All Marathi Stories

सकलानंदाचा सल्ला

खांदेड गावात दर शुक्रवारी बाजार भरत असे. त्या बाजारात चांगल्या प्रतीची गुरे खरेदी करायला दूरदूरहून लोक येत असत. शिवानंद एक शेतकरी होता. शेतीच्या कामासाठी त्याला बैलांच्या जोडीची फारच जरुरी होती. तो खांदेडच्या बाजारात बैल खरेदी करायला आला. पण त्या गावी पोहोचेपर्यंत अंधार पडला, म्हणून त्या रात्रीपुरता एका खानावळीत मुक्काम करायचा असे त्याने ठरवले. तिथे कांही चोरांची भीती नव्हती, तरी जवळचे पांचशे रुपये खानावळीचा जो मालक होता, त्या देवनारायणजवळ सुरक्षित ठेवण्यासाठी द्यावे असे शिवानंदला वाटले. त्याने ती रक्कम देवनारायणजवळ दिली. सकाळी उठल्यानंतर बाजारात जायला निघण्यापूर्वी त्याने ते पांचशे रुपये परत मागितले. देवनारायणने आश्चर्य दाखवीत म्हटले, "पांचशे रुपये? तू मला दिले होतेस? तू भोळाभाळा आहेस की मलाच भोळसट समजतो आहेस?" त्याचे हे उत्तर ऐकून शिवानंद एकदम घाबरला. त्याने बावरलेल्या स्वरांत म्हटले, "असं काय म्हणता आहात तुम्ही? काल रात्रींच मी नाही कां तुम्हाला पांचशे रुपये ठेवायला दिले? मी म्हटलं देखील होतं कीं बाजाराला जाण्यापूर्वी मी ते घेईन म्हणून." "पांचशेच काय, पांच पैसेदेखील तू मला दिलेले नाहीस. कांहीतरी खोटं सांगू नकोस." देवनारायणने कडवट स्वरांत फटकारले. आता मात्र शिवानंद फारच घाबरला. तो तिथून निमूटपणे बाहेर आला. त्याची दीनवाणी अवस्था पाहून एका अनोळखी गांवकऱ्याने त्याला काय झालं ते विचारुन घेतलं. सगळं ऐकून घेतल्यावर तो गांवकरी शिवानंदला म्हणाला, "तुझी रक्कम परत मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे बघ, या रस्त्याच्या तोंडाला एक वडाचं झाड आहे. त्याच्या शेजारीच एक घर आहे. तिथे सकलानंद नांवाचा एक बुद्धिमान व चतुर गृहस्थ राहातो. तिथे जाऊन त्याला सारं कांही सांग." शिवानंद सकलानंदकडे गेला. त्यावेळी तो पारावर बसून एक पुस्तक वाचत होता. शिवानंदने आपले नांव गांव सांगितले आणि काय घडलं ते ही सांगितलं. "जे झालं ते झालं. आता तू एक काम कर. तू आणखी पांचशे रुपये घेऊन ये. येत्या गुरुवारी पुन्हां त्याच खानावळीत उतर आणि ते पैसे ठेवायला त्या खानावळ मालकाकडे दे. पण यावेळी मात्र राममंदिराच्या पुजाऱ्याला बरोबर घेऊन जा. त्याच्या उपस्थितीत ते पैसे तू देवनारायणजवळ दे." सकलानंदने सांगितलं. नंतरच्या गुरुवारी त्याप्रमाणे शिवानंदने केले आणि पुजाऱ्याला बरोबर नेले. त्याच्यासमक्ष ते पैसे देवनारायणजवळ दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवानंद सकलानंदाला भेटला व त्याने विचारले, "आता यानंतर मी काय करूं ते सांगा." "आत्ताच तिथे जा आणि ते पांचशे रुपये परत माग." सकलानंदने सल्ला दिला. शिवानंदने परत जाऊन ते पैसे देवनारायणकडे मागितले. पुजाऱ्यासमक्ष पैसे दिलेले होते, म्हणून ती रक्कम देवनारायणने निमूटपणे परत केली. ते काम झाल्यानंतर शिवानंद पुन्हां सकलानंदकडे आला व त्याने विचारले, "पण ते जुने पांचशे रुपये कसे वसूल करायचे ते कांही माझ्या लक्षांत येत नाही." "तो कांही विशेष गंभीर प्रश्न नाही. आज संध्याकाळी पुजाऱ्याला बरोबर घेऊन तू पुन्हां खानावळीत परत जा आणि देवनारायणकडे तू दिलेले पांचशे रुपये परत माग." सकलानंदने सल्ला दिला. शिवानंद पुजाऱ्याला घेऊन खानावळीत गेला आणि त्याने आपले पांचशे रुपये मागितले. देवनारायणने कांहीही न बोलता मुकाट्याने पांचशे रुपये काढून दिले. शिवानंद खूष झाला आणि रकमेची वसुली झाल्याबद्दल सकलानंदना मनापासून धन्यवाद देऊ लागला. तेव्हां सकलानंदने त्याला हंसतहंसत म्हटले, "पैशाच्याबाबतीत नेहमी खूप काळजी घ्यायला हवी. लबाड लोक जंगलात, खानावळीत किंवा गल्लीत देखील असतात."