All Marathi Stories

विचित्रपुरी

मंदगिरी नावाच्या गावी गोपू नावाचा एक तरुण युवक राहत असे. त्याला त्याची आजी त्याच्या लहानपणी एक गोष्ट सांगत असे. म्हणे त्या गावाच्या पश्चिमेला विचित्रपुरी नावाचे एक गाव आहे. त्या गावातल्या रहिवाशांना काही दैवी शक्ती प्राप्त होत्या वगैरे वगैरे. त्या गोष्टीचा ठसा गोपूच्या मनावर खोल बसला होता. गोपू मोठा झाला तोपर्यंत त्याची आजी वारली होती. परंतु तिने विचित्रपुरीची जी गोष्ट सांगितली होती त्या गोष्टीचा ठसा अजून कायम होता. ती गोष्ट खरी असावी असे गोपूला फार वाटे. त्या 'गोष्टीची' खात्री करून घेण्याची उत्सुकता नित्य वाढत गेली. त्याने पुष्कळ प्रयत्न करून पाहिला. कित्येकांना विचारले; पण प्रत्येकाने 'असं गाव आम्ही नाही बुवा ऐकलं' असेच उत्तर दिले. काहींनी तर असेही सांगितले की असं एखादं गाव असणेच अशक्य. तरी गोपूच्या मनात ती गोष्ट घर करून बसली होती व त्याला वाटे की असं गाव नक्कीच असलं पाहिजे. एकदा गोपू कोणत्या तरी कामानिमित्त परगावी गेला. परंतु येताना वाट चुकून तो कोठे तरी अडकला. नेमका त्यावेळी फार मोठा पाऊस पडला आणि तो वाट शोधत कोणत्या तरी दुसऱ्या गावी आला. त्या गावात चालत असता त्याने एकाला त्या गावाचे नाव विचारले- "या गावाचे नाव काय हो?" तो माणूस म्हणाला-"म्हणजे तुम्हाला माहीत नाही का? ही विचित्रपुरी आहे!" ते उत्तर ऐकून गोपूला परमानंद झाला. त्याला वाटलं की उशिरा का होईना आजीने सांगितलेल्या गावी आपण येऊन पोहोचलो. त्याला वाटलं की आपण केवढा विजय मिळवला? तो त्याच आनंदात त्या गावात फिरू लागला. वाटेत त्याला एक फळांचे दुकान दिसलं. त्या दुकानात पिकलेली मोठमोठी सुंदर केळी होती. ती केळी दिसताच त्याला भूक लागली. त्याने दुकानात जाऊन एका रुपयाची केळी विकत घेतली आणि तेथून निघून गेला. थोडे अंतर चालून गेल्यावर दुकानदाराला पैसे न दिल्याचा त्याला आठवले. त्याने परत येऊन दुकानदाराची माफी मागितली आणि रुपया द्यायला खिशात हात घातला. तेव्हा दुकानदार म्हणाला- "अहो, तुम्ही मला एक रुपया दिलात की! विसरलात वाटतं?" गोपूने चकित होऊन आपल्या खिशात हात घातला व पैसे काढून मोजून पाहिले. एक रुपया कमी होता. त्याला वाटलं की आपण रुपया दिला व आपणच विसरलो. तेथून गोपू आणखी थोडं अंतर पुढे गेला. त्याला एक माणूस कोणाचा तरी तुटलेला पाय उचलून घेऊन जात असलेला दिसला. गोपूने त्या माणसाला विचारले-"तू हा कोणाचा पाय कोठे घेऊन चालला आहेस?" तो म्हणाला-"हा पाय माझ्या धाकट्या भावाचा आहे. त्याला एक गळू झालं आहे. ते कापून पट्टी बांधून आणायला वैद्याकडे नेतो आहे." ते ऐकून गोपूला वाटले की आपल्या बेड तर लागलं नाही? तरी तो त्या माणसाच्या पाठोपाठ पाहायला निघाला. त्या माणसाने तो पाय नेऊन वैद्याला दाखविला. वैद्याने गळू कापून औषध लावले व पट्टी बांधली, तेव्हा तो माणूस तो पाय घेऊन आपल्या घरी गेला. खाटेवर पडलेल्या आपल्या धाकट्या भावाच्या मोडक्या पायाला तो पाय लावल्याबरोबर चिकटला आणि भाऊ चटदिशी खाटेवरून उठून उभा राहिला व घोड्यासारखा चालला. नंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लहर दिसू लागली, जणुकाही तो इलाज झाल्याने त्याचे समाधान झाले आहे. गोपूने त्या माणसाला सुरुवातीपासून आपली ओळख सांगून आजीने सांगितलेली गोष्टपण सांगितली. त्या दिवशी रात्री दोघां भावांनी आग्रह करून त्याला आपल्या घरी जेवायला राहायला सांगितले. जेवल्यानंतर झोपायच्या आधी तिघे बोलत बसले असतां मोठया भावाच्या डोळयात एक किडा गेला. तो गोपूने पाहिला. म्हणाला-"तुमच्या डोळयात पडलेला किडा मी काढतो, फुंकर घालून!" "काही गरज नाही हो!" असं म्हणत त्या भावाने आपले बुबुळ हाताने काढून ते फिरवून पाहून त्याला लागलेला किडा रुमालाने पुसला आणि बुबुळ पुन्हा जागच्या जागी ठेवून दिले. नंतर गोपूशी पुन्हा बोलू लागला, जणु काही, काही विशेष घडलं च नाही! दुसऱ्या दिवशी गोपूला वाटलं की ते गाव सोडून लगेच निघून जावे. कारण त्या गावच्या लोकांची राहणी त्याला विचित्रच वाटली व त्याला त्यांची धास्ती वाटली. परंतु दोघां भावांनी त्याला आणखी चार दिवस राहण्याचा आग्रह केला. गोपू म्हणाला-"मी राहलो असतो हो, परंतु माझी घरात कित्येक कामे पडून राहिली आहेत. पावसामुळे मी अडकून राहिलो, म्हणून इतका वेळ तुमच्याबरोबर राहू शकलो. आता तास भर सुद्धा राहा म्हणालात तरी मला राहतां येणार नाही. माफ करा!" असे सांगून गोपूने तेथून पाय काढला आणि आपल्या गावची वाट धरली. ते दोघे भाऊ थोडे रागानेच म्हणाले-"तर मग जा मसणात!" परंतु दुसऱ्याच क्षणाला गोपू आपल्या घरीच होता. त्याला आश्चर्य वाटलं की आतापर्यंत घडलं ते सर्व स्वप्न होतं की मनाचा केवळ भ्रम होता? आणि ती विचित्रपुरी...?