Bookstruck

बाटलीत भूत

अशोकपूर हे एक श्रीमंत खेडे गाव होते. तेथे भातशेती होती. गावाच्या परिसरात खूप फळझाडे होती. गावकरी मेहनती होते. त्यांना देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नव्हती. त्या गावात यदुपती नावाचा एक श्रीमंत शेतकरी राहात असे. त्याचा मुलगा रूपलाल हा एक हुशार तरुण युवक होता. दिवाळीच्या वेळी त्या गावात दरवर्षी एक महिनाभर जत्रा भरत असे. जवळपासाच्या गांवांहून व्यापारी आणि निरनिराळे खेळ दाखविणारे व सहस्रावधी लोक जत्रेला येत. त्यावर्षी पीकपाणी उत्तम होते म्हणून जत्रा थाटाने भरली. जत्रेच्या व्यवस्थेची सर्व जबाबदारी रूपलालवरच होती. त्याने आपली ती जबाबदारी उत्तम प्रकारे बजावली. जत्रा चालू असता काही रानटी जातीचे लोक तेथे येऊन आपल्या राहूट्या व तंबू उभारू लागले. ते पाहून रूपलाल तेथे गेला. "तुमचे येथे काय काम रे?" त्याने त्यांना थोडे दटावून विचारले. "आम्ही कंदमुळे व वनस्पती औषधीद्रव्ये विकायला आलो आहोत," रानटी लोकांचा नायक म्हणाला. त्यांचा धंदा चोरी व लबाडी करण्याचा आहे, त्यांना मंत्रविद्यासुद्धा येते आणि भुतापिसाच्चांना वश करण्याची विद्यासुद्धा त्यांना येते हे त्याने ऐकले होते. तेव्हा त्यांच्याशी तंटा करण्यात अर्थ नाही असे समजून त्याने त्यांना झोपड्या, राहूट्या बांधू दिल्या. त्या जंगली लोकांनी झोपड्या बांधल्या. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच गावात भुरट्या चोऱ्या होऊ लागल्या. एका जव्हेऱ्याच्या घरात व एका व्यापाऱ्याच्या घरात शिरून चोरांनी हाताला आले ते उचलून नेले. जंगली लोकांच्या झोपड्यांची झडती घेतली तेव्हा चोरी गेलेल्या मालांपैकी फक्त एक दागिना सापडला. त्या जंगली लोकांपैकी दहा-बाराजण झोपड्यात नसल्याचे कळले. जंगली लोकांच्या नायकाला धरून खूप बडविले तरी त्याच्या अनुयायांनी चोरी न केल्याचे त्याने सांगितले. निरोपाय होऊन रूपलालने सर्व जंगली लोकांना पिटाळून लावले आणि चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यावर केली. जंगली लोकांच्या नायकाने निघून जाताना रूपलालला धमकावले— "तुला मी असा सोडणार नाही, लक्षात ठेव. आमच्या मंत्रबळाची तुला कल्पना नाही असे दिसते. तुझी मानगुटी धरायला मी पाठवतो एका भुताला. तू जिवंत असेपर्यंत ते तुला आतून पोखरून खात राहील, पहा तर!" जंगली लोक निघून जाण्यापूर्वी पोलीस शिपाई आले आणि त्यांनी सर्व जंगली लोकांना कैद केले. रूपलाल शूर धाडसी होता, परंतु त्याचा भुताखेतांवर विश्वास होता. म्हणून त्याने बाहेरून किती फुशारक्या मारल्या तरी त्याला भुताची दहशत बसली. कोणते तरी भूत आपल्या मानगुटी बसले असल्याचे त्याला वाटू लागले. त्याला रात्री झोप येईनाशी झाली. भयंकर स्वप्ने पडू लागली. डोळे बंद करून झोपावे तर समोर भुते नाचत असल्याचा भास होई. भीतीचा किडा त्याच्या मनात शिरला आणि त्याने त्याचे सर्व धैर्य व साहस नष्ट केले. जत्रा संपली. आता रूपलालला तेवढा कामाचा बोजा राहिला नाही. म्हणून रात्र झाली की त्याला जंगली लोकांच्या नायकाची व त्याने म्हटले होते त्याची आठवण होई. त्याला भुते दिसू लागली. तो आपल्या खोलीबाहेर पाऊल टाकीनासा झाला. तो बडबडू लागला. त्याला उन्माद झाल्यासारखे झाले. तो मध्येच ओरडायचा— "ते पहा! ते पहा! भूत! त्या आंब्याच्या झाडावर