Bookstruck

निरुपयोगी वस्तू

मणिपूर येथे रामूशेट खोबरेल तेलाचे व्यापारी होते. घाण्याचे तेल काढायला कोरडे खोबरे लागते. परंतु ते पुरेसे मिळत नव्हते. म्हणून रामूशेट नारळ विकत घेऊन त्यातले खोबरे काढून वाळवीत आणि करवंट्या फेकून देत. वाळलेल्या खोबऱ्याचे तेल घाण्यात काढीत. एकदां रामूशेटच्या घरी जनार्दन नावाचा एक तरुण युवक आला. त्याने रामूशेटच्या घराच्या आवारात करवंट्यांचे ढीगच्या ढीग पडलेले पाहून विचारले— "तुम्ही या करवंट्यांचे काय करणार हो?" "जाळायच्या कामाला येतात या करवंट्या. याहून जास्त यांचा काही एक उपयोग नाही." रामूशेट म्हणाला. "तुम्ही मोठमोठ्या करवंट्या मला विकत द्या, मी विकत घ्यायला तयार आहे." जनार्दन म्हणाला. रामूशेटने विचार केला पाणी तापवायला सरपणाशिवाय या करवंट्यांचा उपयोगच काय? त्याने शक्य तितक्या मोठमोठ्या करवंट्या निवडून दोन पोती भरली. त्यांची किंमत देऊन जनार्दन त्या करवंट्या घेऊन गेला. तेव्हापासून रामूशेट नारळ फोडताना नारळाच्या गोल गोल सरळ दोन करवंट्या निघतील असा फोडून घेऊ लागला. जनार्दन दर पंधरवड्याला येऊन सर्व करवंट्या घेऊन जाऊ लागला. असेच एक वर्ष लोटले. त्यानंतर जनार्दनाने नारळाच्या करवंट्या विकत घ्यायच्या बंद केल्या. दोन महिने लोटले. शेवटी एकदा रामूशेटला कळले की जनार्दन लक्ष्मणपूर नावाच्या गावी राहू लागला आहे. ते गाव मणिपूरपासून पंचवीस मैलांवर होते. एकदां रामूशेट काही कामानिमित्त जिल्ह्याच्या गावी गेला व परत येताना लक्ष्मणपूर मार्गे परतला. त्याने लक्ष्मणपूरला पोचल्यावर जनार्दन संबंधी चौकशी केली. सुदैवाने सहजजी त्याच्या घराचा पत्ता मिळाला. रामूशेट नारळाच्या बागातून जाताजाता एका आमराईतल्या एका मोठ्या वाड्यासमोर आला. तो वाडा कोणा श्रीमंताचा वाडा असावा असे त्याला वाटले. रामूशेटला वाटले की जनार्दन या श्रीमंत माणसाकडे नोकरी करीत असावा. रामूशेटने त्या वाड्याच्या फाटकाजवळ काम करणाऱ्या गड्याला विचारले— "काय रे, या घरात कोणी जनार्दन नावाचा माणूस राहतो का?" त्या माणसाने चकित होऊन रामूशेटकडे पाहिले आणि आंत यायला विनंती केली. ते घर कोणत्या तरी जमिनदाराच्या घरासारखे होते. वाड्याच्या गच्चीवर काही लोकांशी बोलत असलेली व्यक्ती जनार्दन सारखीच रामूशेटला वाटली. त्याच्या अंगावरचा पोशाख श्रीमंत घराण्यातल्या माणसासारखा होता. त्याने रामूशेटला गच्चीवरूनच पाहिले आणि त्यांना घरात बोलवून आणायला नोकराला पाठविले आणि स्वतः जिना उतरून खाली आला. खाली दिवाणखान्यात दोघे भेटले. जनार्दनच्या घरचा तो थाट पाहून रामूशेट थक्कच झाला. "रामूशेट, माझ्या घरातला हा थाट व वाडा वगैरे पाहून तुम्हांला आश्चर्य वाटत असेल नाही? तुम्हांला वाटत असेल की करवंट्या विकत घेऊन जाणाऱ्याला एवढा मोठा वाडा आणि हे रेशमी कपडे वगैरे कोठे मिळाले? पहिल्याने तुम्ही माझ्या घरी चार दिवस आनंदाने रहा. नंतर आपण स्वस्थपणे सर्व काही बोलू!" जनार्दन म्हणाला. पंचपक्वान्नांचे जेवण झाल्यावर दिवाणखान्यात कोचावर बसून जनार्दन रामूशेटला आपल्या आयुष्यातले मार्मिक प्रसंग सांगू लागला. म्हणाला— "एका काळी आम्ही सर्व जमिनदार घराण्यातलेच. आमच्या वाडवडिलांनी मागेपुढे न पाहतां दानधर्म करण्यात अलोट पैसा खर्च केला. शेवटी कंगाल झाले. मी