सदाचरणी
सीताराम एक दिवशी संध्याकाळी हिंडायला कालव्याच्या काठाकाठाने निघाला. काळोख पडू लागल्यावर परत निघाला. वाटेत एक अमराई होती. तीतून दोन चोरांनी बाहेर येऊन मारहाण करायला सुरुवात केली. त्यांच्या हातात सुरे होते. एकाने सीतारामाचे दोन्ही हात धरून पिळवटले, दुसऱ्याने सीतारामाच्या हातांतली अंगठी आणि खिशातले पैसे काढून घेतले. नंतर सुरा गळ्यावर ठेवला.
सीताराम ओरडला— "वाचवा हो, वाचवा!"
तितक्यात एका तरुणाने समोर येऊन दोघां चोरांना दरडावून विचारले— "कोण रे, तुम्ही?" चोर त्याला मारायला धावले. पण त्याच्यासमोर टिकाव लागणार नाही, हे कळतांच त्यांनी पाय काढला.
सीताराम जिवात जीव आल्यासारखा त्या तरुणाचे आभार मानीत म्हणाला— "मुला, तू कसा देवासारखा पावलास! तू बरोबर घरापर्यंत चल!"
"अहो, असं काय बोलतां? तुम्ही वडील माणसं? संकट समयी जो कोणी मदतीला धावत नाही, तो माणूस नसून राक्षस असतो. चला." या शब्दात त्या तरुणाने सीतारामाला हाताचा सहारा देऊन घरापर्यंत पोचते केले.
वाटेत सीतारामाने त्या मुलाची जास्त चौकशी केली. त्या मुलाचे नांव धर्मराज होते. त्याच्या लहानपणीच त्याचे आई-वडील वारले. गावकऱ्यांच्या कृपेने त्याने विद्याभ्यास पुरा केला आणि नोकरीच्या शोधार्थ त्या गावी आला होता. परंतु अद्याप त्याला नोकरी मिळाली नव्हती.
घरी पोचताच सीताराम मुलीला धर्मराजाची ओळख करून देऊन म्हणाला— "हा धर्माचा अवतार जर वेळेवर आला नसता तर माझं प्रेतच घरी परतले असते."
सीतारामाची मुलगी सरला डोळ्यांत पाणी आणून म्हणाली— "बाबा, तुम्हांला मी कितीदां सांगितले की काळोख पडल्यावर एकट्याने कोठे हिंडायला जाऊ नका, परंतु तुम्ही कधी ऐकतच नाही, नशीब बलत्तर म्हणून हे गृहस्थ वेळेवर आले."
धर्मराज म्हणाला— "बरं तर मला आतां निरोप द्या."
"अरे तू या काळोखात कोणाकडे जाऊन राहणार? तू आमच्याच घरी रहा." सीताराम म्हणाला. सरलाने लगेच एक खोली झाडून धर्मराजाला राहण्यासाठी तयार करून दिली.
जेवायला बसल्यावर सीताराम धर्मराजाला म्हणाला— "मुला, माझ्याजवळ लक्षावधी रुपये आहेत. परंतु जोपर्यंत माझ्या मुलीचे लग्न एखाद्या सदाचरणी व्यक्तीशी होत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही."
दुसऱ्या दिवशी धर्मराज सीतारामाला म्हणाला— "बरं मी आतां निरोप घेतो. कोठेतरी नोकरी मिळते का पाहातो."
"कोठे शोधणार? तुला नोकरी मिळाली असेच समज. या गावात माझी कापडाची चार दुकाने आहेत. त्यांची देखरेख तू कर." सीताराम म्हणाला.
धर्मराजाने अगदी अनिच्छेने ते मान्य केले. सरलाला वाटले की वडिलांनी योग्य तेच केले. परंतु लवकरच धर्मराजाविषयी सरलाचे मत पालटू लागले. कारण तो सीताराम घरात असे त्यावेळी सरलाशी ज्या तऱ्हेने वागे त्यापेक्षा सीताराम घरात नसतांना अगदी निराळ्या तऱ्हेने वागू लागला. सरलाचे मन आकृष्ट करण्यासाठी तो थोडा आगाऊपणा करू लागला.
एकदां सरला वडिलांना म्हणालीसुद्धा— "बाबा, धर्मराज आतां किती दिवस आपल्या घरात राहणार? त्याला राहण्यासाठी एखादे घर कां नाही पाहून देत?"
