मंत्री मिलन
गोष्ट जुन्या काळातील आहे. कोसल देशावर राजा चित्रध्वज राज्य करीत असे. त्याचा सुबुद्धि नावाचा एक मंत्री होता. आपला मंत्री दुराचारी आहे हे जाणायला राजाला फार वेळ लागला नाही. तरी पण हे आपल्याला जसं काही माहीत नाही असं भासवीत राजा एका सुयोग्य मंत्र्याच्या शोधात राहिला. शेवटी एका गावी एक गुरुकुल चालवणारा युवक मिलन राजाला मंत्री-पदासाठी योग्य वाटला. राजाने आपल्या मनातील गोष्ट एका पत्राद्वारे मिलनला कळवली.
पत्र वाचून मिलनला मोठं आश्चर्य वाटलं. तो लगेच राजधानीच्या वाटेला लागला. चित्रध्वज राजाला भेटून त्याने सांगितले— "राजन्, गुरुकुल चालवण्याचे काम मी मोठ्या संतोषाने करीत आहे. राजनीतीकडे माझा ओढा नाही, नि मला ती आवडत ही नाही. आपल्याला हे पत्र लिहून कळवणं मला योग्य वाटलं नाही, म्हणून मी स्वतःच आपल्याकडे आलो. माझी मंत्री बनण्याची इच्छा नाही. महाराज, आपण मला क्षमा करावी."
यावर राजा चित्रध्वज म्हणाला— "तुम्हांला अधिकार-पदाची लालसा नाही. तुमच्या सारखा माणूसच मंत्री बनायला सर्वस्वी योग्य. माझा मंत्री सुबुद्धि अधिकाराच्या मोहानेच दुर्वर्तनी नि दुराचारी बनला आहे. पैशांच्या लालसेने तो जन-कल्याण विसरला. म्हणूनच मी त्याला काढून टाकू इच्छितो. प्रजेच्या कल्याणासाठी आपण मंत्री-पद स्वीकारावं असं मला वाटतं. नालायक व दुर्वर्तनी लोक शोधून काढून त्यांना नोकरीवरून काढून टाकणं योग्य. अधिकार-पदावर सुयोग्य व्यक्तींची नेमणूक करणं इष्ट. आपले गुरुकुल व्यवस्थित चालू राहील यासाठी मी योग्य ती व्यवस्था करीन."
मिलन राजाची आज्ञा नाकारू शकला नाही, त्याने मंत्रीपद स्वीकारलं!
मिलनला मंत्री बनवून राजाने आपल्याला पदच्युत केलं याचं सुबुद्धीला मोठं आश्चर्य वाटलं. हे त्याला अमळ अगोदर कळतं, तर त्याने आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला असता. पहिल्याच दिवशी मिलनने सुबुद्धीच्या अनेक चुका शोधून काढल्या नि त्याला त्यांबाबत स्पष्टीकरण विचारले.
काय उत्तर द्यावं हे सुबुद्धीला सुचेना. तो म्हणाला— "चुका झाल्या हे तर खरं! पण माझा काही अपराध नाही. आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांवर मी विश्वास ठेवला. काही निवडक गोष्टी सोडल्या, तर माझ्या हाताखाली काम करणारे अधिकारीच सर्व कारभार चालवीत आहेत." असे सांगून सर्व चुका त्याने दुसऱ्यांच्या माथी मारल्या.
सुबुद्धीच्या हाताखाली जवळ जवळ शंभर अधिकारी होते. सर्वांना भेटून मिलनने विचारले. सर्व जण म्हणाले— "आमच्याकडे जी कामे सोपवली ती आम्ही सर्वांनी केली. काही चूक असली तर मंत्रीमहाशयांची!"
"याचा अर्थ असा की मंत्र्याने अनेक अपराध केले आहेत. हा मोठा स्वार्थी नि दुष्ट दिसतो आहे. मंत्र्याचे अपराध सिद्ध करण्यासाठी तुमच्या जवळ काही पुरावे आहेत?" मिलनने अधिकाऱ्यांना विचारले.
"एकच नाही, अनेक! मंत्री सुबुद्धीचे अपराध उघडकीस आणण्यासाठी आमच्या पैकी प्रत्येका जवळ शेकडो पुरावे आहेत." एका अधिकाऱ्याने माहिती पुरवली.
"ठीक आहे. उद्या आपण सर्व जण असेच बसू. मग मी सुबुद्धीसाठी मला पाहिजे ते सर्व जाणून घेईन." असं सांगून मिलनने सर्वांना रवाना केले.
नंतर मिलन सुबुद्धीला घेऊन राजाकडे आला नि राजाला निवेदन केलं— "महाराज, सुबुद्धीने आपल्या हाताखाली असलेल्या अधिकाऱ्यांवर सत्ता गाजवली, पण त्यांचं प्रेम संपादन केलं नाही. आणि म्हणून तो खुर्चीवरून खाली उतरताच खालचे सर्व अधिकारी त्याच्या विरुद्ध बोलू लागले."
