अनेक लहान लहान डबेही पेटीत गेले. सीतेला जरी काही तास झाडावर घालवायला लागले तरी परत खाली उतरल्यावर तिला काहीतरी खायला मिळायची सोय झाली.
सामानसुमान पेटीत भरण्याच्या नादात पायाला स्पर्श करणाऱ्या थंडगार पाण्याकडे सीतेचं लक्षच गेलं नाही. तिने पेटीला कुलूप लावलं आणि दगडी भिंतीच्या एका उंच कोनाड्यात किल्ली ठेवून दिली. आता कुठे तिचं लक्ष गेलं की पाणी आत झोपडीत शिरलंय आणि आपण मघापासून पाण्यात वावरतोय.... तिला जे काही दिसलं त्याने ती घाबरून निःस्तब्ध झाली. पाणी अगदी दाराजवळून वाहात होतं, खोलीत घुसत होतं. सीता बाकीचं सगळं विसरली. तीरासारखी ती झोपडीबाहेर धावली. आसऱ्यासाठी घोट्याएवढ्या पाण्यातून संपासप पाय उचलीत पिंपळाच्या झाडाकडे धावत सुटली. पिंपळाच्या झाडाची ती ओळखीची खूण नसती तर सीता खोल पाण्यात पडली असती. मग पुरात नुसते हातपाय झाडत राहिली असती.
सीता झाडाच्या मजबूत फांद्यांवर सरसर चढली. नीट बसता येईल अशा एका फांदीवर बसली. मग डोळ्यांवर आलेले केस तिने बाजूला केले. आपण घाई केली ते छान झालं असं तिला वाटलं. झोपडीला एव्हाना पाण्याचा वेढा पडला होता. बेटावरचे उंचवटे फक्त अजून दिसत होते. काही खडक, झोपडी ज्यावर बांधलेली होती तो मोठा खडक व थोडीशी झाडी वाढलेलं टेकाड. बस- इतकंच फक्त!
कोंबड्यांना झोपडी सोडायची गरज वाटली असावी. त्या बहुधा लाकडी खाटेवर उंच चढून बसल्या असाव्यात. पाण्यावरून अनेक विलक्षण वस्तू वाहात चालल्या होत्या. ॲल्युमिनियमची किटली, वेताची खुर्ची, दात घासायच्या पावडरीचा डबा, सिगारेटचं रिकामं पाकीट, लाकडी खडावा, प्लॅस्टिकची बाहुली...
पाणी आणखी चढलं होतं. बेट झपाट्यानं अदृश्य होत चाललं होतं. झोपडीतून काहीतरी बाहेर आलं. तो घासलेटचा एक रिकामा डबा होता, एक कोंबडी त्याच्यावर बसली होती. पाण्यावर हिंदकळत डबा झाडाजवळ आला. मग प्रवाहात सापडून नदीत वाहून गेला. कोंबडी मात्र त्याच्यावर कशीबशी तग धरून बसून राहिली. थोड्या वेळाने पाणी खाटेपर्यंत पोचलं असावं कारण बाकीच्या कोंबड्या खडकाच्या वरच्या कंगोऱ्यावर चढून एकमेकींना खेटून दाटीवाटीने बसल्या.
सीता आणखी वरच्या बाजूला चढली. त्याचवेळी एक काळकुट्ट रानकावळा वरच्या फांद्यांवर येऊन बसला. त्या फांद्यांमागे एक घरटं असल्याचं सीतेला दिसलं. फांद्यांच्या बेळक्यात काटक्याकुटक्यांनी बांधलेलं कावळ्याचं घरटं. घरट्यात करड्या रंगाची ठिपकेदार चार अंडी होती. कावळा त्या अंड्यांवर बसला व केविलवाणेपणाने काव काव ओरडू लागला. पण कावळा जरी दु:खी असला तरी सीतेला मात्र तो तिथे असल्यानं जरा बरं वाटलं. निदान आता ती एकटी नव्हती. कुणीही सोबतीला नसल्यापेक्षा कावळा असलेला बरा.
