Bookstruck

बुद्धिमान पत्नी

केशवगुप्त नावाचा व्यापारी जेव्हा असाध्य रोगाने आजारी पडला व त्या आजारातून त्याच्या उठण्याची चिन्हे दिसली नाहीत, तेव्हा त्याच्या बरोबरीच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचा हिशोब करून त्याला डल्ला दिला व त्याची सर्व संपत्ती लुटली. आपल्या दीर्घकालीन आजारावर उपचार करून घेण्याकरिता केशवगुप्ताला घरातील सर्व किमती वस्तू व शेवटी शेवटी आपल्या बायकोचे दागिने सुद्धा विकावे लागले. परंतु तो थोडा आजारातून सुधारला आणि गरीब झाला. त्या दारिद्र्यात सुद्धा त्याने आपले धैर्य खचू दिले नाही आणि कोणाकडून तरी शंभर रुपये उधार घेऊन पुन्हा व्यापार करण्याचा मनाशी निश्चय केला. त्या विचारांती तो त्याच्या लहानपणाचा मित्र जगदीप याच्या घरी गेला. जगदीपने त्याचे मोठ्या आनंदाने स्वागत केले व सर्व हकीकत ऐकून म्हटले - "नारळाच्या झाडावरून नारळ काढणारा व नारळ विकणारा ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर असते. नारळ काढणारा जर झाडावरून खाली पडला तर पुन्हा झाडावर चढण्याचे धाडस करीत नाही. त्याने दुसरा काहीतरी धंदा करावाच पाहिजे." जगदीपच्या बोलण्यातले मर्म समजून त्याचा राग उफाळून आला, परंतु त्याने त्यावर नियंत्रण ठेवत म्हटले - "संकटाला घाबरून जो माणूस आपल्या धंद्यातून हात काढून घेतो, तो माझ्या दृष्टीने एक नंबरचा भ्याड असतो. तू बरोबरीची गोष्ट काढलीस म्हणून मी एक गोष्ट सांगतो. जरी का मी झाडावर चढणारा नसलो, तरी संकट आले तरी मी नेहमी सावधानीच बाळगली असते. व्यापाराच्या बाबतीत मी दुसऱ्या कामगारांविषयी यापुढे नेहमी जागरूक राहण्याचा प्रयत्न करीन." हे उत्तर ऐकताच जगदीपचे मन बेचैन झाले. तरी सुद्धा त्याने बरोबर प्रसन्न चेहरा करीत म्हटले - "केशव, तू तर छान सांगितले. परंतु सध्यातरी माझ्या व्यापाराच्या म्हणण्याइतका चांगला नाही. एका बाजूने ज्यांच्याकडून मी कर्ज घेतले आहे ते पाठीस लागले आहेत आणि ज्यांच्याकडून किंमत वसूल करायची आहे ते देत नाहीत, त्यामुळे अशा परिस्थितीत मी तुला शंभर रुपये कुठे उधार देऊ? पाहिजे तर हे सध्यातरी पाच रुपये घेऊन जा आणि बघ ते परत करण्याची जरूरी नाही." या गोष्टीवरून त्याने आपल्या मित्राची परीक्षा केली. त्याने जगदीपकडून मिळालेले पाच रुपये घेतले व तो इतर तीघां मित्रांकडे गेला. तिथे त्याने आपला सविस्तर वृत्तांत ऐकला. त्या सर्वांनी सुद्धा काहीबाही कारणे सांगून पाच रुपये देऊन त्याला परत न करण्याविषयी सांगून पाठवून दिले. केशवाने शेवट विचार केला की, आपल्याला शंभर रुपये मिळणे अशक्य आहे आणि तो परत घरी आला व त्याने आपल्या बायकोला घडलेली घटना सांगितली. वास्तविक गोष्ट ऐकून केशवच्या बायकोला अतिशय दुःख झाले. ती पतीला म्हणाली - "एवढ्या मोठ्या शहरात काय तुमचे थोडेच मित्र आहेत? तुम्ही तर इथेच जन्मलात, इथेच लहानाचे मोठे झालात व व्यापाराची सुरुवात सुद्धा केलीत. काय दुसरा कोणी तुम्हाला मित्र नाही?" केशव थोडा विचार करीत राहिला. नंतर दीर्घश्वास घेत म्हणाला - "माझे बालपणचे मित्र, व्यापाराच्या वेळी भेटलेले मित्र असे चाळीस एक नक्की निघतील." "तर मग तुम्ही मला त्यांची नावे व पत्ते लिहून द्या!" केशवची बायको म्हणाली. "यातून फायदा काय? खरे तर तुला काय करायचे आहे ते तर सांग?" केशवाने अचंबा वाटून विचारले. "मी काही करणार नाही पण काय करायचे आहे ते आपला मुलगा हरीगुप्त करेल." केशवच्या पत्नीने सांगितले. त्या दिवशी रात्री केशवाने आपल्या सर्व मित्रांची आठवण आणली व त्यांची नावे पत्ते लिहून ती बायकोच्या हातात दिली. दुसऱ्या दिवशी केशवच्या बायकोने आपल्या चौदा वर्षांच्या हरीगुप्ताच्या हातात तो कागद देत म्हटले - "बाळा, तू ह्या कागदावर लिहिलेल्या नावांच्या माणसांच्या घरी जा आणि त्यांना भेटून वडिलांनी शंभर रुपये उसने मागितले आहेत म्हणून सांग आणि ते द्यायला तयार झाले तर वडील येऊन घेऊन जातील असे सांग!" त्याच दिवशी संध्याकाळी हरीगुप्त एक पिशवी भरून पैसे घेऊन घरी परत आला. केशवला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने आपल्या मुलाला विचारले तेव्हा हरीगुप्त म्हणाला - "बाबा, आपल्या कोणत्याही मित्राकडे उधार घ्यायला शंभर रुपये नाहीत. परंतु प्रत्येकाने असे मनात योजून कोणी दहा तर कोणी पाच रुपये दिले. तुझे वडील पुन्हा व्यापार सुरू करू देत, हे पैसे परत न करण्याविषयी सुद्धा त्या सर्वांनी लिहून मला सांगितले व बजावले." केशवाने आपल्या पत्नीच्या चातुर्याची तारीफ केली. त्यानंतर त्याने हरीगुप्तच्या हातून पिशवी घेऊन पैसे मोजले तेव्हा त्यात एकूण ४०० रुपये निघाले. त्याला आनंद झाला. त्या पैशाने केशवाने एक छान धंदा सुरू केला व पाच-सहा वर्षांच्या आत तो आपल्या पूर्वस्थितीला आला.