सर्वोत्तम परिपूर्ण
होजा नासिरुद्दीन मित्राबरोबर कॉफी पीत बसला होता. तेवढ्यात अजून एक मित्र आला आणि मोठ्या आनंदात त्याला सलाम केला व म्हणाला, "पुढल्या आठवड्यात मी लग्न करतो आहे. मला खूप छान वाटतंय. पण होजा साहेब, तुम्ही का नाही कधी लग्न करण्याचा विचार केला?"
"अरे, मी केला होता बाबा, पण ती खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे." होजा म्हणाला.
"का? काय झालं? तुम्हाला कोणी योग्य मुलगी सापडली नाही का?" मित्राने विचारले.
"नाही, तसं काही नव्हतं. मी तरुण असताना एकदा सर्वोत्तम परिपूर्ण अशी बायको शोधायला निघालो. मी दऱ्या-खोऱ्यांतून, डोंगरापलीकडे खूप लांब प्रवास केला. शेवटी डोंगरउतरणीवर एका छोट्याशा गावात मला एक सुंदर मुलगी भेटली. ती शहाणी तशी दयाळू पण होती. पण तिला जगाचा अनुभव नव्हता. त्यामुळे मला वाटले की ती मला माझ्या दैनंदिन कामात मदत करू शकणार नाही. म्हणून मी तिच्याशी लग्न केले नाही. मी आणखी पुढे प्रवास केला आणि एका शहरात आलो. तिथे मला जातिवंत सुंदर मुलगी भेटली. ती हुशार आणि दयाळू होती व तिला जगाचा अनुभव पण होता. ती जवळजवळ परिपूर्ण होती."
"मग? कुठं घोडं अडलं?" होजाचे बोलणे ऐकणारे दोन्ही मित्र एकदम म्हणाले, "तू तिच्याशी लग्न का नाही केलंस?"
"काय करणार, ती आपली भाषा बोलू शकत नव्हती आणि मी तिची." होजा म्हणाला. "म्हणून मला वाटलं, जिच्याशी आपल्याला बोलता येणार नाही तिच्याशी लग्न करून काय उपयोग? म्हणून मी आणखी पुढे गेलो आणि इजिप्तला पोहोचलो. तिथे ती मला सापडली. ती सर्वदृष्टीने परिपूर्ण होती. ती सुंदर व दयाळू होती. तिला जगाची रीत माहिती होती. ती भाविक होती आणि मला बोलायला आवडणारी भाषा पण तिला येत होती. मला लगेचच लक्षात आले की आपल्याला सर्वोत्तम परिपूर्ण बायको सापडली आहे."
"ओह, होजा! तू अशा मुलीला कसं जाऊ दिलंस? तू तिच्याशी लग्न का नाही केलंस?" मित्र म्हणाले.
"देवारे देवा!" दुःखाने डोकं हलवत होजा म्हणाला, "मी काय करणार? ती सर्वोत्तम परिपूर्ण नवरा शोधत होती!"