झोपडीतून आणखीही काही वस्तू वाहात बाहेर आल्या - मोठा भोपळा आणि आजोबांचा लाल फेटा. फेटा उलगडून मोठ्या सापासारखा पाण्यावर तरंगू लागला. वादळवाऱ्याने, पावसाने झाड गदगदू लागलं. कावळा ओरडू लागला आणि वर उडाला. झाडाभोवती काही गिरक्या घेऊन तो पुन्हा घरट्यात परतला. सीतेने तिची फांदी घट्ट धरून ठेवली. झाड समूळ हादरलं. भूकंप झाल्यासारखं सीतेला वाटलं. पाणी आता तिच्या चहूबाजूंना गरगर फिरत होतं. झोपडीच्या छपरापर्यंत ते चढलं होतं. लवकरच मातीच्या भिंती कोसळतील व नाहीशा होतील. एक मोठा खडक व दूरवरची काही झाडं वगळता नजर पोचेल तिथपर्यंत नुसतं पाणीच पाणी दिसत होतं.
उंच, जुनं पिंपळाचं झाड करकरू लागलं. त्याच्या लांब, खोल मुळांनी जमिनीला घट्ट धरून ठेवलेलं होतं. पण जमीन सुटू लागली होती. दगड वाहून गेले होते. मुळांची पकड सैल होऊ लागली होती. काहीतरी भलतंच घडणार असल्याची चाहूल कावळ्याला लागली असावी, कारण तो झाडाभोवती घिरट्या घालीत उडत होता. झाडावर बसायची त्याची तयारी नव्हती, पण घरटं सोडून जायलाही तो तयार नव्हता.
सीतेचे ओले कपडे तिच्या काटककुळ्या शरीराला घट्ट चिकटून बसले. तिच्या काळ्याभोर लांबसडक केसांवरून पाण्याचे ओहोळ वाहू लागले. झाडाच्या प्रत्येक पानाव्रून पावसाचं पाणी गळू लागलं. कावळाही खूप भिजला होता व कुडकुडत होता.
झाड कुरकुरलं. पुन्हा गदगदलं. खाली खूपशी माती उखणली. झाड सरकलं, एकीकडे कलंडलं. हलकेच पुढे डळमळू लागलं. आजूबाजूला झुकू लागलं. जमिनीत रुतलेली मुळं बाहेर खेचू लागलं. अखेर ते पाण्याच्या मुख्य प्रवाहात ढकललं गेलं.
सीतेच्या आजूबाजूच्या फांद्या जोरजोरात हलत होत्या. पण तिने फांदीवरची आपली पकड सैल होऊ दिली नाही. पाणी आता खूपच जवळ होतं. ती भेदरली होती. पुराचं पाणी कुठवर पसरलं आहे किंवा नदीचं पात्र किती रुंदावलं आहे ते काहीच तिला दिसत नव्हतं. तिला फक्त तिच्या आजूबाजूला असलेल्या पाण्याचा धोका दिसत होता. कावळा झाडाभोवती घिरट्या घालीत राहिला. तो भयंकर चिडलेला होता. त्याचं घरटं अजूनही फांद्यांमध्ये होतं. पण फार वेळ नव्हे. झाड कललं, एका बाजूला थोडं वाकडं तिकडं झालं आणि घरटं पाण्यात पडल्याचं सीतेला दिसलं...
कावळा खाली येऊन पाण्याच्या अगदी जवळून उडू लागला. पण त्याला काहीच करता येण्यासारखं नव्हतं. बघता बघता घरटं दिसेनासं झालं. सीता पुन्हा एकटी पडली. पण एकलेपणा वाटायची ती वेळ नव्हती. प्रत्येक गोष्टीला गती होती. वर खाली, दोन्ही बाजूंना आणि पुढे. ‘थोड्याच वेळात’..., तिच्या मनात आलं, ‘झाड उलथेल आणि मी पाण्यात पडेल.’
दूरवर तिला एक पूरग्रस्त गाव दिसलं. लोक तराफ्यावरून चालले होते. पण ते खूप लांब होते. झाड खूप मोठं असल्याने नदीतून झपाट्याने वाहात चाललं नव्हतं. कधी कधी उथळ पाण्यात पोचलं की ते थांबत होतं. त्याची मुळं खडकात अडकत होती, पण ते थोडा वेळच. पाण्याची एक लाट येऊन त्याला पुढे ढकलत होती. एके ठिकाणी नदी जिथे वळण घेत होती, तिथे झाड काठाच्या रेतीत रुतलं व तिथेच थांबलं.