त्या फांदीवर बसून हसते आहे!" गावकऱ्यांना वाटू लागले की त्या दुष्ट नायकाने रूपलालवर कोणते तरी भूत खरोखरच सोडले आहे. सर्व गावकऱ्यांना भुताची दहशत बसली. काळोख पडल्यावर कोणी घराबाहेर पाऊल टाकीनासा झाला. गावातली कामे अस्तव्यस्त झाली. पोलिसांनी ज्या जंगली लोकांना धरून नेले होते त्यांचे काय झाले, कोणाला काही कळले नाही. आरोप साबित न झाल्यामुळे सर्वांना सोडण्यात आल्याची वार्ता पसरली. रूपलाल जवळच्या शहरात शिकत असता त्याच्याबरोबर वर्गात सोमनाथ नावाचा एक मुलगा होता. दोघांचे जीवश्च कंठश्च मित्र होते. त्याला मंत्रविद्या, जादू वगैरेची चांगली माहिती होती. रूपलालवर कोणी भूत सोडल्याचे व ते त्याच्या मानगुटीस बसल्याचे सोमनाथला मुखामुखी मित्रांकडून कळले. रूपलालला या मनोव्याधीतून सोडविणे आपले कर्तव्य आहे असे सोमनाथला वाटले. त्याने मनोव्याधीची चिकित्सा करणाऱ्या आपल्या एका मित्राचा सल्ला घेतला आणि नंतर एके दिवशी दुपारच्या सुमारास अशोकपूर गावी येऊन मित्राला भेटला. रूपलालला ओळखणेदेखील शक्य नव्हते, इतका तो रोडावलेला होता. त्याच्यात प्राण म्हणून राहिले नव्हते. चेहरा निस्तेज व काळवंडलेला होता. सोमनाथला पाहून रूपलाल हसला, पण त्यात फिकेकेपणा व हुताशाच दिसत होती. तो सोमनाथला म्हणाला— "मित्रा! या भुताने पहा, माझं सर्व रक्त शोषून घेतलं आहे आणि हाडमांस आतून पोखरलं आहे. मरण लवकर आलं तर सुटेन असं वाटतं आहे." त्याने मुस्कारा सोडला खरा, परंतु एकदम ओरडू लागला— "ते पहा! ते पहा! त्या फांदीवर...!" सोमनाथने त्या फांदीकडे पाहिले व आश्चर्यचकित झाल्याचे सोंग करीत म्हणाला— "खरंच की रे! ते दुष्ट रक्तपिपासू भूत दिसलं मला!" तेथे हजर होते ते लोक चकितच झाले, कारण त्यांना फांदीवर काहीच दिसत नव्हते. "पाहिलंस, किती भयंकर आहे ते, सोमनाथ?" रूपलाल म्हणाला. "त्याहून जास्त भयंकर भूत दुसरे भूतवैद्य करतो तेव्हा अनेक तऱ्हेची भुते व पिशाच्चे मी पाहिली आहेत! परंतु इतके भयंकर भूत मी पूर्वी मी कधीच पाहिले नाही," सोमनाथ म्हणाला. "त्या दुष्ट नायकाने त्याला माझा जीव घ्यायला माझ्यावर सोडले आहे, नाही का रे?" रूपलालने विचारले. "होय, मी ऐकलं ते सगळं! अरे पण, त्या जंगली नायकापेक्षा मला कमी समजू नकोस. त्या बेट्याचं डोकं मी ठिकाणावर आणलं नाही, तर नावाचा सोमनाथ नाही. माझ्यासारखा त्या बेट्याने अथर्ववेदाचा, तंत्रशास्त्राचा आणि उपनिषदांचा अभ्यास केला आहे का? अथर्ववेदात भुतांच्या वशीकरणाचा मंत्र आहे. मी तो आणि एक बृहदारण्यकोपनिषदांतून लिहून घेतला आहे, पहा तरी!" असे म्हणत सोमनाथने आपल्या पिशवीतून एक घडी करून ठेवलेला कागद काढून दाखविला. त्यावर देवनागरी लिपीत काही तरी लिहिलेले होते. तो कागद पाहून रूपलालच्या तोंडावर अगदी थोडा वेळ आनंद झळकल्यासारखा दिसला आणि पुन्हा त्याचा चेहरा गंभीर विचारात पडल्यासारखा झाला. सोमनाथ म्हणाला— "आज शनिवार आहे, भुताच्या उच्चाटनाला उत्तम वार आहे. मी सर्व तयारी करून ठेवली आहे. आज संध्याकाळी घेतो त्याचा समाचार! आता त्याचे दिवस भरलेच समज!" संध्याकाळ व्हायची वेळ होत आली. सोमनाथने जे जे करणे आवश्यक होते ते सर्व तयार करून ठेवले. यदुपतीच्या घरासमोरच्या अंगणात सडासारवण घालून ते स्वच्छ केले. रांगोळी घालून एक मोठे वर्तुळ तयार केले. त्याच्या मधोमध एका पितळच्या