दोन चोर
भवानीपूरवर राजा चित्रसेन राज्य करत होता. त्या काळात राज्यात रूपम नावाचा एक चोर होता. राजधानीतल्या अनेक घरी त्याने लुटालूट केली होती. पहारेकऱ्यांची नजर चुकवून राजधानीतल्या रस्त्यांवरून तो भटकत असे.
एकदा रूपमने एका अधिकाऱ्याच्या घराच्या भिंतीला भोक पाडले आणि तो आत घुसला. तिथे त्याला अनेक मौल्यवान वस्तू मिळाल्या. रूपम व त्याच्या साथीदारांना आपल्या घरात पाहून तो अधिकारी खूप घाबरला. आपला जीव वाचवण्यासाठी त्याने मुकाट्याने सर्व वस्तू रूपमच्या हवाली केल्या. रूपम मोठ्या खुशीने त्या वस्तू घेऊन निघून गेला.
यानंतर बरोबर एका आठवड्याने रूपम एका व्यापाऱ्याच्या घरात घुसला. चाकू दाखवून त्याने त्या व्यापाऱ्याला घाबरवले; आणि घरात ज्या काही वस्तू मिळाल्या त्या सर्व एका गाठोड्यात बांधून घेऊन तो निघून गेला.
नंतर त्याने एका शेतकऱ्याचे घर फोडले. तिथे त्याला काही किमती दागिने मिळाले. तेही एका थैलीत घालून रूपम पळून गेला.
आणखी काही दिवसांनी त्याने एका पुजाऱ्याच्या घरात प्रवेश केला. जे काही मिळाले त्या सर्वांचे एक गाठोडे आपल्या साथीदारांच्या हाती देऊन तो त्यांच्यासह नाहीसा झाला.
रूपमने चोरलेल्या सर्व वस्तू एकदा तपासून पाहिल्या, तेव्हा त्याला असे आढळून आले की राजाच्या अधिकाऱ्याच्या घरात आपल्याला जो माल मिळाला तोच इतरत्र मिळालेल्या वस्तूंहून अधिक मौल्यवान आहे.
रूपमने आणखी एक आश्चर्यजनक गोष्ट ओळखली. ती म्हणजे- आपापल्या घरात झालेल्या चोरीबद्दल केवळ हा अधिकारी सोडून बाकी सर्वांनी राजाकडे तक्रार नोंदवली होती. हाच एकटा असा गप्प का राहिला याचे रूपमला कोडे पडले.
दोन महिन्यांनी पुन्हा एकदा याच अधिकाऱ्याकडे रूपमने घरफोडी केली; अन् यावेळी तर त्याला पहिल्यापेक्षाही अधिक किमती माल मिळाला! नंतर त्याने क्रमांकाने पुन्हा व्यापारी, शेतकरी व पुजारी यांच्या घरी चोरीसाठी प्रवेश केला. पण त्याला यांपैकी कुठेच काही मौल्यवान वस्तू मिळाल्या नाहीत. ते तिघे तर बिचारे आपल्याकडे झालेल्या चोरीच्या धक्क्यातून अजून सावरलेही नव्हते!
याही वेळी पुन्हा तो अधिकारी सोडून बाकीच्यांनी आपल्याकडे पुन्हा चोरीचा प्रयत्न झाल्याबद्दल तक्रारी केल्या. याही वेळी त्या अधिकाऱ्याच्या चूप बसण्याबद्दल रूपमला आश्चर्य वाटले. त्याने ओळखले की इथे नक्कीच काहीतरी 'पाणी मुरतंय!'
एकदा एका धनवान माणसाचे घर लुटताना रूपम पकडला गेला. त्या मालकाने चोराची चौकशी केली, तेव्हा त्याला कळून चुकले की आपल्या नोकरांनी पकडलेला चोर हा कुप्रसिद्ध डाकू रूपम होय! मालक नोकरांना शाबासकी देत म्हणाला— "अरे, राजाचे शिपायांना सुद्धा हर प्रयत्नाने ज्याला पकडू शकले नाहीत, अशा कुप्रसिद्ध चोराला तुम्ही पकडलं आहे. आता याला नीटपणे घेऊन जाऊन राजाच्या शिपायांच्या हाती सुपूर्त करून या. याच्या अपराधांबद्दल राजा स्वतःच चौकशी करून योग्य शिक्षा देईल."