सीता खूप दमली होती. तिचे हात दुखत होते. अंगातलं त्राण कमी झालं होतं. झाड एका बाजूला कलंडलं होतं. खाली पडू नये म्हणून सीतेला फांदी घट्ट धरून ठेवावी लागत होती. पाऊस अजूनही पडतच होता. मग सीतेच्या कानावर कुणाच्या तरी हाका आल्या. मान उंचावून तिने पाण्याच्या वरच्या बाजूला पाहिलं. एक लहानशी नाव आपल्याकडे येत असल्याचं तिला दिसलं.
नावेत एक मुलगा बसला होता. त्याने नाव झाडापाशी वल्हवीत आणली. मग स्वतःचा तोल सावरण्यासाठी त्याने एका हाताने एक फांदी पकडली व दुसरा मोकळा हात सीतेपुढे केला. सीतेने त्याचा हात पकडला आणि ती नावेत चढली. त्याने झाडाच्या बुंध्याला पायाने रेटा दिला व नाव पाण्यात ढकलली. ती लहानशी नाव झरझर पाणी कापीत पुढे जाऊ लागली. ते मोठं झाड मागे पडलं. सीतेला आता ते झाड कधीच दिसणार नव्हतं. भयंकर घाबरल्याने सीतेच्या तोंडून शब्द फुटेना. ती मुकाट्याने नावेत पडून राहिली. त्या मुलाने सीतेकडे पाहिलं पण काही बोलला नाही. फार काय त्याने साधं स्मितसुद्धा केलं नाही.
मध्यावर पोचून वाहून जाऊ नये म्हणून तो आपली दोन लहानशी वल्ही सफाईने सारखी मारत राहिला. जोरदार प्रवाहातून नाव बाहेर काढण्याइतकं बळ त्याच्या अंगी नव्हतं. पण तो प्रयत्न करीत राहिला. “तू बेटावर राहतेस?” अखेर त्याने विचारलं. वल्ही मारायचं थांबवून नाव त्याने तशीच जरा पुढे जाऊ दिली. कारण एव्हाना तो नदीच्या एका शांत व पसरट जागी पोचला होता. “मी तुला काही वेळा पाहिलं आहे. पण बाकीचे लोक कुठे आहेत?”
“माझी आजी आजारी होती.” सीता उत्तरली, “आजोबा तिला शाहगंजच्या इस्पितळात घेऊन गेलेत.”
“तू कुठून आलास?” सीतेने विचारलं. कारण तिने त्या मुलाला यापूर्वी कधीच पाहिलेलं नव्हतं.
“डोंगराच्या पायथ्याच्या एका गावातून. मी नावेत होतो. गावात पूर आल्याची बातमी देण्यासाठी मी नावेतून नदी पार करायचा प्रयत्न करीत होतो. पण प्रवाह खूप जोरदार होता. मी तुझ्या बेटाजवळून वाहात गेलो. आपण नदीशी लढू शकत नाही. ती नेईल तिथं जात राहावं हे उत्तम.”
त्याने एक वल्हं आत ठेवलं आणि त्या मोकळ्या झालेल्या हाताने बसायच्या जागेखाली चाचपडलं. तिथे एक टोपली होती. त्याने दोन आंबे काढले. एक सीतेला दिला. त्या पिकलेल्या रसाळ आंब्याची साल त्यांना दातांनी सोलून काढता आली आणि एक मोठा तुकडा तोडण्यासाठी आंब्याला खोलवर दात लावले. गोड रस त्यांच्या हनुवटीवर ओघळला. फळाला मधुर सुवास होता. वर्ष होऊन गेलं होतं, सीतेला आंबा चाखायला मिळाला नव्हता. काही क्षण तिला नदीचा विसर पडला. तिला आंब्याशिवाय दुसरं काही सुचेना.
नाव पुढे जात राहिली पण फार जोराने नव्हे. कारण ते जसे डोंगराच्या पायथ्यापासून आणखी पुढे गेले तसा नदीचा प्रकोप व तिचा जोर खूपच कमी झाला.
“माझं नाव आहे किसन,” तो मुलगा म्हणाला.
“माझ्या बाबांपाशी खूप गाई-म्हशी आहेत. त्यापैकी कित्येक पुरात वाहून गेल्या.”
“तू शाळेत जातोस वाटतं?” सीता म्हणाली.
“हो, मी शाळेत जातो. आमच्या गावापासून जवळच एक शाळा आहे. तू पण शाळेत जातेस?”
“नाही. घरी खूप कामं असतात.”
घराची कल्पना करण्यात आता अर्थ नव्हता, कारण आता तिथे घर नसणार.