"तू म्हणतेस ते बरोबरच तर आहे! नाहीतरी तो परका म्हणून आपल्या घरात किती दिवस राहणार? तो एक सदाचरणी मुलगा आहे. मला वाटतं तो घरजावई होऊन राहील कायमचा घरात. तुला काय वाटतं?" सीतारामाने मुलीला विचारलं.
ते ऐकून सरला थक्कच झाली. तिला विचारल्याशिवाय धर्मराजाशी वडिलांनी लग्नाची गोष्ट काढली म्हणावयाची? सरलाला ती गोष्ट आवडली नाही. तो तिचा अपमान होता. कारण तिच्या मनात मैत्रिणीचा भाऊ राजेश नावाचा होता, त्याच्याशी लग्न करायचे होते. तिने ती गोष्ट चुकूनसुद्धा वडिलांच्या कानावर घातली नाही. कारण तो परजातीचा होता.
सरलाने वडिलांना विचारले— "तो सदाचरणी मुलगा आहे, हे तुम्हांला कशावरून वाटले?"
सीतारामाने थोड्याशा रागाने म्हटले— "मी लोकांचा स्वभाव ओळखतो. पुढल्या महिन्यात तुझे लग्न धर्मराजाशी होईल! मी मुहूर्त सुद्धा ठरविला आहे."
ती वडिलांसमोर काही बोलू शकली नाही. खोलीबाहेर निघून गेली. दोघांचे संभाषण आड उभा राहून धर्मराज ऐकत होता, हे तिच्या लक्षात आले. सरलाला बाहेर येत असलेली पाहून तो तेथून निसटला होता.
त्या दिवशी रात्री सरलाला झोप आली नाही. तिने पुढे काय करायचे याविषयी राजेशशी बोलायचे ठरविले. त्याच वेळी धर्मराजाच्या खोलीतून त्याची किकाळी ऐकू आली. सरला जागीच होती. ती धावत धर्मराजाच्या खोलीत गेली. धर्मराज घाबरल्यासारखा खाटेवर थरथर कापत बसला होता. खाटेच्या दुसऱ्या कोपऱ्यावर एक पांढरा बोका बसलेला होता. सरलाला पाहतांच धर्मराज म्हणाला— "या बोक्याला पळव पाहू!"
"तो काय करणार हो तुम्हांला? तो पाळलेला बोका तर आहे!" असे म्हणत सरलाने त्या बोक्याला उचलून घेतले.
"मला मांजर मुळीच आवडत नाही. म्हणजे मला त्याची भीती वाटते, असे मुळीच नाही!" धर्मराज आपली बाजू सांभाळू लागला. सरलाला धर्मराज म्हणाला ते खरे वाटले नाही. ती बोक्याला घेऊन निघून गेली.
दुसऱ्या दिवशी तिने राजेशला भेटून सर्व काही सांगितले आणि म्हणाली— "धर्मराजाने बाबांना आपल्या जाळ्यात फसवून ठेवले आहे. जी व्यक्ती एखाद्या सामान्य मांजराला पाहून थरथर कापते ती चोरांपासून माझ्या वडिलांचे रक्षण कशी करू शकली, हेच मला कळत नाही!"
"मी काढतो त्याचे गुपित शोधून. परंतु त्यापूर्वी आपण गोष्ट सिद्ध करून दाखवायची आहे!" असे सांगून राजेशने सरलाला एक युक्ती सुचविली.
दुसऱ्या दिवशी सरला धर्मराजाला म्हणाला— "मी डोंगरावरच्या देवीच्या दर्शनाला जावे म्हणते! तुम्ही येता का बरोबर सोबतीला?"
धर्मराज आनंदाने तिच्या बरोबर निघाला. ते देवीचे दर्शन करून डोंगर उतरू लागले तेव्हा काळोख पडू लागला. पूर्वी ठरल्याप्रमाणे राजेश एका झाडाआडून एकदम पुढे आला आणि त्याने सरलाच्या गळ्यातला सोन्याचा हार तोडून घेतला. सरला ओरडली— "चोर, चोर! पकडा चोराला! दहा हजाराचा सोन्याचा हार आहे हो!" तरी राजेश तेथून हल्ला डुलला नाही. तो तेथेच उभा राहून धर्मराजाला आव्हान करीत म्हणाला— "काय रे, ए! तू येतो आहेस का मला धरायला? तुझा गळा दाबून तुझे प्रेत देईन फेकून त्या दरीत!"
