Bookstruck

पुण्यपुरुष

शिवला अचानकच पैशांची गरज पडली. ज्यांना ज्यांना तो ओळखत होता, त्या सर्वांकडे त्याने पैसे मागून पाहिले, पण कोणाकडूनच ते मिळाले नाहीत. शेवटी त्याने आपला एक नातेवाईक केशव याच्याकडे मदत मागितली. केशव शिवला म्हणाला, "तू श्रीपुरला जा. तिथे गुणाढ्य नावाचा एक पुण्यपुरुष राहतो. कोणीही आला, तरी त्याच्यावर दया करून तो कर्ज देतो. त्या पैशातून तुझी परिस्थिती सुधारेल ही कदाचित्!" शिवा श्रीपुरला गेला आणि गुणाढ्यला भेटला. त्याने शिवाकडून त्याची सर्व माहिती काढून घेतली. आणखीही अन्य काही प्रश्न विचारले आणि म्हटले, "हे पहा, तुझ्या बोलण्यावरून असं वाटतंय की व्यापार करायची तुझ्यात चांगली योग्यता आहे. मी तुला एक हजार अशर्फ्या देतो. त्यातून तू काही व्यापार सुरू कर. एका वर्षात तुला अधिक लाभ झाला, तर तू मला दोन हजार अशर्फ्या परत द्यायच्यास. मुद्दल परत करायला दोन वर्षे लागली, तर चार हजार अशर्फ्या चुकवायच्यास. अशा तऱ्हेने प्रत्येक वर्षी ही रक्कम दुप्पट होईल बघ. कबूल आहे का?" "नाही तरी आपल्याला अशा हजार अशर्फ्या एकरकमी कोण देणार?" अशा विचाराने शिवने गुणाढ्यच्या अटी मान्य केल्या. त्याने शिवकडून तसा कागद लिहून घेऊन सही घेतली आणि एक हजार अशर्फ्या त्याच्या हवाली केल्या. गुणाढ्यच्या धनाचा काय महिमा होता कोणास ठाऊक, पण एका वर्षात सगळा खर्चवेच जाऊन शिवाने पाच हजार अशर्फ्या कमावल्या. त्यातल्या दोन हजार गुणाढ्यला नेऊन द्यायचा त्याचा विचार होता. पण इतक्यात एक व्यापारी तिथे येऊन त्याला म्हणू लागला, "तुझ्याकडे पाच हजार अशर्फ्या असतील तर हात पकड माझा! एकाच वर्षात पन्नास हजार अशर्फ्यांचा फायदा होईल असा एक व्यापार करू या दोघं मिळून." हा प्रस्ताव ऐकून शिव विचारात पडला. त्याला वाटू लागले की, आता गुणाढ्यला दोन हजार अशर्फ्या दिल्या, तर व्यापारात तेवढा फायदा कमी होईल. पण आता एका वर्षात पन्नास हजार मिळत असतील, तर दोन वर्षांच्या मिळून चार हजार देणं जास्त फायद्याचं होईल ना? त्या व्यापाऱ्याला शिवने धन दिले आणि दोघे भागीदार बनले. त्यांचा व्यापारही खूप जोरात चालला. गुणाढ्यला जे धन द्यायचे होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने पैसा वेगाने वाढत राहिला आणि शिव ते पैसे परत करणे पुढे-पुढे ढकलत राहिला. पाच वर्षांत शिवने लाखांनी अशर्फ्या मिळवल्या. हिशोबाने गुणाढ्यला आता बत्तीस हजार अशर्फ्या द्यायला हव्या होत्या. पण एकाच हप्त्याने एकदम इतकी मोठी रक्कम परत करायला त्याचे मन काचकुच करू लागले. "हं, एक हजार अशर्फ्या देऊन पाच वर्षांत बत्तीस हजार घेणारा कसला आलाय पुण्यवान! खरं तर मदतीच्या आडोशाने गरीबांना लुटणारा डाकूच म्हणायला हवं गुणाढ्यला!" मनात असे म्हणत शिवने गुणाढ्यला काहीच