“झाडांपाशी पोचायचा मी प्रयत्न करतो.” मुलगा म्हणाला, “म्हणजे आपल्याला पाण्यावर रात्र काढायला नको.”
तो झाडांच्या दिशेने नाव वल्हवू लागला. दहा मिनिटं सपासप वल्ही मारल्यावर तो नदीच्या एका वळणापाशी पोचला आणि मुख्य प्रवाहाच्या धारेपासून बचावण्यात यशस्वी झाला. थोड्याच वेळाने ते एका रानात पोचले. उंच हिरव्यागार झाडांमधून वल्हवीत चालले होते.
“यांपैकी एका झाडाला आपण आपली नाव बांधू या.” किसन म्हणाला. “मग आपल्याला विश्रांती घेता येईल. उद्या आपण रानातून वाट शोधून काढू या.”
नावेच्या तळांतून त्याने एक दोर बाहेर काढला. दोराचं एक टोक नावेला बांधलं आणि दुसरं टोक झाडाच्या एका मजबूत फांदीवर फेकलं. ती फांदी खूपच खाली वाकलेली होती. पाण्याच्या वर थोड्याच अंतरावर होती. नाव झाडाच्या बुंध्यापाशी जाऊन स्थिरावली.
रानात राहणारे सगळे प्राणी त्या रात्री बाहेर पडले होते. पुराचं पाणी शिरल्याने सर्व प्राणी त्यांच्या गुहांतून, बिळांतून, कपारीमधून बाहेर पडून निवारा व कोरडी जागा शोधत होते. सीता व किसनला एक मोठा साप पाण्यावरून वाहून येताना दिसला. तो नावेत शिरतो की काय याची सीतेला भीती वाटली. पण तो पुढे निघून गेला. त्याचं डोकं पाण्यावर दिसत होतं व लांबलचक अंग त्यामागे घरंगळत चाललं होतं. अखेर तो अंधारात दिसेनासा झाला.
एक मोठा काळवीट पाणी कापीत आला. त्याला पोहावं लागत नव्हतं. तो इतका उंच होता की त्याचे खांदे व डोकं आपोआपच पाण्याच्या वर राहात होतं. त्याची शिंगं मोठी व सुरेख होती.
“आणखीही प्राणी असतील.” सीता म्हणाली.
“एखादा वाघही असेल. आपण झाडावर चढायचं का?”
“नावेतच आपण सुरक्षित आहोत.” किसन म्हणाला. “नीज तू, मी पहारा करतो.”
सीतेने नावेत हातपाय ताणून दिले व डोळे मिटले. नावेच्या दोन्ही बाजूंवर आपटणाऱ्या पाण्याच्या आवाजाने अंगाईचं काम केलं. सीतेला झोप लागली. एक विचित्र पक्षी तिच्या डोक्यावरून ओरडत गेला. तशी ती दचकून जागी झाली. तिने हाताच्या कोपरावर भार देऊन उंचावून बघितलं. किसन नावेत जागत बसला होता. तो तिच्याकडे पाहून तिला आश्वासन देत हसला.
थोड्या वेळाने किसनही नावेत झोपी गेला. झाडाचं एक पान त्याच्या उताण्या चेहऱ्यावर पडलं. पण त्याने काही तो जागा झाला नाही. ते पान त्याच्या गालावर पडून राहिलं. जणू तिथेच उगवलं असावं. अखेर तो उठला. एक मोठी जांभई दिली, अंगाला आळोखेपिळोखे दिले आणि सीतेशेजारी येऊन बसला.
“पाणी आणखी वाढलेलं दिसत नाही.” त्याने पाण्याकडे बघून म्हटलं. “पण मला कडाडून भूक लागली आहे.”
“मलाही लागली आहे,” सीता म्हणाली.
“हे शेवटचे दोन आंबे.” टोपलीतून उरलेले दोन आंबे काढून ती रिकामी करीत तो म्हणाला.
दोघांचं आंबे खाऊन झालं, तेव्हा किसनने झाडीतून नाव वल्हवायला सुरुवात केली. जवळजवळ तासभर ते नावेतून वाट काढीत हिंडत होते. रानात सर्वत्र पुराचं पाणी शिरलेलं होतं. पावसाने झाडं न्हाऊन निघाली होती. त्यांच्या फांद्यांवरून पाणी गळत होतं. काही वेळा त्यांना वल्ह्यांनी वेली आणि झाडांच्या फांद्या बाजूला कराव्या लागत होत्या. काही वेळा पाण्याखाली बुडालेली झाडी वाट अडवीत होती. पण दुपार व्हायच्या आत ते रानातून बाहेर पडले.
