धनासाठी धनाची मदत
एका राजाच्या महालासमोर एक बैरागी येऊन दररोज उभा राहत असे व म्हणत असे, "माझ्यात अपार बुद्धिमत्ता आहे. परंतु अशी कोणीही व्यक्ती भेटत नाही की जी तिचा उपयोग करील. मी स्वतः काही कारणास्तव याचा उपयोग करण्यास असमर्थ आहे." ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली. एक दिवस राजाने बैराग्याला महालात बोलावून सांगितले, "तू रोजरोज एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो आहेस. काय हेतू आहे तुझा याच्यात? जरा सविस्तर समजावून सांग."
"राजन्, जर आपण विश्वास ठेवलात आणि मी जितके मागेन तितके धन मला देत गेलात, तर काही दिवसांनंतर दिलेल्याच्या दसपट धन मी परत देऊ शकेन. मी मूळ मुद्दलाची धनराशी इतकी वाढवीन की आपला खजिना भरून जाईल," बैराग्याने मोठ्या विश्वासाने सांगितले.
मंत्री राजाच्या कानात हळूच बोलले, "महाराज, यात धोका असेल असे वाटते. आपण विश्वास ठेवू नका." पण राजाने मनात बैराग्याला धन देण्याचे ठरवले होते, म्हणून त्याने मागेल तेवढी रक्कम देऊन त्याला निरोप दिला.
वर्षानंतर बैरागी पुन्हा आला व राजाला म्हणाला, "आठवतेय का महाराज? गेल्या वर्षी आपण मला गरजेप्रमाणे धन द्यायचे वचन दिले होते. मला माझी योजना कार्यान्वित करण्यासाठी आणखी धन हवे आहे." मंत्री नको म्हणत असतानादेखील, राजाने बैराग्याला जितके त्याने मागितले तेवढे धन दिले. वर्षानंतर पुन्हा येऊन म्हणाला, "माझी योजना आता शेवटच्या पायरीवर आहे. धनाची चणचण जाणवते आहे, म्हणून परत आलोय. मला आणखी धन हवे आहे."
राजाने यावेळीही त्याला भरपूर धन देऊन परत पाठवले. मंत्र्याने यावेळीसुद्धा राजाला धन देण्यास विरोध दर्शवला. एक वर्षानंतर बैरागी परत आला. "काय, आणखी धन हवे आहे?" राजाने विचारले. "नाही महाराज, माझी योजना पूर्ण झाली आहे. आता आपण मंत्र्यांना घेऊन माझ्याबरोबर चलावे व आपल्या धनाच्या मदतीने किती मोठा खजिना शोधून काढलेला आहे ते पाहावे."
बैराग्याबरोबर जाण्यास राजा लगेच तयार झाला, पण मंत्री म्हणाला, "हा तर आपणा दोघांनाच बोलावतो आहे. त्याच्याबरोबर आपण दोघांनीच जाणे सुरक्षित नाही."
"मी त्याच्या बुद्धीचा चमत्कार पाहायचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आशेने, धैर्याने व सहनशक्ती राखून मी त्याच्याशी व्यवहार केला आहे. जर मी त्याला घाबरलो असतो, तर इतके धन मी त्याला दिले असते का?" राजाने मंत्र्याला सुनावले. सुरुवातीपासूनच मंत्र्याला बैराग्याचा संशय येत होता, हे बैराग्याच्या लक्षात आले होते. म्हणून तो मंत्र्याला म्हणाला, "मंत्रीजी, जर तुमच्या मनात काही वाईट-साईट शंका असेल, तर तुमचे अंगरक्षक बरोबर घेऊन चला."
पण राजाने साफ नकार दिला. "नाही, फक्त आम्ही दोघंच येऊ तुझ्याबरोबर."
दोघेही बैराग्याबरोबर निघाले. तरीही मंत्र्याने आपले दोन सैनिक गुप्तपणे बरोबर नेले होते. बैरागी, राजा व मंत्री यांसह शहर, नदी, वन व पर्वत पार करून समुद्रकिनाऱ्यावर आला. तिथे एक छोटीशी नाव होती. त्यात तिघेही बसले. नावाड्याखेरीज इतर कुणासाठी त्यात जागा उरली नव्हती. नाव एका बेटाला लागली. तिथे चारी बाजूला दूरवरपर्यंत राख पसरलेली होती व बगळे घिरट्या घालत होते. राखेच्या मधोमध एक पाऊलवाट होती, त्यावर ते चालू लागले. "हा बहुतेक जादूटोण्याचा टापू दिसतोय. आम्हाला आता कुठे नेणार आहेस रे बैरागी?" मंत्र्यांनी भयभीत होऊन आपली तलवार उपसली व विचारले.
