Bookstruck

सहावा चोर

उज्जैन राज्यातली ही एक जुनी गोष्ट आहे. राज्यभर चोरांचा सुळसुळाट वाढला होता. राजाच्या शिपायांनी चोरांना पकडण्याची शिकस्त केली, पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. राजधानीतल्या श्रीमंत नागरिकांनी राजाकडे आपले गाऱ्हाणे नेले व म्हणाले— "महाराज! आपणच काही प्रयत्न केलात तर आम्हांला या चोरांपासून मुक्ती मिळेल." राजाने त्यांना लवकरच चोरांचा सुळसुळाट बंद करविण्याचे वचन देऊन पाठवून दिले. मध्यरात्रीच्या सुमारास राजा स्वतः वेष पालटून निघाला आणि चौकात येऊन उभा राहिला. थोड्या वेळाने एकेक करून चार जण तिथे आले. राजाने जवळ जाऊन विचारले— "मी येऊ का तुमच्या टोळीत? तुमच्यासारखा मी पण एक चोर आहे. तुमचे विशेष काय, ते सांगा!" "मी कसलीही भिंत असली तरी तिला भोक पाडू शकतो," पहिला चोर म्हणाला. "मी प्रत्येक प्राण्याच्या आवाजाचा अर्थ सांगू शकतो," दुसरा म्हणाला. "कुलूप लावलेल्या पेटीचा नुसता वास घेऊन पेटीत काय आहे, हे मी सांगू शकेन," तिसरा म्हणाला. "मी एकदा कोणाचा आवाज ऐकला की पुढे कित्येक वर्षे लोटली तरी मी तो कोणाचा आहे हे ओळखू शकेन," चौथा चोर म्हणाला. नंतर चारी चोरांनी राजाला विचारले— "आता, तू आपले विशेष काय, ते सांगशील की नाही?" "माझ्याबरोबर राहणाऱ्या चोरांना कधी फाशीची शिक्षा होणार नाही," राजा म्हणाला. नंतर पाचही जण चोरी करायला निघाले. राजाने खुद्द राजवाड्यातच चोरी करावी असे सुचवले. इतर चोरांना ते पसंत पडले. सर्वजण राजवाड्याच्या जवळ येऊन पोहोचले. पहिल्या चोराने भिंतीला भोक पाडायला सुरुवात केली. इतक्यात कोल्हेकुई ऐकू आली. "याचा काय अर्थ?" राजाने दुसऱ्या चोराला विचारले. "घराचा मालक उठतो आहे, असा त्याचा अर्थ आहे," दुसरा चोर म्हणाला. इतक्यात घुबड बोलले. राजाने त्याचा अर्थ विचारला. दुसरा चोर म्हणाला— "याचा अर्थ घरमालक आपली चोरी पाहत आहे." ते ऐकून चोरांनी चोरीचा विचार सोडला व चकित होऊन परस्परांकडे पाहत विचार करू लागले. नव्या चोरासमोर आपली भित्रेपणा दिसेल असे चारी चोरांना वाटले. म्हणून मनात भीती वाटत असूनही जे काम सुरू केले ते तडीस नेण्याचे ठरवून पहिल्या चोराने भिंतीला भोक पाडायला सुरुवात केली. चोरांना राजवाड्यात सहा पेट्या मिळाल्या. तिसऱ्या चोराने त्यांचा वास घेऊन म्हटले— "काय पण आपले भाग्य! या पेट्यांत हिरे-माणिक आणि सोन्या-चांदीच्या वस्तू आहेत!" पाचही चोरांनी पाच पेट्या उचलल्या व सहावी पेटी भिंतीच्या भोकाजवळ ठेवून तिथून पाय काढला. दुसऱ्या दिवशी एका विशिष्ट जागी भेटायचे ठरवून पाचही चोर आपापल्या वाटेने निघून गेले. अर्थात, राजा आपल्या वाड्यात परतला. सकाळी उजाडले. पहारेकऱ्यांचा प्रमुख सर्व ठीकठाक आहे की नाही याची पाहणी करीत भिंतीला भोक होते तिथे आला. आतल्या पाच पेट्या नाहीशा झाल्या होत्या व सहावी पेटी भिंतीच्या भगदाडाजवळ होती, ती त्याने पाहिली. पहारेकऱ्यांचा प्रमुख लगेच ती पेटी उचलून आपल्या घरी ठेवून आला आणि सरळ राजाकडे जाऊन म्हणाला— "महाराज! आम्ही डोळ्यांत तेल घालून रात्रभर पहारा दिला तरी चोर आमच्या डोळ्यांत धूळ फेकून राजवाड्यातल्या दागिन्यांच्या सहा पेट्या चोरून घेऊन गेले." सहावा चोर कोण असावा, हे राजाला कळले. त्याने मुख्य पहारेकऱ्याला, "काळजी करू नकोस, आज रात्री सर्व चोर सापडतील," असे सांगून पाठवून दिले. त्या दिवशी रात्री चार चोर ठरल्या जागी आले तेव्हा शिपायांनी त्यांना धरले. दुसऱ्या दिवशी सर्व चोरांना दरबारी हजर करण्यात आले व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असा राजाचा हुकूम झाला. ते ऐकून चौथा चोर राजाला ओळखून म्हणाला— "महाराज, काल रात्री आम्ही चोरीला निघालो तेव्हा एक पाचवा चोर आमच्याबरोबर आला होता. निघण्यापूर्वी त्याने आम्हांला वचन दिले होते की त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा झाल्यास तो सोडवील. परंतु त्याने आपल्या त्या वचनाप्रमाणे आम्हांला सोडविले नाही. आपण जी फाशीची शिक्षा दिली आहे ती पाचव्या चोराला देखील लागू आहे का?" राजा स्मित हास्य करत म्हणाला— "तुमच्या बरोबरचा पाचवा चोर आपल्या वचनाचे पालन करणार आहे." नंतर सभासदांकडे वळून राजा म्हणाला— "मीच होतो तो पाचवा चोर! मी या चोरांची शिक्षा फक्त रद्दच करीत नाही, तर त्यांनी जी जी पेटी उचलून नेली होती, ती ती त्यांना बक्षीस देतो. कारण यांच्या अंगात एकेक विशेष गुण आहे. आजपासून त्यांना माझ्या दरबारात जागा मिळेल व ते चोरीचा धंदा सोडतील. परंतु सहाव्या चोराविषयी आपणांपैकी एकालाही कल्पना नसेल. तो आमच्या पहारेकऱ्यांचा प्रमुख आहे!" राजाच्या तोंडचे ते अनपेक्षित वाक्य ऐकून त्या प्रमुखाचा चेहरा एकदम पडला. त्याच्या घरात सहावी पेटी झडतीत सापडली. त्याला राजाने हद्दपारीची शिक्षा दिली आणि त्याचे काम त्या चारी चोरांना दिले.