दूरवर त्यांना एक गाव दिसलं. उंच जागी होतं ते. त्यांची नाव जसजशी पूर आलेल्या शेतांमधून जाऊ लागली तसतसं पाणी उथळ होऊ लागलं. त्या गावचे लोक अतिशय दयाळू व मदतशील होते. त्यांनी सीतेला व किसनला खायला दिलं. निवाऱ्याला जागा दिली. सीता आपल्या आजी-आजोबांना शोधायला आतुर झाली होती. एका वृद्ध शेतकऱ्याचा शाहगंज गावी व्यापार होता. त्याने तिला तिथे न्यायचं कबूल केलं. किसन आपल्या बरोबर येईल असं सीतेला वाटलं. पण आपण तिथेच थांबणार असल्याचं किसनने तिला सांगितलं. बरेच लोक तिथे येतील. त्यात त्याची माणसंही असतील हे त्याला ठाऊक होतं. म्हणून त्यांची वाट पाहात त्याच गावी थांबायचं त्यानं ठरवलं.
“आता तुला कसली काळजी नको.” तो म्हणाला. “शक्य तेवढ्या लवकर आजोबांना शोधायचा प्रयत्न कर। दोन-तीन दिवसांत पाणी ओसरेल आणि तुला बेटावर परत जाता येईल.”
“बेट जाग्यावर असेल तर ना?” सीता म्हणाली.
ती शेतकऱ्याच्या बैलगाडीत चढली तेव्हा किसनने तिला एक बासरी दिली. “माझी ठेव म्हणून घे,” तो म्हणाला.
“मी ती न्यायला एक दिवस येईन.” ती घ्यायला तिला संकोच वाटत असल्याचं त्याला दिसलं तेव्हा तो म्हणाला, “ही फार छान बासरी आहे.”
बैलगाडी सावकाश चालली होती. गावचे रस्ते जवळजवळ वाहून गेले होते, दिसेनासे झाले होते. मध्येच गाडीची चाकं चिखलात रुतत होती. शेतकरी, त्याचा मोठा मुलगा व सीता यांना खाली उतरून धक्का देऊन चाकं चिखलातून बाहेर काढावी लागत होती. बैल चिखलाने माखले होते. सीतेचे पायही चिखलाने बरबटले होते.
एक दिवस व एक रात्र त्यांना बैलगाडीत घालवावी लागली तेव्हा कुठे ते शाहगंजला पोचले. सीता गजबजलेल्या बाजाराच्या अरुंद रस्त्यांवरून आजोबांना शोधत हिंडू लागली. तेव्हा तिची अवस्था ओळखू येत नव्हती. आजोबांनी ओळखलंच नाही तिला. ते रस्त्यावरून नाकासमोर तरातरा चालले होते. केस विस्कटलेल्या, चिखल लागलेल्या मुलीवरून ते तसेच पुढे गेले असते. पण त्यांच्या काटकुळ्या, थरथरणाऱ्या पायांजवळ येऊन सीतेने त्यांच्या कमरेला विळखा घातला.
“सीता!” तोल सावरून, दम घेतल्यावर ते ओरडले. “पण तू इकडे कशी? बेट का सोडलं? तिथून बाहेर कशी पडलीस? मला इतकी काळजी वाटत होती... गेले दोन-तीन दिवस फारच वाईट होते.”
“आजी?” सीतेने विचारलं.
तिने विचारलं खरं, पण आजी सोडून गेल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. आजोबांच्या हरवलेल्या नजरेनं बरंच काही सांगून टाकलं होतं. तिला रडावसं वाटलं. गेलेल्या आजीसाठी नव्हे, कारण ती बिचारी वेदनांमधून सुटली होती. तर असहाय्य व गोंधळलेल्या आजोबांसाठी - तिचं हृदय भरून आलं. मोठ्या प्रयासाने तिने अश्रू आवरले. त्यांचा सुरकुतलेला, थरथरणारा हात धरला आणि त्यांना त्या गर्दीच्या रस्त्यातून बाहेर काढलं. आता यापुढे त्यांना आपलाच आधार असल्याचं तिच्या लक्षात आलं.