परंतु धर्मराज ती धमकी ऐकून जागचा हल्ला नाही. त्याचे पायच गारठले होते. तेवढ्यात आणखी कोणाला येत असलेला पाहून राजेश झाडीत गडप झाला. "सोन्याचा हार गेला तर गेला, जीव तर वाचला. चला, घरी जाऊं या." सरला म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सरला राजेशच्या घरी गेली तेव्हा तो म्हणाला— "आतां हे पूर्णपणे सिद्ध झाले आहे की धर्मराज अगदी भित्रा आहे. त्याने भाडोत्री चोरांचे नाटक करून तुमच्या घरात शिरायला मार्ग काढला आणि तुझ्याशी लग्न करून तुमच्या सर्व इस्टेटची मालकी मिळविण्याचा कट केला होता. मी त्याचे हे नाटक बंद करतो. तू एक काम कर." असे सांगून राजेशने सरलाला एक युक्ती सुचविली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजेश सीतारामाला भेटला व म्हणाला— "माझे नाव राजेश आहे. तुमच्या हिताची म्हणून एक गोष्ट सांगायला आलो आहे. तुम्ही ज्या धर्मराजाला आपला जावई करून घेण्याच्या विचारात आहां त्याचे खरे स्वरूप तुम्हांला पहावयाचे असेल तर माझ्याबरोबर चला."
सीतारामाला त्याच्याबरोबर जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. तरी त्याला वाटले की राजेश म्हणतो आहे त्यामागे काहीतरी भयंकर गोष्ट कानाडोळा न करण्यासारखी आहे.
इकडे धर्मराज काळोख पडल्यावर घरी परतला. तेव्हा सरला त्याला म्हणाली— "तुम्हांला शोधत दोघे जण आले होते. त्यांनी तुमच्या हिताचे काहीतरी काम केले आहे. त्याचे फळ तुम्हांला पूर्णपणे मिळालेले नाही. लगेच त्यांना भेटायला त्यांनी सांगितले आहे." असे सांगून सरलाने राजेशच्या घराची खूण धर्मराजाला सांगितली.
ते ऐकून धर्मराजाच्या चेहऱ्याचा रंगच पालटला. तो लगेच राजेशच्या घरी निघाला. राजेश आपल्या घरात पुढल्या बैठकीतला दिवा थोडा मंद करून सीतारामाला म्हणाला— "धर्मराज लवकरच येथे येईल. तुम्ही तो काय बोलतो तें लक्ष देऊन ऐका."
धर्मराजाने काळोखात त्या खोलीत दोघांना पाहिले. त्याला फक्त त्यांची आकृतीच दिसत होती. रागाने म्हणाला— "तुमचं डोकं तर फिरलं नाही? माझं सासुरवाड होणार आहे त्या घरात तुम्ही कशाला आलां होतां? त्या म्हाताऱ्याने तुम्हांला पाहून ओळखले असते तर काय झाले असते? तुम्ही दोघांनी मला जी मदत केली होती त्याबद्दल दामदुप्पट प्राप्ती तुम्हांला झाली आहे! मी जे शंभर रुपये दिले होते त्याशिवाय तुम्हांला म्हाताऱ्याची अंगठी व रुपयेसुद्धा मिळाले आहेत. तुमच्या लोभीपणाला आतां काय म्हणावयाचे? लग्न झाल्यावर म्हाताऱ्याच्या हातांतून मी सर्व अधिकार काढून घेईन. तोपर्यंत तुम्ही गप्प रहा. तुम्ही त्या पूर्वी पुन्हां आलात तर सर्वच डाव फसेल व एक कवडी सुद्धा मिळावयाची नाही."
धर्मराजचे ते वाक्य पूर्ण होताच राजेशने दिवा मोठा केला. त्या उजेडात सीताराम व राजेशला पाहून धर्मराजाला 'सळो की पळो' झाले. त्याच वेळी सरलाने बैठकीत पाऊल टाकले व म्हणाली— "बाबा, पाहिलेत ना? तुम्ही या लबाडाला सदाचरणी व आपल्या जातीचा सांगून डोक्यावर चढविले होते. त्याची ही लबाडी राजेशने उघडकीला आणली नसती तर आपले जे हाल झाले असते ते त्या परमेश्वरालाच माहीत!"
सीताराम धर्मराजाकडे एकदां करड्या नजरेने पाहून म्हणाला— "तू माझ्या डोळ्यांसमोरून आतांच्या आतां दूर झाला नाहीस, तर मी पोलीस शिपायांना बोलवून तुला अटक करवीन."
धर्मराजाने लगेच तेथून पाऊल काढले. त्यानंतर सीतारामाने विचार केला की राजेश परकी जातीचा असला तरी सदाचरणी आहे. म्हणून त्याने स्वखुशीने सरलाचे लग्न त्याच्याशी करून दिले.