राक्षसाचे दुकान
फार प्राचीनकाळी राक्षस राज्यात धर्मनन्दन नावाचा एक राक्षस रहात असे. त्याला राक्षसांची वर्तणूक मुळीच आवडत नसे. उलट त्यांच्यात मोठे मानले जाणारे लोक त्याला म्हणत, "हे बघ, हरीण हे एक गरीब जनावर आहे. गवत खाऊन, पाणी पिऊन, इतर कुणाला कसलाही त्रास न देता हे प्राणी आपले आयुष्य घालवत असतात. पण वाघ हिंस्र प्राणी आहे. इतर प्राण्यांची शिकार करून, तो त्यांना मारून खातो. म्हणून असं म्हणणं योग्य नव्हे की हरीण चांगला प्राणी आहे अन् वाघ तेवढा वाईट. प्रत्येक जनावर आपापल्या पद्धतीनं जगत असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या जगण्याची अन् मनुष्यप्राण्यांच्या जगण्याची निरनिराळी रीत आहे. आपण राक्षस पद्धतीने जगतो अन् तसंच जगणं आवश्यक आहे."
तरीही धर्मनन्दनला राक्षसपद्धतीने रहाणे आवडेना. राक्षस गरीब प्राण्यांना फार निर्दयीतेने मारत असत अन् त्यात त्यांना आनन्द वाटे. आपल्या उपकारकर्त्यावरही ते अपकार करत असत.
धर्मनन्दनला हे सारे सहन न झाल्याने तो आजारी पडला. त्याच्या आई बापांनी आपल्या राक्षस जमातीच्या वैद्याला बोलावून घेतले. धर्मनन्दनला बरेच प्रश्न विचारल्यावर वैद्य त्याला म्हणाला, "चुकून तुझा राक्षसकुलात जन्म झाला आहे. तुझा रोग तर मानसिक आहे, तू काही काळ मनुष्य राज्यात जाऊन रहावंस हे बरं. पण तिथे राहिलास तरी महिन्यातून कमीत कमी एका माणसाला तरी मारून खात जा. ज्या दिवशी पुन्हा आपल्या राज्यात येणार रहावंस तुला वाटेल, त्या दिवशी समज, की तुझा आजार दूर झालाय!"
वैद्याची ही आज्ञा समजून धर्मनन्दनने एका नगरात फिरत राहून मानवांच्या बाबत बरेच काही ज्ञान संपादन केले.
धर्मनन्दनला माणसांची ही जीवनपद्धती फारच आवडली आणि त्याने त्याच नगरात राहण्याचे ठरवले. त्यानुसार त्याने एक छानशा तरुणाचे रूप धारण केले. एके दिवशी त्याला एक सुंदर तरुणी दिसली. तिच्याशी आपण लग्न करावे असे त्याला वाटले.
या तरुणीचे नाव होते लता. ती एक फारच चांगली मुलगी होती, पण अत्यन्त गरीब होते तिचे कुटुम्ब. तिचा बाप आजारी असल्याने नेहमी खाटेवर पडून असे. आई दोन-चार घरी भांडी घासून थोडे पैसे मिळवी. भाऊ चांगला सुशिक्षित होता, पण बेकार होता. त्याला कुठेच नोकरी मिळत नव्हती. शरीर-कष्टाची कामे करणे त्याला आवडत नसे. काही काम करून संसाराला मदत करावी अशी लताची इच्छा होती, पण वयात आलेल्या मुलीने बाहेर कोठे काम करावे हे कुटुम्बाच्या रिवाजात बसण्यासारखे नव्हते.
एके दिवशी देवळात जात असलेल्या लताला गाठून धर्मनन्दनने निःसंकोचपणे तिच्याजवळ आपले प्रेम व्यक्त केले. तिला हसू आले, पण त्या हसण्यातही विषाद भरलेला होता. ती म्हणाली, "माझं लग्न माझ्या इच्छे-अनिच्छेवर अवलंबून नाही. याच गावात आमचा एक दूरचा नातेवाईक आहे. एक वर्षापूर्वी त्याची बायको मेलीय. त्याची इच्छा आहे की, माझ्याशी दुसरं लग्न करावं. त्याची इच्छा पुरी केली, तर तो माझ्या बाबांना औषधोपचार करणार आहे, भावाला नोकरीही पाहणार आहे. थोरली मुलगी तर माझ्याच वयाची आहे. माझ्या घरातल्यांना कुणाला हे लग्न पसंत नाही. पण आमचं घरही त्याच्याकडे गहाण पडलेलं आहे. आता एक आठवड्याच्या आत आम्ही आमची संमती कळवली नाही, तर तो आम्हाला घराबाहेर काढील."