नोकरांनी रूपमला राजाच्या शिपायांच्या ताब्यात दिले. शिपायांनी नंतर त्याला राजासमोर हजर केल्यावर राजाने त्याला विचारले— "चोर कितीही हुशार झाला, तरी एक ना एक दिवस पकडला जातोच, ही गोष्ट तुझ्या बाबतीत सिद्ध झाली अखेर! आता बोल, चोरीचा सर्व माल आमच्या स्वाधीन करतोस, की आमची खास अशी शिक्षा भोगायला तयार आहेस?"
"महाराज, एकदा पकडलं गेल्यावर अडेलतट्टूपणा करण्यात काय अर्थ! मी जे जे काही चोरलं, ते सर्व तुमच्या हवाली करायला तयार आहे." रूपम म्हणाला.
चोरीच्या वस्तू लपवण्याच्या जागेचा पत्ता त्याने शिपायांना सांगताच ते जाऊन सर्व माल घेऊन आले. व्यापारी, शेतकरी व पुजारी यांना चोर पकडल्याची वार्ता कळताच ते राजाकडे आले व 'आपल्या वस्तू आपल्याला परत मिळाव्या' अशी त्यांनी विनंती केली.
राजाने रूपमला त्या सर्व वस्तू ज्याच्या ज्याच्या असतील त्याप्रमाणे निरनिराळ्या करायला सांगितले. रूपमने व्यापारी, शेतकरी व पुजारी यांच्या वस्तू वेगवेगळ्या करून ठेवल्या व अधिकाऱ्याच्या वस्तू एका बाजूला ठेवून म्हटले— "महाराज, या वस्तू मी राजमार्गावरच्या कोपऱ्यावरील विहीरीजवळच्या तुमच्या एका अधिकाऱ्याच्या घरातून चोरलेल्या आहेत."
ते ऐकून राजाला आश्चर्य वाटले! "इतक्या मौल्यवान वस्तू एकाद्या सामन्त राजाच्या घरी आढळू शकतील. पण एका साध्याशा अधिकाऱ्याच्या घरात नाही मिळायच्या! तुझ्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवावा, तेच मला कळेनासं झालंय; अन् त्याने तर चोरीबद्दल आमच्याकडे तक्रारही नोंदवली नाही!"
यावर हसून रूपम म्हणाला— "महाराज, मलाही तसंच आश्चर्य वाटलं होतं की, फक्त यानेच चोरीची फिर्याद का केली नाही? नंतर माझ्या बरोबर लक्षात आलं की हा अधिकारी पहिल्या नंबरचा लाचखाऊ माणूस आहे. लोकांकडून लाच घेण्याच्या कामात तो इतका पुढे गेला आहे की तो माझ्यापेक्षाही अव्वल दर्जाचा चोर ठरावा! आपल्या जुलूम-जबरदस्तीचा पत्ता लागू नये, म्हणून त्याने आपल्याकडच्या चोरीची हकीकतही लपवून ठेवली!"
"माझ्या दरबारात लाचलुचपत?" राजा आश्चर्याने म्हणाला आणि त्याने शिपायांकरवी त्या अधिकाऱ्याला बोलावून घेतले.
कडक शब्दात धमकी देऊन राजाने अधिकाऱ्याकडून गुन्हा कबूल करून घेतला. तातडीने त्याला कैदेची शिक्षा सुनावली गेली. नंतर राजा रूपमला म्हणाला— "तुझ्यामुळे एका लाचखाऊ अधिकाऱ्याला शिक्षा मिळाली. आता या उदाहरणामुळे इतर असे अधिकारीही वठणीवर येतील. ठीक आहे; बोल, आता तुला काय शिक्षा द्यावी?"
यावर हात जोडून रूपम म्हणाला— "प्रभू, मी सर्वात कुप्रसिद्ध असा चोर पकडून दिला, याबद्दल खरं तर मला काही बक्षीस मिळायला हवं, अन् आपण शिक्षेचा विचार करीत आहात?"
त्याच्या या बोलण्यावर हसून राजा बोलला— "ओहो! तुला बक्षीस हवं ना? मग ऐक तर - आजपासून तू आणि तुझे साथीदार, या सर्वांनी चोरी करायचे सोडून देऊन काही चांगले करून जगायला लागावे. हां, पुन्हा जर तुम्ही चोऱ्या करीत आहात अशी खबर मिळाली तर मात्र सर्वांनाच सुळावर चढवीन." अशा तऱ्हेने तंबी देऊन राजाने रूपमला ताबडतोब मुक्त केले.