Bookstruck

नारायण आणि नारळ

बलभद्र नावाच्या तरुणाचे गुरुकुलातले शिक्षण पूर्ण झाले आणि तो परत आपल्या गावी रहायला गेला. त्याचे वडीलही चांगले विद्वान होते. आपली शेती करता करता, ते काही लेखनही करत असत. बलभद्र परत आल्यावर त्यांनी त्याला सुचवले की, त्याने आपल्याबरोबरच राहून लेखन कामात आपल्याला मदत करावी. बलभद्रचे वडील काही संस्कृत ग्रंथांचे हिन्दी भाषांतर करून ते शहरातील जमीनदाराकडे पाठवत असत. हे भाषांतराचे काम बलभद्रला खूप आवडले. त्याच्या मदतीमुळे काम भरभर होऊ लागले. त्याच्या वडिलांनी हंसपुराण नावाच्या ग्रंथाचे भाषांतर पूर्ण केले व ते बलभद्रला म्हणाले, "बेटा, हे भाषांतर जमीनदारकडे घेऊन जा." तो ग्रन्थ घेऊन बलभद्र शहराकडे निघाला. वाटेत त्याला एक माणूस भेटला. तो म्हणाला, "अरे, बलभद्रच ना तू? कुठेतरी निघालेला दिसतोयस?" त्या माणसाच्या प्रश्नांची उत्तरे तर बलभद्रने दिली; पण तो माणूस कोण, हे काही त्याच्या लक्षात येईना! त्या माणसाने ही गोष्ट बरोबर हेरून म्हटले, "अरे विसरलास होय? मी नारायण!?" आता बलभद्रला बरोबर आठवले. त्या दिवसात नारायण लहान मुलांना एकत्र करून त्यांना छान-छान गोष्टी सांगायचा. पण गोष्ट चालू असतानाच कुठूनशी त्याची बायको येऊन त्याला रागावे आणि मुलांना तेथून हाकून लावी. पण पुन्हा त्यांना एकत्र करून नारायण गोष्ट पुरी करी. गोष्ट मधे कुठे थांबली होती, हे मुलांपेक्षा नारायणच्याच लक्षात असे. नारायण यावर हसून म्हणाला, "ठीक आहे, सोडून देरे! बरं, तू उद्या संध्याकाळपर्यन्त परत येणार असशील, तर माझ्यासाठी एक नारळ आण शहरातून! परवा सकाळी पूजेच्या वेळी देवळात नारळ फोडायचाय मला. आपल्या गावात चांगले नारळच मिळत नाहीत!" "तुमच्यासाठी उद्या संध्याकाळी नक्की आणीन मी एक नारळ. खात्री बाळगा." बलभद्र म्हणाला. तरीही नारायण पुन्हा म्हणाला, "विसरू नको हं! या गावात मी कुणाला काही करायला सांगितलं, की नुसतेच मुंडी हलवतात सर्वजण. पण करत मात्र नाही कुणीसुद्धा! निदान तू तरी त्यांच्यासारखा नसशील अशी आशा आहे मला!" बलभद्रने हसून त्याला वचन दिले की, उद्या त्याला नारळ नक्कीच मिळेल. नन्तर संध्याकाळपर्यन्त शहरात पोचून त्याने ग्रन्थ जमीनदाराच्या हाती दिला. हंसपुराणाचे ते भाषान्तर पाहून जमीनदाराने आश्चर्याने विचारले, "अरे! हा अनुवाद इतक्या लवकर करणं कसं शक्य झालं?" बलभद्रने आपले गुरुकुलातले शिक्षण व नन्तर आपण आपल्या पित्याला त्याच्या भाषान्तरासाठी करत असलेली मदत वगैरेबद्दल जमीनदाराला सांगितले. तेव्हा जमीनदाराने त्याला एक श्लोक म्हणून दाखवला व त्याचा अर्थ विचारला. बलभद्रने जमीनदाराला म्हटले की या संस्कृत श्लोकाचे एकच नव्हे, तर अनेक अर्थ होतात; आणि त्याने श्लोकाचे एकूण अठरा अर्थ सांगितले. ते सारे ऐकून