दिले नाही. इकडे गुणाढ्यच्या मुलीचे लग्न ठरले. त्यासाठी दागिने घ्यायला तो शिवच्या दुकानातच आला. चार हजारांचा एक दागिना त्याने पसंत केला, पण एक हजार अशर्फ्या कमी पडत होत्या! खिशात होत्या तीन हजारच. शिवने ही नाजूक परिस्थिती जाणली आणि तो आपल्या नोकराला काही सूचना देऊन तिथून सटकला. नोकराला त्याने सांगितले होते की, "गुणाढ्यशी आदराने बोल. वेळ पडली, तर पैसे न घेताही गुणाढ्यला दागिना दे." नोकर गुणाढ्यला म्हणाला, "महाराज, आमचे मालक काही कामासाठी अचानक बाहेर गेलेत. पण या दागिन्याचे जे काही पैसे देऊ शकत असाल तितके देऊन दागिना आपल्याला देण्याबद्दल ते सांगून गेलेत." गुणाढ्य संकोचत म्हणाला, "मी जे पैसे बरोबर घेतले होते, त्यातले बरेचसे अन्यत्रच खर्च झाले. अजूनही बरीच काही खरेदी व्हायची आहे. दागिन्यासाठी आणखी एक हजार अशर्फ्या मी तुम्हाला देऊ लागतो. पण त्या देण्यासाठी मला थोडी मुदत हवी." "आपणाला योग्य वाटत असेल तसेच करा. आमचे मालक आपले कर्जदारही आहेत ना!" नोकर विनयपूर्वक बोलला. "ती गोष्ट वेगळी! त्याचं व्याज वसूल करणार आहे मी! कर्ज चुकवायला त्याला जेवढा उशीर होईल, तितका माझा फायदाच अधिक होईल. पण हं, या पैशांचं मी मात्र व्याज नाही देणार बरं का!" गुणाढ्य म्हणाला. नोकराने गुणाढ्यची ही अट मान्य केली. तीन हजार अशर्फ्या घेऊन त्याने दागिना त्याच्या हाती सोपवला. शिव परत आल्यावर नोकराने सारी हकीकत त्याला सांगितली. ती ऐकून शिवच्या मनात आले, "गुणाढ्यला आपण जी रक्कम देणं लागतोय, त्यातलं मूळ मुद्दल वसूल करायलाच आला असला पाहिजे तो. बाकी सगळं नुसतंच नाटक आहे झालं! नाहीतर बरोबर एक हजार अशर्फ्याच कशा कमी पडल्या?" या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने गुणाढ्यचे देहावसान झाले. शिवला मनातल्या मनात आनंदच झाला. "मी त्याला काहीच दिलं नाही, अशी उगीच रुखरुख नको माझ्या मनाला. कालच तर तो हजार अशर्फ्या घेऊन गेला. आणि म्हणजे मी त्याला तेवढ्याच तर देणं लागत होतो?" शिवने आपली समजूत करून घेतली. गुणाढ्यच्या क्रियाकर्मानंतर आसपासच्या साऱ्या प्रमुख लोकांना त्याच्या मोठ्या मुलाने जेवायला बोलावले. शिवलाही बोलावणे होतेच. 'गुणाढ्य फार निस्वार्थी आणि महा पुण्यवान होता' वगैरे शब्दांत सर्वजण त्याची प्रशंसा करत होते. 'आणि यामुळेच त्याला मृत्यूही अगदी सहज आला, त्याला नक्कीच स्वर्गात स्थान मिळणार.' असेही ते म्हणाले. हे सारे बोलणे ऐकून शिव मात्र मनातल्या मनात हसत म्हणत होता, "हो, मोठा आलाय पुण्यवान! पैसा मिळवायच्या लोभानेच तर सर्वांना कर्ज देऊन चांगलं दणदणीत व्याज वसूल करत होता, आणि असल्या कंजूस प्राण्याची अगदी तोंड भरभरून स्तुती चाललीय! वा रे वा!" ते सगळे स्तुतिपाठक शिवच्या दृष्टीने मूर्ख आणि नालायकच