वयात आलो तेव्हा माझे वडील आजोबा वगैरे कोणीच नव्हते व ते वैभवही नव्हते. येथून जवळच मायावती नावाचे एक गाव आहे. त्या गावाचे जमिनदार देशमुख एकदा आपल्या गाडीत बसून कोठेतरी जात होते. वाटेत त्यांची गाडी उलटली. नेमका त्याच वेळी मी त्या बाजूने जात होतो. मी आणि गाडीवाल्याने मिळून गाडी सरळ उभी केली. त्यानंतर मी देशमुख साहेबांना त्यांच्या घरी सुखरूप पोचते केले. बोलतां बोलतां त्यांनी माझ्याविषयी चौकशी केली व माझे पूर्वचरित्र ऐकून त्यांना फार वाईट वाटले. मी त्यांना समजावून सांगितले की त्यांनी ही गोष्ट मनाला लावून घेऊ नये. कधी कधी निरुपयोगी वस्तूच्या मदतीने दौलत संपादन करता येते. देशमुखसाहेब म्हणाले— 'जनार्दन, तू निरुपयोगी वस्तूतून दौलत संपादन करू शकतोस, म्हणालास, तर मी तुझे लग्न माझ्या मुलीशी करून देतो. तू भांडवल म्हणून तुला वाटेल तितके पैसे माझ्याकडून मागून घे.' त्यानंतर मी देशमुख साहेबांकडून काही पैसे कर्जाऊ मागून घेतले. खेळणी व मातीच्या मडक्यांवर चित्रे रंगविणाऱ्या दोघांना आणि दोघां हुशार सुतारांना कामाला लावले. करवंट्या जमवून त्यांची उत्तमोत्तम खेळणी, बाहुल्या, पळ्या वगैरे तयार करून त्यांच्यावर सुंदर रंग भरविले. चित्र विचित्र रंगाचे बाहुले बाहुल्या स्वतःच डोकी हलवू लागल्या म्हणजे फार आकर्षक वाटत. म्हणून शहरात त्यांना चांगली किंमत मिळू लागली. त्याच बरोबर नारळाच्या सावळ्या आणवून त्यांचे हीर काढविले. चार बायकांना रोजी मिळाली आणि त्यांच्याच कडून केरसुण्या बांधवून घेतल्या. माझ्या बाहुल्यांना, खेळण्यांना, केरसुण्यांना आणि नारळांना देशभर चांगली मागणी मिळू लागली. त्याच प्रमाणे परप्रांतात आपल्या प्रांतात न मिळणारा अशाच तऱ्हेचा माल मिळे. तो मी मागवू लागलो. त्याला आपल्या प्रांतात चांगली मागणी होती. म्हणून चांगली किंमत मिळू लागली. अशातऱ्हेने खूप पैसे मिळविले. सुरुवातीला कच्चा माल मला तुमच्याकडून मिळत असे. तुम्ही खोबरेलचा व्यापार करतां व करवंट्या विकतां. पुष्कळ पैसे जमल्यावर मी लक्ष्मणपूरला कायम रहायचे ठरविले. कारण तेथे नारळाच्या बागा पुष्कळच आहेत. देशमुख साहेब माझे काम पाहून फार खूप झाले. एकदां त्यांनी मला बोलवून घेतले आणि म्हणाले— 'फक्त नारळाच्या करवंट्या व हीरांचा व्यापार करून तू इतके पैसे मिळविलेस हे पाहून मला फार आश्चर्य होत आहे. सर्व लोक अशी मेहनत करून काम करू लागले तर जगात अशक्य असे काही राहणारच नाही.' असे सांगून त्यांनी एका सुमुहूर्तावर आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले. मी देशमुख साहेबांची जमिनदारीची सर्व कामे पाहतो आणि लक्ष्मणपुरीत त्यांच्याच वाड्यात राहातो आहे. परंतु ते मात्र मायावती येथेच राहतात." रामूशेट जनार्दनने जे आत्मवृत्त सांगितले ते ऐकून खूप झाले. म्हणाले— "जनार्दनराव! अहो, तुम्ही तरुण पिढीला एक उदाहरण घालून दिलेत! तुमच्यासारखी योजना करून प्रत्येक जण काम करू लागला तर बेकारी आणि गरीबी राहीलच कां?" त्यानंतर जनार्दनने जे जे छोटेखानी धंदे सुरु केले होते ते रामूशेटने स्वतः जाऊन पाहिले. स्वतः चांगली कमाई करीत राहून चारचौघांच्या पोटापाण्याची त्याने व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांनी जनार्दनचे अभिनंदन केले.