जमीनदार फारच आश्चर्यचकित झाला व तो म्हणाला, "तू तर असामान्य असा पंडित आहेस इथे तू चार दिवस राहिलास, तर मी इथे एक पंडितसभा बोलावू म्हणतो." बलभद्रला एकदम नारायणच्या नारळाची आठवण झाली. पण ती गोष्ट जमीनदाराला कशी सांगावी हे त्याला कळेना. त्याने तर नारायणला वचन दिले होते, व आपल्यामुळे त्याच्या भक्तीत बाधा येऊ नये अशी बलभद्रची इच्छा होती. पण केवळ एका नारळासाठी जमीनदारची इच्छा डावलणेही इष्ट झाले नसते, असा विचार करून त्याने एक कल्पना लढवली. "महाराज, माझी आजी सध्या आजारी आहे. तिच्यासाठी औषध घेऊन मला उद्या संध्याकाळी आपल्या घरी पोचायला हवं." बलभद्रने जमीनदाराला खोटेच सांगितले. "बास, इतकंच? औषध कोणते सांग मला, म्हणजे मी ते आपल्या माणसाकरवी पाठवीन तुझ्या घरी." जमीनदार पटकन म्हणाला. आता मात्र बलभद्र गडबडला; तो म्हणाला, "महाराज, माझ्या आजीचा आजार तसा बराचसा मानसिक आहे. माझ्या तिथल्या गैरहजेरीमुळे ती माझ्यासाठी चिंतित आहे. त्यामुळे तिच्या जवळ राहून तिला मी स्वतःच औषध पाजलं पाहिजे, तोपर्यन्त नुसत्याच औषधाचा काही उपयोग होणार नाही, असं वैद्याचं म्हणणं आहे." जमीनदार यावर काहीच बोलू शकेना. त्याने फक्त त्या रात्री आपल्याच घरी आराम करून दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जाण्याबद्दल बलभद्रला सुचवले आणि त्याच्या रहाण्याची व खाण्यापिण्याची सारी व्यवस्था केली. त्या रात्री विश्रान्ती घेतल्यानन्तर दुसऱ्या दिवशी सकाळी बलभद्र नारळ खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. परन्तु त्याच दिवशी कोणा नारळवाल्याचे निधन झाल्यामुळे नारळाची सगळी दुकाने बन्द होती. त्याला नारळ खरेदी न करताच परत यावे लागले. परत घरी आल्यावर जमीनदाराच्या स्वयंपाक्याला त्याने नारळाबद्दल विचारले. स्वयंपाकी म्हणाला, "इथं पोतभर नारळ आहेत; पण जमीनदाराच्या परवानगीशिवाय मी कोणाला काही देऊ शकत नाही. तू जमीनदाराकडे मागणंही बरं दिसणार नाही, मोठ्या माणसांकडे अशा क्षुल्लक गोष्टी मागू नयेत." तरीही नारायणला दिलेले वचन बलभद्रचा पिच्छा सोडत नव्हते. शेवटी जमीनदाराकडे जाऊन तो म्हणाला, "माझ्या आजीला नारळाचं खोबरं फार आवडतं. अन् बाजारात तर मला आज नारळच मिळू शकला नाही." "अरे, इतक्या क्षुल्लक गोष्टीची मागणी करावी लागली तुला माझ्याकडे?" असे म्हणून जमीनदाराने चार नारळ व दहा हजार अशर्फ्या देऊन बलभद्रला रवाना केले. बलभद्र आपल्या गावी पोचला, तेंव्हा रात्र झाली होती. रक्कम पित्याला देऊन त्याने शहरात काय काय घडले याबद्दल सारा वृत्तान्त कथन केला. तेव्हा वडील त्याला म्हणाले, "जमीनदारांनी आजपर्यन्त कोणत्याही ग्रन्थाची इतकी मोठी रक्कम कोणालाच दिली नाही. ते तुझ्यावर फारच खूष झालेले दिसतायत. पंडित सभेत भाग घेतला असतास, तर