होते. गुणाढ्यचा मुलगा सर्वांना उद्देशून बोलू लागला, "माझ्या बाबांनी अनेकांना मदत केली. काही लोकांना कर्जही दिलंय. मी असं ऐकलंय की त्याबाबत सर्व काही त्यांनी एका वहीत लिहून ठेवलंय. त्यातच त्यांचं मृत्युपत्रही आहे. पण ती वही कुठे ठेवलीय हे मात्र मला माहीत नाही. शोधूनही नाही सापडली ती मला." श्रीपुरचा पाटील लगेच म्हणाला, "अरे, मला माहीत आहे. ती वही आणि मृत्युपत्र त्याने आपल्या कपाटात चोरकप्प्यात सुरक्षित ठेवलंय. मी दाखवीन तो कप्पा तुला. पण आजचा दिवस चांगला नाही. उद्या उघडू आपण ते कपाट." असा सल्ला त्याने दिला. आता मात्र डोक्यावर आकाश कोसळल्यासारखेच वाटले शिवला! 'ती वही सापडली, तर आपल्याला गुणाढ्यच्या कुटुंबाला खूपच मोठी रक्कम द्यावी लागणार!' शिवसारखेच आणखी चार-पाच कर्जदारही त्यावेळी तिथे उपस्थित होते. एक लाखांहूनही अधिक अशर्फ्या गुणाढ्यला देणं लागत असलेलेच होते बहुतेक जण. ते सारे व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एक कट रचला. रात्री घरात प्रवेश करून गुणाढ्यच्या मुलाला धाक दाखवून ती हिशोबावाली वही मिळवून आणायच्या कामावर त्यांनी एका चोराला नेमले. चोराने आपले काम बरोबर केले आणि आपली बक्षिसाची रक्कम घेऊन तो निघून गेला. कर्जदारांनी वही जाळून टाकायचे ठरवले. पण वहीत इतके लिहिलेय तरी काय; आपल्या कर्जाचा उल्लेख त्यात आहे की नाही इ. जाणण्याच्या उत्सुकतेमुळे त्यांनी वही उघडली. वहीत असे लिहिलेले होते- "मी गरजू लोकांना 'कर्ज' म्हणून रक्कम देत असतो. 'दान देतोय' असे म्हटले तर कर्जाची गरज नसलेले लोकही उगीचच पैसे घ्यायला येतील. पैशांबरोबरच मी लोकांना योग्य सल्लाही देतो. माझा पैसा आणि सल्ल्यामुळे अनेकांचं कल्याण झालेलं आहे. त्यांनी पैसा परत दिला, तर मी तो पुण्यकार्यात खर्च करतो; परत केले नाहीत, तर मी जबरदस्ती, जुलूम कधीच करत नाही. त्यांच्याकडून जो कागद मी लिहून घेतलेला असतो तो ते गेल्यावर लगेच फाडून टाकतो. माझ्या थोरल्या मुलाने असंच केलं तर माझा आत्मा संतुष्ट राहील." हे सारे वाचल्याबरोबर आश्चर्याने त्या व्यापाऱ्यांनी आ वासले! त्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडून गेला! यानंतर ज्या कोणाचे काही पैसे देणे होते त्याबद्दलचा हिशोब लिहिलेला होता. शिवला द्यायच्या हजार अशर्फ्यांचाही त्यात उल्लेख होता. म्हणजे अगदी आदल्या दिवसाचाही हिशोब होता! शिव आणि त्या अन्य व्यापाऱ्यांना आता कोठे कळून चुकले की गुणाढ्यला लोक 'पुण्यपुरुष' का म्हणत, त्यांनी पुन्हा मुकाट्याने ती वही होती तिथे ताबडतोब नेऊन ठेवायची व्यवस्था केली. त्यांनी जे कर्ज फेडायचे होते, ते धनही गुणाढ्यच्या मुलाकडे नेऊन दिले. शिवही आता गुणाढ्यच्या मुलाबरोबर गुणाढ्यने दाखवलेल्या मार्गाने चालू लागला.