राजाने विचारले— "मग याला आता कोणती शिक्षा करायची बरं?"
मिलन उत्तरला— "प्रभु, ते आपण आता उद्या पाहू."
शंभर सरकारी अधिकाऱ्यांशी मिलन काय प्रश्नोत्तरे करतो हे राजाला पाहायचं होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी राजाही मिलनबरोबर बसला. राजा नि मिलन राजवाड्यातील एका दालनात बसले आणि त्यांनी एकेका अधिकाऱ्याला बोलवलं.
पहिला अधिकारी आला. मिलन त्याला म्हणाला— "माजी मंत्री सुबुद्धिबद्दल तुला जे काही सांगायचे आहे ते सर्व सांग."
लगेच तो अधिकारी सुबुद्धीच्या कुकर्मांचा पाढा वाचू लागला. त्याला मध्येच थांबवून मिलन म्हणाला— "हे सगळं ऐकायची माझी मुळीच इच्छा नाही. सुबुद्धिबद्दल काही चांगलं सांगण्यासारखं तुझ्याजवळ असेल तर ते मला पाहिजे. नाही तर तू जाऊ शकतोस."
तो अधिकारी काहीही सांगू शकला नाही. तेथून परत फिरला. यानंतर असेच आणखी काही अधिकारी आले नि परत गेले. त्यांच्यापैकी दहा अधिकाऱ्यांनी सांगितलं की सुबुद्धीमध्ये काही चांगले गुणही आहेत. प्रमुख गुण म्हणजे, आपल्याला पाहिजे असतील ती कामे सुबुद्धि आपल्या अधिकाऱ्यांना समजावून सांगून अथवा धाकदपटशा दाखवून करून घेतो.
सर्व जण गेल्यावर मिलन राजाला म्हणाला— "महाराज, ज्या दहा अधिकाऱ्यांनी सुबुद्धीत काही गुण पाहिले त्यांना फक्त कामावर ठेवावे, बाकीच्या नव्वदांना काढून टाकावे. इतकंच नव्हे, तर माजी मंत्री सुबुद्धि याला तुरुंगातील कैद्यांवर देखरेख करण्याचं काम द्यावं. त्या अधिकार-पदावर तो चांगले काम करील."
राजाने आश्चर्याने विचारले— "हा निर्णय कसा काय घेतला आपण? अपराधी सुबुद्धीला एक अधिकारी बनवण्याची आपण शिफारस करीत आहात! आणि त्याच्या आज्ञांचं पालन करणाऱ्यांना काढून टाकायचं म्हणता? हा कुठला तुमचा न्याय?"
यावर हसत मिलनने आपल्या निर्णयाचे समर्थन केले— "प्रभु, सुबुद्धीने अपराध केला असणे शक्य आहे. पण त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कोणीही त्याबाबत आपल्याकडे तक्रार केलेली नाही. याचा अर्थ असा की त्याने सर्वांना धाकात ठेवले होते. यासाठीही माणसाच्या ठिकाणी काही योग्यता असावी लागते. ही योग्यता आपण उपयोग करून घेतली पाहिजे. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना समजावून सांगून वा धाकदपटशा दाखवून काम करून घेण्याची योग्यता त्याच्यात आहे हे आपण कबूल करावे. तुरुंगातील अधिकारी म्हणून तो काय करीत आहे, इकडे मी लक्ष ठेवीन. त्याच्याकडून अनेक कैद्यांमध्ये सुधारणा घडवून आणता येईल. या नोकरीमुळे सुबुद्धीला आपला बराचसा वेळ कैद्यांबरोबर काढावा लागेल. हीच त्याला पुरेशी शिक्षा आहे. आता या नव्वद अधिकाऱ्यांची गोष्ट पाहा. यांना आपल्या पुढील माणसात फक्त दोष तेवढे दिसतात. दुसऱ्यातील गुण पाहण्याची त्यांना सवयच नाही. अशा लोकांना अधिकारी बनण्याचा हक्कच नाही. म्हणून माझ्या योजनेनुसार प्रजेला जराही उपयोगी न पडणाऱ्या या नव्वद अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणेच योग्य आहे."
प्रशंसेच्या सुरात राजा चित्रध्वज म्हणाला— "मला वाटलं होतं त्याहून अधिक योग्यता आहे आपली! आपण खरोखरीच आदर्श मंत्री व्हाल, यात मला संशय नाही."
यानंतर मंत्री मिलन याच्या योग्य सल्ल्यानुसार राजा चित्रध्वज अनेक वर्षे सुखा-समाधानाने राज्य करीत राहिला.