"त्याचं कर्ज मी चुकवीन अन् तुझ्याशी लग्न करीन." धर्मनन्दनने लताला आश्वासन देत म्हटले.
"पण मी तर तुम्हाला प्रथमच सांगितलंय की, माझं लग्न ही माझ्या हातातली गोष्ट नव्हे. आमच्याकडच्या मोठ्या माणसांशी तुम्ही याबाबत बोला." असे म्हणून लता निघून गेली.
धर्मनन्दनने लताच्या आई-वडिलांना भेटून तिला मागणी घातली. त्यांनी त्याची माहिती विचारली. त्याला खोटे तर सांगायचे नव्हते, पण खरी गोष्ट त्याने लपवली. जात, गोत्र इत्यादि माहीत नसणाऱ्या माणसाशी आपल्या मुलीचे लग्न करून देणे त्यांना पसंत नव्हते.
पुन्हा एकदा धर्मनन्दन देवळात जात असलेल्या लताला भेटला. तो तिला म्हणाला, "तुला कबूल असेल, तर आपण तुझ्या आई-बाबांच्या संमतीवाचूनच लग्न करू या."
लता म्हणाली, "माझ्याच्यानं हे होणार नाही. माझं भाग्य चांगलं असेल तर माझ्या त्या नातेवाईकाला एखादा राक्षसचा गिळून टाको." तिच्या या उत्तराने धर्मनन्दनला धक्काच बसला! त्याला या शहरात येऊन एक आठवडा लोटला होता. एक दिवस रात्री त्याने लग्नासाठी लतावर दबाव आणणाऱ्या त्या माणसाला खाऊन टाकले. आपण याप्रकारे एक सत्कृत्यच केलंय याबद्दल त्याला समाधान होते.
लताच्या लग्नाची गोष्ट अशा प्रकारे तात्पुरती पुढे ढकलली गेली. एवढ्यात एक महिना पूर्ण व्हायला आला. कुणालाही खायची त्याला इच्छा होत नव्हती. शेवटी त्याने एक दिवस एका संन्याशाला पकडले. संन्याशाला नाहीतरी आपले असे कोणी नव्हतेच. तेंव्हा यालाच खाल्ले, तर कुणाचे काही बिघडणार नाही!
पण संन्यासी राक्षसाला म्हणाला, "बेटा धर्मनन्दन, तू राक्षस असलास तरी सन्मार्गी आहेस. मी नसेन तर मानवजातीचं नुकसान होईल अन् मला खाल्ल्यानं तुला पाप लागेल."
संन्याशाने आपले नाव घेतले, म्हणून धर्मनन्दनच्या मनात त्याच्याबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. त्याने संन्याशाला आपल्याला चांगला सल्ला देण्याची विनंती केली. तेंव्हा संन्याशाने लताच्या एका नातेवाईकाचा उल्लेख करून म्हटले, "त्याचं नाव आहे निर्वाक. त्याच्या बायकोचं नाव आहे कात्यायिनी. त्यांना कोणी मूलबाळ नसल्यानं मी त्यांना एका मुलाला दत्तक घेण्याविषयी सुचवलं होतं. पण अजून ते कुठल्या निर्णयावर आलेले नाहीत."
नातेवाईकाचे पूर्ण वर्णन सांगून संन्यासी धर्मनन्दनला म्हणाला, "याच नगरात वक्रबुद्धी नावाचा एक करोडपती माणूस आहे. कित्येक लोकांना आजवर फसवलंय त्यानं. पण सामान्य माणसं त्याला तोंड देऊ शकत नाहीत. तू तर शक्तिशाली अन् मायावीही आहेस. गरीबांना स्वस्त दरात वस्तु विकायचं एक दुकान उघड तू. सर्व 'चांगला माणूस' म्हणून तुझी स्तुती करतील. तुझं जेंव्हा चांगलं नाव होईल तेंव्हा मी सांगितलेला तो निर्वाक तुला नक्की दत्तक घेईल. यानन्तर तुला कोणी तुझी जात, कुल, गोत्र वगैरे विचारू शकणार नाही."
त्यानंतर एक रिकामी जागा पाहून त्याने तिथे आपले सुन्दरसे दुकान थाटले. हळूहळू धर्मनन्दनचे दुकान चांगले चालू लागले, ग्राहकांची संख्या वाढू लागली. एक महिना पूर्ण झाला, पण यावेळी खाण्यासारखा कोणी योग्य माणूस त्याला सापडला नाही. आपल्या आहाराबाबतही धर्मनि चालणाऱ्या राक्षसाला समजेना की आता काय करावे.