त्यांनी तुला नक्कीच एक लाख अशर्फ्या दिल्या असत्या. तू केलंस, ते काही बरं नाही केलंस." "पण गुरुकुलात आम्हाला शिकवलं होतं की, धनापेक्षा वचनाचं महत्त्व अधिक असतं." बलभद्र म्हणाला, "आपल्याला जे धन मिळणं नशिबात असतं, ते आपोआप चालून आपल्याकडे येतं." तेव्हा वडील त्याला म्हणाले, "पण हे सारं तू नारायणसारख्या माणसासाठी बोलतोयस, हे मला खटकतंय. तुला प्रथम ही गोष्ट समजून घ्यायला हवी की- आपल्याला जी कामं करायची, त्यातली महत्त्वाची कोणती व कोणती बिनमहत्त्वाची ! ते जमलं नाही तर तुझ्या जीवनात अडचणींचे डोंगरच उभे रहातील." बलभद्र थोडा वेळ नारायणच्या घराच्या कट्ट्यावर बसून राहिला; पण बराच वेळ नारायण न आल्याने, आपण नारळ आणल्याबद्दल एक चिठ्ठी लिहून ती कुलुपाला अडकवून बलभद्र निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीही नारळ घेऊन तो नारायणकडे गेला आणि पुन्हा कुलूप पाहून तो मन्दिरात गेला. तेथेही नारायण न आल्याचे कळल्याने त्याने पुजाऱ्याजवळ त्याच्यासाठी निरोप ठेवला. पुन्हा दुपारीही नारायणला नारळ द्यायचा विचार करून बलभद्र ऐन दुपारच्या कडक उन्हातून त्याच्याकडे गेला. नारायण घरात कसलेसे पुस्तक वाचत बसलेला शहरात बसलेला होता. बलभद्र आलेला पाहून, तो चिडून म्हणाला, "मला कोणी मुकाट्याने वाचूही देत नाही. बोल काय हवंय तुला?" "तुमच्याकरता मी नारळ घेऊन काल रात्री आलो होतो, नंतर पुन्हा सकाळी आलो, अन् आत्ता पुन्हा आलो. तुम्ही कुठं परगावी गेला होता का?" बलभद्रने विचारले. "पर गांव? नाहीतर! इथे येणाऱ्यांचा त्रास चुकवावा, म्हणून मी पुढील दारी कुलूप घालून, पुन्हा मागल्या दाराने आत येऊन बसतो." नारायण उत्तरला. "ओहो, असं होय? मग आज सकाळी तुम्ही देवापुढे नारळ नाही फोडलात?" बलभद्रने विचारले. "नारळ फोडणं काही फारसं महत्त्वाचं नव्हे; असेल जवळ तर फोडतो मी, नाहीतर नाही! सध्या माझी तब्येत बरोबर नाहीय. वैद्यानं सांगितलंय की मी रोज अभ्रभस्म खावं. तू कधी शहरात गेलास, तर आण हं अभ्रभस्म माझ्यासाठी!" बलभद्रच्या हातातला नारळ पाहूनही नारायण त्याबद्दल काही बोलला नाही, तेंव्हा जरा रागावूनच त्याने नारायणच्या समोर नारळ ठेवून तो आणण्यासाठी आपल्याला कसा त्रास सोसावा लागला याचे वर्णन केले. तेव्हा नारायण म्हणाला, "अरे मी विसराळू नाहीये पोरा! पण मी म्हटलं, अन् कुणी काही आणलं असं तुझ्याच बाबतीत घडतंय. तू नारळ आणलास, याचं आश्चर्यच वाटतंय मला! झालं ते झालं! विसरून जा तू! पण अभ्रभस्म मात्र माझ्यासाठी आणू नकोस हं! अन् दुसऱ्या कुणाला आणायलाही सांगू नकोस; कारण फार महाग आहे ते." हे ऐकून बलभद्र चक्रावूनच गेला! पित्याच्या बोलण्याचे सत्य त्याच्या लक्षात आले; अन् तो योग्य-अयोग्य कामे ओळखण्याची बुद्धि मिळवण्याच्या प्रयत्नाला लागला.