कळशात पाणी भरून त्यात आंब्याचे टाळे ठेवले. त्याच्यासमोर फुले वाहिली गेली. नंतर रूपलालला स्नान घालून व नवे कोरे धोतर नेसायला देण्यात आले. त्याला एका गालिचावर बसविण्यात आले. त्याजवळ एक चौरंगासारखा उंच पाट ठेवण्यात आला. अंगणाच्या चारी कोपऱ्यांत चार समया लावण्यात आल्या. नंतर धूप घालून धूर त्या परिसरात तो पसरेल याची काळजी बाळगण्यात आली. काळोख पडू लागण्याच्या सुमारास सोमनाथ रूपलालच्या जवळ बसून संस्कृत भाषेत मंत्र म्हणू लागला आणि मधून-मधून रूपलालला आंब्याच्या झाडाच्या फांदीकडे पाहायला सांगून "ते पहा!" "ते पहा!" असे म्हणू लागला. रूपलाल तिकडे निरखून पाहू लागला. सोमनाथ आपल्याबरोबर शहरातून एका जणाला मदतीला घेऊन आला होता. त्याला बसण्यासाठी सोमनाथच्या सांगण्यावरून निराळी खोली देण्यात आली होती. खोलीत बसून त्याने शेगडी पेटविली व सोमनाथसाठी चहा केला. सोमनाथ चहा पिऊन येऊन आपला वशीकरण मंत्र म्हणू लागला. आणखी पाच मिनिटे मंत्र म्हणत राहिल्यावर झाडावरून आंब्याचे टाळे भराभर पडू लागले आणि एक फांदी पडली तेव्हा मोठा आवाज झाला. "ते पहा, भूत खाली उतरून आले आहे," असे म्हणत सोमनाथने आपल्या मदतनिसाला बाटली व बशी आणायला सांगितले. त्या माणसाने प्रथम नुसती एक बशी आणली. ती कप ठेवायची बशीच होती. सोमनाथने ती फडकयाने चांगली स्वच्छ पुसून काढली व म्हणाला— "आण आता बाटली! फडकयाने धर बाटली, उघड्या बोटांनी धरू नकोस!" त्या माणसाने फडकयात धरून बाटली आणली. सोमनाथने ती एका फडकयानेच धरली आणि बाटलीचे तोंड फडकयाने छान पुसून ती बाटली टेबलावर ठेवली. "त्या दुष्ट भुताला या बाटलीत बंद करतो!" आणि खाली पडलेल्या फांदीकडे पाहात म्हणाला— "या म्हटले यात मुकाट्याने! चटदिशी आला नाही तर मारण होमच करावा लागेल. म्हणून सरळ मार्गाने या!" असे म्हणत उजव्या हाताने बोलावण्याचा अभिनय करीत बाटलीवर ती बशी थोड्या वेळाने ठेवली आणि म्हणाला— "मित्रा रूपलाल! त्या भुताला बंद केले या बाटलीत. नंतर काही वेळ मंत्रोच्चार करीत राहिल्यावर म्हणाला— "बाटलीत भूत पकडले की नाही हे तुला कसे कळणार? तर मग पहा, भूत बाटलीत गेले आहे आणि म्हणून बशी बाटलीला चिकटली आहे. बशी उचलून पहा, बाटली चिकटून बसली आहे की नाही ते!" त्याने बशी उचलून दाखविली व बशीबरोबर बाटलीसुद्धा वर उचलली गेली. "भूत बाटलीत बंद झाले!" असे ओरडत रूपलाल मोठ्याने ओरडला आणि भोवळ येणारून पडला. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून पंख्याने वारा घालून त्याला शुद्धीवर आणण्यात आले. आता तो निर्धास्त झालेला दिसला. त्याच्या तोंडावर समाधानाचे स्मित होते. सोमनाथ आपल्या खोलीत ती बाटली घेऊन गेला. ती छान कपड्यात बांधली आणि दुसऱ्या दिवशी सर्वांसमक्ष नदीच्या डोहात फेकून देण्यात आली. सोमनाथच्या मदतनिसाने शेगडीच्या विस्तवाचा ताप देऊन बाटली तापवून बाहेर आणून दिली, म्हणून ती फडकयाने धरून घेऊन आला होता. ताप लागल्याने बाटलीतली हवा विरळ होऊन उडून गेली. बाटलीवर बशी ठेवल्यावर बाटलीतली हवा थंड होऊन आकुंचन पावली. बाटलीतल्या हवेच्या दाबापेक्षा बाहेरचा दाब जास्त असल्या कारणाने बशी बाटलीला चिकटून राहिली. आता झाडाची फांदी पाडण्यासाठी लोखंडी तारेचा उपयोग करण्यात आला होता. (अशा प्रकारे सोमनाथने विज्ञानाच्या आधारे मित्राचा भ्रम दूर केला.)