मधल्या काळात धर्मनन्दनच्या दुकानावर वक्रबुद्धीची नजर पडली. दिवसेंदिवस प्रगति करणाऱ्या धर्मनन्दनचा काटा काढायचे त्याने ठरवले. एका मल्लाची त्याने या कामासाठी निवड केली. तो आपोआपच त्याच्या तावडीत सापडला. या महिन्याची आपल्या आहाराची अडचण धर्मनन्दनने त्याला खाऊन टाकून सोडवली.
"महाराज, मला मानवांच्यातच रहायची इच्छा आहे. त्यामुळे मला दर महिन्याला एका माणसाला खाऊन टाकायचा नियम पाळावा लागेल. इथली दुष्ट माणसांची संख्याही हळूहळू कमी होतेय. तेंव्हा आता पुढे काय करावं अशी पंचायत पडलीय मला."
संन्यासी हसून म्हणाला, "मग तूही एक माणूस बनून जा ना! म्हणजे तुझी समस्या आपोआप सुटून जाईल. यासाठी एकच मार्ग आहे. तुझं राक्षसरूप स्वीकार करेल, अशा एका माणसाची आपल्याला गरज आहे."
धर्मनन्दन आपल्या दुकानाकडे परत फिरला. तो आता याच विचारात चूर झाला की आपलं राक्षसरूप स्वीकारणारा कोण माणूस आढळेल आपल्याला? इतक्यात वक्रबुद्धी तिथे येऊन म्हणू लागला, "दहा हत्तींचं बळ अन् बारा सिंहांचा पराक्रम अंगी असणारा मल्ल मी इथे पाठवला होता. पण आता त्याचा कुठे पत्ताच लागत नाही! नगरातल्या सर्वात प्रसिद्ध तान्त्रिकाला विचारलं, तेंव्हा कळलं, की कोणी एक राक्षस लपून-छपून तुला मदत करत असतो. बोल, कुठं आहे हा राक्षस? दाखव बरं! पुढे आला की त्याला ताबडतोब इथे जमिनीतच गाडून टाकीन मी!"
त्याच्या बोलण्यावर जोराजोराने हसत धर्मनन्दन म्हणाला, "अरे वा! अगदी शंभर टक्के वक्रबुद्धीच आहेस तू! राक्षस इथे का राहील? तो तर राक्षस राज्यात राहील ना. थांब मी तुला राक्षस-राज्याची नीट माहिती देतो." अन् त्याने वक्रबुद्धीला राक्षसराज्याचा पत्ता अन् वर्णन सांगितले.
ते ऐकून वक्रबुद्धी खुश होऊन बोलू लागला, "अरे वा! अशा ठिकाणी रहायला मिळणाऱ्याला भाग्यवानच म्हणायला हवं. तू फक्त अगदी एकदाच पाठव ना मला त्या राज्यात!"
"अं ss, पाठवू शकेन मी! पण तसं करण्यानं मलाही काही लाभ व्हायला हवा न? तू आपली सगळी इस्टेट माझ्या नावे करून द्यायची व्यवस्था कर, मी तुला सर्व शक्तींनी युक्त बनवून राक्षसराज्यात पाठवून देतो." धर्मनन्दन म्हणाला.
वक्रबुद्धी विचार करू लागला, "सगळ्या राक्षसी शक्ती जर आपल्याला मिळत असतील, तर नंतर आपण याची सगळी इस्टेट पुन्हा मिळवू शकू; मनात आलं तर राजाही बनू शकू." यामुळे लोभात पडून त्याने सर्व मान्य केले.
धर्मनन्दनने आपली अंगठी काढून वक्रबुद्धीच्या बोटात अडकवली. झालं! वक्रबुद्धी एकदम अदृश्यच झाला! नंतर संन्याशाला भेटून धर्मनन्दन म्हणाला, "महाराज, तुम्हाला तर सर्व माहीतच आहे. राक्षसराज्यात प्रवेश करणाऱ्याचा स्वभाव एकदम बदलून जातो. तेंव्हा आता त्याचा तिथून परत येण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता राक्षस नसून संपूर्ण मानव बनलो आहे. वक्रबुद्धीची सारी इस्टेटही आता माझ्या हाती आहे. दुकान नेहमीप्रमाणे चालवूनही मी आता सामान्य जनतेची सेवा करू शकेन."
संन्याशाने धर्मनन्दनला आशिर्वाद दिला. निर्वाकचा वारस बनून धर्मनन्दनने लताशी लग्न केले. तिच्या भावाला आपल्या दुकानात नोकरी दिली. लोकही त्या दुकानाला आता 'राक्षसाचे दुकान' म्हणून संबोधू लागले.