"घाबरण्यासारखे काहीही नाही. हा जादूटोण्याचा देश नाही आहे. अपार धनदौलत असलेले हे एक छोटेसे बेट आहे. जास्त लोक दिसले की बगळे घाबरून जातील, म्हणून मी तुमच्या अंगरक्षकांना तटाच्या बाजूला थांबवले आहे," बैराग्याने मंत्र्याला सांगितले.
चालता चालता बैरागी एका ठिकाणी थांबला. तिथे एक लोखंडी दरवाजा होता. बैराग्याने दार उघडून राजाला आत जाण्यास सांगितले. आत जाताच खाली जाण्याचा जिना केलेला होता. राजा निर्भयपणे एकटाच आत शिरला. तिथे मोठ्या गुहेत मोत्यांचे भांडार होते. राजा ते पाहून आश्चर्यचकित झाला. डोळे विस्फारून तो फिरत राहिला. तिथे मौल्यवान मोत्यांचे ढीगच्या ढीग होते, ते तो खूप वेळ पाहत बसला. जेव्हा बराच वेळ राजा वर आला नाही, तेव्हा मंत्री पुन्हा साशंक झाला. मंत्र्याने बैराग्याला पकडले व आपली तलवार परजली. तोच राजा आतून आला व मंत्र्याला म्हणाला, "जा, तुम्हीही पाहून या."
जेव्हा मंत्री खाली गेला तेव्हा त्यालाही आश्चर्याचा धक्का बसला. बैराग्यावर संशय घेण्यात त्याची चूक झाली हे त्याला उमजले. बैराग्याने जे काही सांगितले होते, तसे करून दाखवले. वरती येऊन मंत्र्याने बैराग्याची माफी मागितली. राजाने बैराग्यास मोत्यांचे रहस्य विचारले. बैराग्याने सविस्तर हकीकत सांगितली. तो म्हणाला, "माझे नाव सदानंद आणि मी एक व्यापारी आहे. समुद्रावर जहाजांतून आपला माल घेऊन अनेक बेटांवर मी जात असे. तेव्हा या बेटाबद्दलचे एक रहस्य मला कळले. बेटाच्या चारी दिशांना लहानमोठे खडक आहेत. भरती-ओहोटीच्या वेळी हे खडक स्पष्ट दिसतात. या खडकांत अगणित शिंपले आहेत. शिंपल्याच्या आतल्या मासळीसाठी बगळे त्यांना उचलून आणतात आणि या खडकांवर बसतात. शिंपल्यात तेजस्वी मोती असतात. या मौल्यवान मोत्यांचा मला संग्रह करायचा होता! परंतु तेव्हा दुर्दैवाने एका अपघातात माझी पत्नी व मुले वारली. या आघातानंतर मी आयुष्यात कोलमडूनच गेलो. तरीसुद्धा या बेटांतल्या मोत्यांत माझे मन रमत होते. मला वाटले की जोपर्यंत या मोत्याबद्दलची माझी आसक्ती सुटत नाही, तोपर्यंत मी खरा विरक्त बैरागी होऊ शकणार नाही. म्हणून मी आपल्याजवळ आर्थिक मदत मागितली. आपल्या धनाचा उपयोग करून हे भूमिगत भांडार बनवले. इथे सगळीकडे राख पसरली, त्यामुळे राखेखाली लपलेले मोती बगळ्यांना दिसत नाहीत व ते पुन्हा आणखी शिंपले आणून टाकतात. नंतर काही माणसांच्या मदतीने मी शिंपल्यातले मोती काढले आणि तळघरातल्या भांडारात ते सुरक्षित ठेवले."
"मला ठाऊक होते की प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवाल. म्हणून ही सारी योजना आपल्यापासून गुप्त राखली. मी जे वचन दिले होते, ते पूर्ण केले आहे. आता आपणच या मोत्यांचे मालक आहात. आता मला जीवनाबद्दल यत्किंचितही आसक्ती उरलेली नाही. यापुढे शांतपणे तपस्या करण्याची माझी इच्छा आहे. आपण व आपली प्रजा सुखी राहू देत."
एवढे बोलून मोत्यांचा सारा खजिना राजाकडे सोपवून बैरागी तिथून निघून गेला.