Bookstruck

देवाचा धर्म

प्राचीन काळी काशी येथे एक राजा राज्य करीत असे. त्याच्या पट्टराणीला दोन मुलगे झाले. राजाने त्यांची नावे अनुक्रमे महिंसास व चंद्रकुमार अशी ठेवली. महिंसास हाच बोधिसत्व होता. चंद्रकुमार लहान असतानाच त्याची आई म्हणजे पट्टराणीने परलोकगमन केले. राजाने पुन्हा दुसरे लग्न केले आणि नवीन राणी पट्टराणी झाली. राणी फार सुंदर होती, राजावर तिचे फार प्रेम होते. राजा देखील तिचा आदर करी. यथासमयी नव्या पट्टराणीला एक मुलगा झाला. त्याचे नाव सूर्यकुमार असे ठेवण्यात आले. राजाने राणीला विचारले— "या बारशाच्या वेळी तू पाहिजे तो वर मागून घे!" तेव्हा राणी म्हणाली— "मी आवश्यकता भासली म्हणजे वर मागून घेईन." काही वर्षांनी सूर्यकुमार वयात आला व राजाला योग्य अशा सर्व विद्यांत पारंगत झाला. तेव्हा त्याच्या आईने राजाला विचारले— "आपण मला मागे एक वर दिला होता. तो आठवतो का? तो आता मागावा म्हणते!" राजा म्हणाला— "मागून घे!" राणी म्हणाली— "मेरे मुलालाच आपण गादीला वारस म्हणून नेमावे." पण राजा म्हणाला— "दोन मोठे पराक्रमी मुलगे असता धाकट्याला वारस कसा काय नेमू म्हणतेस?" परंतु राजाला राणीची गोष्ट मानावीच लागली. तरी मोठ्या मुलांच्या जिवाला काही अपाय करण्याची दुर्बुद्धी राणीला झाली तर बरे नाही असा विचार करून राजाने आपल्या दोघा मोठ्या मुलांना बोलावून समजावून सांगितले— "मुलांनो! मी सूर्यकुमारच्या आईला त्याच्या जन्माच्या वेळी एक वर दिला होता. तिने आज तो वर मागून आपल्या मुलाला वारस करण्यासाठी हट्ट धरला आहे. स्त्री हट्टाला पेटली की काय वाटेल ते करायला तयार होते, असा विचार करून मी तिच्या मुलालाच आपला वारस करण्याचे ठरविले आहे. परंतु तुमच्या जिवाला काही अपाय होऊ नये म्हणून तुम्ही घराबाहेर निघून कोठे तरी गुप्तपणे रहा. मी मेल्यावर सूर्यकुमारचा पराभव करून राज्य जिंकून घ्या." दोघे भाऊ पित्याच्या इच्छेला मान देऊन पित्याचा निरोप घेऊन निघाले. सूर्यकुमारला ती गोष्ट कळली. त्यांच्या बरोबर जाण्यास त्याने हट्ट केला आणि तोही निघाला. ते तिघे भाऊ हिमालय पर्वतावर जाऊन पोहोचले. बोधिसत्व धाकट्या सूर्यकुमाला म्हणाला— "त्या सरोवरावर जाऊन प्यायला पाणी घेऊन ये." ते सरोवर एका यक्षाचे होते. कुबेराने ते सरोवर त्या यक्षाला एका अटीवर दिले होते— "ज्यांना देवाचा धर्म काय आहे हे माहीत आहे अशा लोकांना तू कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नकोस. पण इतर कोणी या सरोवरात पाऊल टाकले तर त्यांना धरून खाऊन टाक. परंतु कोणी सरोवरात पाऊल टाकले नाही तर मात्र तू त्यांच्या वाटेस जाता कामा नये." त्या दिवसापासून तो यक्ष त्या सरोवरात पाऊल टाकणाऱ्या सर्वांना "देवाचा धर्म काय?" असा प्रश्न करी आणि कोणी बरोबर उत्तर दिले नाही तर त्याला खाऊन टाकी. म्हणून सूर्यकुमारने सरोवरात पाऊल टाकल्याबरोबर त्या यक्षाने त्याला विचारले— "तुला देवांचा धर्म माहीत आहे का?" सूर्यकुमार म्हणाला— "होय माहीत आहे! देवांचा धर्म म्हणजे सूर्य व चंद्र!" यक्ष म्हणाला— "तुला देवांच्या धर्माची कल्पना देखील नाही." असे सांगून त्या यक्षाने सूर्यकुमारला आपल्या घरी कैद करून ठेवले. सूर्यकुमार बराच वेळ झाला तरी न आलेला पाहून बोधिसत्त्वाने चंद्रकुमारला पाठविले. यक्षाने त्याला