काही दिवसांनी नदीचा पूर ओसरला. तेव्हा ते बेटावर परत आले. पाऊस आणखी आला पण त्याचा भयंकरपणा गेला होता. आजोबांपाशी अजून दोन शेळ्या होत्या. एक शेळी त्यांनी विकली होती. बाकीच्या शेळ्या विकायची गरज भासली नव्हती. त्यांनी जेव्हा पिंपळाचं झाड बेटावरून नाहीसं झालेलं पाहिलं तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. बेटावरल्या खडकांइतकाच ते झाड कायम राहील असं त्यांना वाटलं होतं. नदीप्रमाणे तेही त्यांच्या जीवनाचं एक अंग झालं होतं. सीता कशी बचावली याचं त्यांना आश्चर्य वाटलं.
“झाडानंच तुला वाचवलं-” ते म्हणाले.
“आणि त्या मुलानेही.” सीतेनं सांगितलं.
सीतेला त्या मुलाची आठवण झाली. तो पुन्हा कधी आपल्याला दिसेल की नाही याची शंका तिला वाटली. पण ती त्याचा फार विचार करीत बसली नाही. कारण अजून खूप कामं करायची होती. तीन दिवस ते पोत्यांनी तयार केलेल्या एका तात्पुरत्या निवाऱ्याखाली झोपले. दिवसा ती आजोबांना झोपडी पुन्हा बांधण्याच्या कामी मदत करायची. तिने अतिशय काळजीपूर्वक सामान भरलेली पेटी वाहून गेली नाही. पण त्यात पाणी मात्र शिरलं होतं आणि सगळं अन्नधान्य व कपडे खराब होऊन गेले होते. आजोबांच्या हुक्क्याला काही धक्का लागला नव्हता. संध्याकाळी सगळं काम आवरलं आणि सीतेनं तयार केलेलं थोडं अन्न खाल्लं की ते हुक्का ओढीत. त्यांना त्यांचा जुना आनंद काही अंशी लाभायचा.
ज्या जागी पिंपळाचं झाड होतं त्याच जागी सीतेनं आंब्याची कोय लावली. त्याचं मोठं झाड व्हायला खूप वर्ष लागतील. पण कधी काळी आपण त्याच्या फांद्यांवर बसून मनसोक्त आंबे खात आहोत ही कल्पनाच सीतेला सुखावह वाटत होती.
हळूहळू पावसाळा संपला. हिवाळी पिकांसाठी शेतकरी पुन्हा नांगरणी व पेरणी करू लागले. गुरांचे बाजार, जत्रा व कुस्त्यांचे फड होऊ लागले. ऊन पडू लागलं. हवा दमट झाली. नदीचं पाणी आता गढूळ राहिलं नव्हतं. एके दिवशी आजोबांनी एक मोठा महसीर मासा पकडला. सीतेने त्याचा खमंग रस्सा केला. आजोबा झोपडीबाहेर हुक्का ओढीत बसले होते. सीता दूर तिकडे बेटाच्या कडेला खडकावर कपडे वाळत घालीत होती.
तिला हलकेच कुणाची तरी चाहूल लागली. तिने आजूबाजूला पाहिलं. किसन तिच्या मागे वरच्या बाजूला उभा राहून हसत होता.
“मला वाटले तू काही आता येणार नाहीस” सीता म्हणाली.
“गावी खूप काम होतं. माझी बासरी ठेवलीस?”
“हो. पण मला ती नीट वाजवता येत नाही.”
“मी तुला शिकवीन.” किसन म्हणाला.
तो तिच्याजवळ खाली बसला. दोघांनी आपले पाय नदीच्या पाण्यात सोडले. पाणी स्वच्छ नितळ होतं. आभाळामुळे निळ्या रंगाचं दिसत होतं. तळाची रेती व गोटे पाहता येत होते.
“नदी कधी विक्राळ होते, तर कधी प्रेमळ असते”, सीता म्हणाली.
“आपण नदीचाच भाग आहोत.” किसन म्हणाला.
ती एक खोल व भरपूर पाणी असलेली, डोंगरात उगम पावून सागराला मिळणारी चांगली नदी होती. तिच्या काठावर हजारो मैलांपर्यंत लाखो लोक राहात होते. सीता ही त्यांच्यापैकीच लहानशी मुलगी. कुणीच तिच्याविषयी ऐकलं नव्हतं. कुणालाच ती ठाऊक नव्हती. आजोबा, मुलगा व नदी हे मात्र अपवाद बरं का!