भूदान
फूलपूर नावाच्या गावाबाहेरच्या भागाला एक मोठी पडीत जमीन होती. त्या जमिनीला शाप आहे असे गावकरी मानीत. कारण एका काळी त्या जमिनीत सोन्यासारखे पीक येत असे. परंतु केव्हातरी एकदा फार मोठा पूर येऊन पीक काढणे अशक्य झाले. तेव्हापासून ती जमीन पडीतच राहिली. त्यानंतर काही दिवसांनी जंगली गवत उगवून ती जमीन शेतीला निरुपयोगी ठरली.
त्या जमिनीची मालकी रघुराम नावाच्या एका सधन शेतकऱ्याकडे होती. परंतु तो स्वभावाने फार चिक्कू होता.
त्या गावातल्या एका सधन शेतकऱ्याचा रतन नावाचा मुलगा शेतकीचा पदवीधर झाल्यावर आपल्या गावी परत आला. ती पडीत जमीन पाहून त्याला तिच्यात पीक काढता येईल असे वाटू लागले. कित्येक गरीब शेतकऱ्यांना राहायला सुद्धा घरे नव्हती. अशा परिस्थितीत इतकी मोठी जमीन पडीत म्हणून सोडून द्यायला त्याचे मन मानेना. काय वाटेल ते करून त्या जमिनीत पीक काढून दाखवायचे त्याने ठरविले.
त्याने जमिनीतली थोडी माती नेऊन परीक्षा करून पाहिली तेव्हा एका विशिष्ट रसायनाच्या अभावी ती निरुपयोगी झाल्याचे समजले. त्यात विशिष्ट प्रकारचे खत घातल्यास पीक काढता येईल हे सिद्ध झाले. ती जमीन रघुरामकडून दान करवून घेऊन गरीब शेतकऱ्यांना वाटता येईल, असा एक विचार त्याच्या मनात आला.
परंतु रघुरामकडून दान करविणे शक्य होईलसे वाटत नव्हते. परंतु काही गोष्टींचा अंधविश्वास त्याच्या मनात दृढमूळ झाला होता. त्याचा फायदा घेऊन काही करता आले तर करण्याचे रतनने मनाशी ठरविले. या बाबतीत शेजारच्या शहरात राहणारा देवाशीष नावाचा मांत्रिक काही मदत करू शकेल का विचारून पाहण्याचा विचार त्याच्या मनात आला. तो रतनच्या ओळखीचा होता. त्याला त्याने विचारून पाहिले तेव्हा त्याने एक उपाय रतनला सुचविला.
एकदा रतन उजाडताच रघुरामच्या घरी गेला आणि नमस्कार करून कुशल वार्ता विचारली. रघुराम म्हणाला— "सर्व ठीक आहे. या वर्षी पीकपाणी देखील चांगले निघाले आहे. परंतु काय रे, तू इतक्या लवकर कसा काय उजाडलास?"
"काका, तुमच्या पडीत जमिनीचे एक विचित्र स्वप्न काल पडलं, ते सांगावे म्हणून आलो होतो. मला रात्री अन्नपूर्णेचा दृष्टांत झाला. तिने मला एक वर दिला. तिने दहा वेळ तुमच्या नावाचा उल्लेख केला असेल आणि म्हणाली— 'मी कशाही प्रकारच्या जमिनीत लागवड केली तरी उत्तम पीक निघेल.' ती पुढे म्हणाली— 'रघुरामकडे जाऊन त्याला तुला प्राप्त झालेली अद्भुत शक्ती दाखव आणि त्याच्याकडून ती पडीत जमीन दान करवून गरीब शेतकऱ्यांना वाटून दे. तू आपली अद्भुत मंत्रशक्ती दाखविल्यावरही रघुरामने त्या जमिनीचे दान केले नाही तर मी त्याला शाप देऊन त्याची सर्व सुपीक जमीन निरुपयोगी करून टाकीन. त्याचा जवळचा सर्व पैसा धुळीला मिळवीन, त्याच्या गोठ्यातली सर्व गुरे पटापट मरतील. त्याच्या घराकडे कुत्रीदेखील फिरकणार नाहीत.'" रतनने आपले स्वप्न वर्णन करून सांगितले.