तोच प्रश्न विचारला. चंद्रकुमार म्हणाला— "देवांच्या धर्माचा अर्थ चार दिशा!" यक्षाने त्याला देखील कैद करून ठेवून दिले. चंद्रकुमार देखील परत न आलेला पाहून बोधिसत्त्वाला दोघांवर काहीतरी संकट ओढवले असल्याचा संशय आला. म्हणून तो स्वतः निघाला. त्याला सरोवरात दोघांची पावले जात असलेली दिसली, पण परत आलेली दिसली नाहीत. ते पाहून या सरोवरात कोणी यक्ष किंवा राक्षस असणार असा विचार करून बोधिसत्त्वाने आपली तलवार उपसली व तो राक्षस बाहेर येण्याची वाट पाहू लागला. बोधिसत्व सरोवरात उतरत नाही हे पाहून यक्ष एका रानटी माणसाचे रूप घेऊन जवळ येऊन म्हणाला— "अहो! तहान लागली असेल तर पाणी पिऊन घ्या. असे बाहेर उभे का?" तो मनुष्य सरोवरातला यक्ष असावा असा संशय बोधिसत्त्वाला आला. म्हणून त्याने विचारले— "माझ्या दोघा भावांना तूच कैद करून ठेवले आहेस ना?" "होय!" यक्ष म्हणाला. "का?" बोधिसत्त्वाने विचारले. "जो कोणी या सरोवरात पाऊल ठेवतो, तो मला वश होऊन जातो." यक्ष म्हणाला. "प्रत्येक व्यक्ती?" बोधिसत्त्वाने आश्चर्य करीत विचारले. "जे देवांचा धर्म ओळखतात ते मला वश होत नाहीत." यक्ष म्हणाला. "मी देवांचा धर्म काय, हे सांगतो." बोधिसत्व म्हणाला. "तर मग सांग!" यक्ष म्हणाला. "स्वाभिमान, परनिंदा करण्यात भय, परहित आणि शांतवृत्ति हा उत्तम पुरुषाचा धर्म होय!" बोधिसत्व म्हणाला. बोधिसत्त्वाचे ते उत्तर ऐकून यक्ष खूप खुश झाला. त्याने बोधिसत्त्वाच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली आणि त्याचा यथोचित सत्कार करून म्हणाला— "मी आपल्या या उत्तराने संतुष्ट झालो आहे. मी आपल्या दोघा भावांपैकी एकाला मुक्त करायला तयार आहे. कोणाला मुक्त करू?" "माझा सर्वात धाकटा भाऊ सूर्यकुमार याला मुक्त कर." बोधिसत्व म्हणाला. "काय हो तुम्हांला देवांचा धर्म फक्त बौद्धिकदृष्ट्या माहीत आहे. प्रत्यक्षात तसे दिसत नाही." यक्षाने संशय करीत विचारले. "ते कसे काय?" बोधिसत्त्वाने विचारले. "तुम्ही आपल्या पाठच्या भावाला सोडून धाकट्या भावाला मुक्त करायला सांगता आहात. पाठच्याला पहिल्याने नको का मुक्त करायला?" यक्षाने विचारले. "यक्षा, मी देवांच्या धर्माचेच पालन करीत आहे. म्हणूनच मी धाकट्या भावाला मुक्त करण्यास तुझ्याजवळ विनंती केली. मी आपल्या धाकट्या भावासाठीच तर जंगलात आलो. माझ्या सावत्र आईने आपल्या मुलासाठी राज्य मागितले होते व आमच्या हितासाठी आमच्या बाबांनी आम् आम्हांला जंगलात जायला सांगितले. मी धाकट्या भावाला घेऊन जंगलात निघालो होतो. पण तो हट्ट करून आमच्या बरोबर जंगलात आला. अशा भावाला मुक्त केल्याशिवाय मी घरी परत जाऊ म्हणतोस? आणि घरी जाऊन त्याला कोणी रानटी पक्षाने खाऊन टाकले, असे सांगू का?" "शाब्बास! तुम्हांला देवांचा धर्म बौद्धिक दृष्ट्या माहीत आहेच, त्याचबरोबर त्या धर्माचे पालन कसे करावयाचे हे देखील माहीत आहे." असे सांगून यक्षाने सूर्यकुमार व चंद्रकुमार दोघांना आणून बोधिसत्त्वांसमोर हजर केले. त्यानंतर काही दिवसांनी वृद्ध महाराज मरण पावल्याचे बोधिसत्त्वाला कळले. म्हणून आपल्या दोघा धाकट्या भावांना घेऊन बोधिसत्व राजधानीला परतला. स्वतःचा राज्याभिषेक करून घेऊन चंद्रकुमारला युवराजपद दिले आणि सूर्यकुमारला सेनापती नेमले आणि न्यायधर्माने राज्य करू लागला.