Bookstruck

सहानुभूति

चैतन्यने आपले शिक्षण पूर्ण होताक्षणीच कोणतेही कष्ट न घेता शहरात एक चांगली नोकरी प्राप्त केली. तो एक भाड्याची गाडी करून ऑफिसमध्ये जा-ये करू लागला. म्हाताऱ्या कोताऱ्याबद्दल चैतन्याच्या मनात अत्यंत आत्मीयता होती. तो आपल्या भाड्याच्या गाडीच्या गाडीवान मंगलदासला दरमहा पन्नास रुपये भाडे देई. गाडीतून ऑफिसमध्ये जायच्या वेळेस तो हटकून नेहमी मंगलदासला विचारीत असे— "मंगलदास तुमचे दोन्ही मोठे मुलगे थोडे फार कमावतात. अशा स्थितीत तुम्ही हे कष्ट कां करता? घरात बसल्या आराम कां करीत नाहीत?" मंगलदास हसून म्हणत असे— "दादा, मला माझ्या मुलांनी कमावलेला पैसा परका वाटतो. जो पर्यंत अंगात बळ आहे तोपर्यंत स्वतःच्या कमाईवर जगणे ह्या सारखा आनंद कशात नाही." चैतन्याच्या वडिलांनी त्याला स्वतः कष्ट मेहनत करून शहरात शिकावयास पाठविले होते. त्याची आठवण करून तो नेहमी दु:खीकष्टी होत असे. तेव्हा ते आपल्या मुलाला दिलासा देत म्हणत— "बाळा, तू ज्या दिवशी पैसा मिळवू लागशील ना! त्याच दिवशी मी माझे सारे काम सोडून देऊन आरामाने घरात बसू लागेन!" परंतु चैतन्यने आपले शहरातील शिक्षण संपवून जेव्हा कामधंदा शोधण्यास सुरुवात केली, तेव्हांच अचानक त्याचे वडील आजारी पडले. व त्याला जेव्हा नोकरी मिळाली, तेव्हा एका आठवड्यात त्यांचा देहान्त झाला. त्यामुळे चैतन्य दु:खी होई की आपण आपल्या वडिलांना थोडे दिवस सुद्धा सुखात ठेवू शकलो नाही. चैतन्य ज्या वाटेने नेहमी ऑफिसला जाई त्या रस्त्याच्या चौकाच्या कोपऱ्यात एक सत्तर वर्षाचा म्हातारा एका टोपलीत भजी वडे पकोडे घेऊन विकावयास बसत असे. संध्याकाळी घरी जाताना सुद्धा तो म्हातारा त्याला टोपलीच्या मागे आडवा झालेला दिसे. तो दिवसभर उन्हात बसे ती कल्पना करूनच चैतन्याला त्याची खूप दया आली. परंतु पुढचे दहा दिवस ओळीने तो म्हातारा माणूस दिसला नाही. तेव्हा चैतन्याच्या मनात आले की, तो बहुदा मेला असावा. परंतु अकराव्या दिवशी तो माणूस त्याला भजी विकत असताना दिसला. ते पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. चैतन्यने आपल्या गाडीवान मंगलदासला गाडी थांबवण्यास सांगितले व त्या म्हाताऱ्यापाशी जात म्हणाला— "म्हातारेबुवा, दहा दिवस झाले, परंतु तुम्ही दिसला नाहीत काय झाले?" एका अपरिचित माणसाच्या तोंडून आपुलकीचे बोलणे ऐकून त्या म्हाताऱ्याला अत्यंत आनंद झाला. तो डोके हलवत हलक्या आवाजात म्हणाला— "साहेब, मी दहा दिवस तापाने आजारी होतो. खरं म्हणायचे तर मृत्यूच्या दाढे तूनच कसाबसा वाचलो." म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून त्याने कळवळून त्याला विचारले— "बुवा, ह्या सगळ्या वस्तू विकल्या गेल्या तर तुम्हांला रोज किती पैसे मिळतात?" "चार रुपये! त्यातून मला एक रुपया फायदा होतो!" म्हातारा त्याला म्हणाला. "तर मग, त्या सर्व वस्तू तू मला दे. मी तुला पाच रुपये देतो." चैतन्य म्हणाला. म्हाताऱ्याला आश्चर्य वाटले तो त्याच्याकडे पहातच राहिला. चैतन्यनी सर्व वस्तू नेऊन गाडीत ठेवल्या व