रघुरामने सर्व शांतपणे ऐकून घेऊन विचारले— "तुझी ती अद्भुत शक्ती काय ती तरी पाहू दे."
"ती गोष्ट मला तरी अजून कोठे कळली आहे? आज संध्याकाळी पूजा वगैरे करून पाहतो, म्हणजे काय ते कळेल. परंतु पहिल्याने हे सांगा, देवीने सांगितल्यासारखे करायला तुम्ही मान्य करता का?"
"तुझी अद्भुत शक्ती काय ती पाहू दे, ती पटली तर देवी म्हणाली तसे करायला मी तयार आहे," रघुराम म्हणाला.
त्या दिवशी संध्याकाळी रतन काही वडीलधाऱ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन रघुरामच्या घरी गेला. त्याने आपल्या खिशातून एक अष्टकोनी पेला बाहेर काढला आणि तो खोलीत एका कोपऱ्यात टेबलावर ठेवून म्हणाला— "कोणी तरी जाऊन त्या पडीत जमिनीतली एक मूठभर माती घेऊन या."
रघुरामचाच एक मुलगा जाऊन माती घेऊन आला. रतनने ती माती पेल्यात टाकून त्यावर एक हातरुमाल झाकायला म्हणून टाकला. नंतर टेबलासमोर हात जोडून डोळे मिटून ध्यानमग्न होऊन बसला. नंतर डोळे उघडून पेल्यावरचा रुमाल काढला. एक चमत्कार घडला. पेलाभर मातीच्या जागी धान्य होते.
"अन्नपूर्णा माता की जय!" सर्व शेतकऱ्यांनी जयघोष केला.
रघुरामच्या चेहऱ्यावर आश्चर्याबरोबर भय झळकू लागले. तो दाटलेल्या कंठाने म्हणाला— "मित्र हो, मी ती शाप पावलेली जमीन तुम्हाला देतो. कागद घेऊन या लिहून देतो."
एक वीतभर देखील जमीन नसलेल्या गरिबांना जमीन मिळाली. रतनने त्यांची एक सहकार समिती स्थापन करून सहकारी पतपुरवठा करविला आणि सहकार पद्धतीने, नवीन पद्धतीने बियाणे, खते वगैरे देववून त्या जमिनीत पीक काढले. शेतकऱ्यांच्या मेहनतीला यश आले आणि सोने पिकले. सर्व शेतकऱ्यांनी ते समसमान वाटून घेतले. सर्व गावकरी खूष झाले, एकट्या रघुरामचे तोंड उतरल्यासारखे दिसले.
तर मग, रतनने मातीचे धान्य कसे करून दाखविले हा प्रश्न राहिलाच! त्याने उपयोगात आणलेला अष्टकोनी पेला सामान्य पेला नव्हता. एकाच लांबी-रुंदीच्या पाठीलापाठ लावून आणि समोरचे प्रतिबिंब दर्शविणाऱ्या बाजू बाहेरच्या बाजूला राहतील अशा आरशाच्या दोन पट्ट्या पेल्याच्या मधोमध त्याचे दोन भाग करण्यासाठी ठेवल्या होत्या. आरशातल्या प्रतिबिंबांमुळे पेल्याचे अर्धे-अर्धे भाग पुऱ्या पेल्यासारखे भासत होते. एका रिकाम्या भागात माती घातली आणि तो समोरून दिसेल असा सुरुवातीला ठेवला आणि दुसऱ्या भागात पहिल्यापासून धान्य घालून ठेवले होते. फक्त प्रेक्षकांना दाखविताना रिकाम्या पेल्याची बाजू समोर ठेवून माती टाकली आणि वर रुमाल टाकला. परंतु रुमाल काढताना धान्याचा भाग पुढे करून ठेवला. प्रतिबिंबांमुळे अर्धी बाजू सुद्धा पुरा ग्लास असल्यासारखी भासत होती.