म्हाताऱ्याला पाच रुपये दिले व गाडीत बसला. मंगलदासने चैतन्याला विचारले— "साहेब, ह्या सर्व वस्तू घेऊन जाऊन तुम्ही काय करणार?" "तुझ्या शेजार पाजाऱ्यांच्या मुलांना वाटून टाकेन." चैतन्यने उत्तर देत म्हटले. दुसऱ्या दिवशी जेव्हा गाडी चौकात आली चैतन्यने पुन्हा त्या म्हाताऱ्याला पाच रुपये देऊन त्याच्या सर्व वस्तू घेतल्या. तिसऱ्या दिवशी सुद्धा तेच, तेव्हा मंगलदासने विचारले— "साहेब, तुम्ही किती दिवस पाच रुपये देऊन त्या वस्तू खरेदी करणार?" "जो पर्यंत हा म्हातारा जिवंत आहे तोपर्यंत!" चैतन्यने उत्तर दिले. परंतु चैतन्य जेव्हा म्हाताऱ्याजवळ गेला तेव्हा म्हातारा हात जोडत त्याला म्हणाला— "साहेब, रोज माझ्या सर्व वस्तू विकत घेऊन मला संकटात पाडू नका. माझ्या सर्व वस्तू तुम्ही विकत घेता त्यामुळे मी घरी लवकर पोहोचतो. माझ्या मुलाला ते सहन होत नाही. मग तो दिवसभर माझ्याकडून काही ना काही तरी काम करून घेतो. काल दुपारी भर उन्हात मला लाकडे फोडावी लागली." म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून चैतन्याला खूप आश्चर्य वाटू लागले. त्याच बरोबर अत्यंत दु:ख झाले, कारण आपल्या मुलाकडून सुखाची आशा करणारा आपला पिता अशी संधी येताच मरण पावला. तशी संधी आली तरी मंगलदास त्याचा फायदा घेत नव्हता. इथे तर अगदीच उलटी स्थिती होती. म्हाताऱ्याकडून त्याचा मुलगा कष्टांची अनेक कामे करून घेत होता. त्यामुळे म्हाताऱ्याला दिवसभर उन्हांत बसून खाण्याच्या वस्तू विकण्यातच जास्त आनंद वाटत होता! चैतन्यनी निश्चय केला त्याच्या मुलाला चांगलाच धडा शिकविला पाहिजे. त्याने म्हाताऱ्याला विचारले— "बाबा, तुम्ही माझ्या घरी चला? तिथे तुम्हांला खाण्यापिण्याची अजिबात काळजी करण्याची जरूर नाही?" म्हातारा म्हणाला— "साहेब, माझ्या मुलाला ते खपणार नाही." "त्याची तू अजिबात काळजी करू नको. चल, गाडीत बस!" असे म्हणत चैतन्यने म्हाताऱ्याला बांयाला धरून गाडीत बसविले. त्याचा मुलगा शोध काढत दुसऱ्या दिवशी चैतन्याच्या घरी येऊन पोहोचला. चैतन्यने त्याच्या मुलाची चांगली कान उघाडणी केली— "अशा म्हातारपणाच्या काळात वडिलांना सुखी ठेवण्याच्या बदली तू आपल्या वडिलांच्या हातची कमाईची आशा करतोस." म्हाताऱ्याचा मुलगा संकोचाने म्हणाला— "बाबा साहेब, मी असा अप्पलपोटी नाही. मी त्याच्या कमाईतून त्यांच्याच खाण्याचा व कपडयाचा खर्च करतो." "ओहो, असेच जर असेल तर त्यांच्या खाण्यापिण्या कपड्यातल्याचा खर्च मी करून त्यांना इथे ठेवून घेतो. तुझी तर काही हरकत नाही ना?" चैतन्यनी विचारले. म्हाताऱ्या बुवाचा मुलगा बापाचा चेहरा बघून शरमिंदा झाला व त्याने आपली मान खाली घातली. त्यावर चैतन्य म्हणाला— "अशा म्हातारपणी तुझे वडील तुझ्याच घरी राहाणे चांगले." म्हाताऱ्याचा मुलगा डोळ्यात अश्रू आणित आपल्या वागण्या व करण्याचा पश्चाताप करीत चैतन्याला हात जोडीत आपल्या वडिलांना म्हणाला— "बाबा, चला आपण आपल्या घरी जाऊ. आपण माझे डोळे उघडलेत." असे म्हणत त्याने आपल्या वडिलांचा हात धरला व त्यांना घरी घेऊन गेला.