Bookstruck

तांब्याचे कडे

सीतापूर गावात श्रीमुख नावाचा एक विद्वान गृहस्थ रहात असे. निस्वार्थ सेवाभावने तो अनेक विद्यार्थ्यांना विद्यादान करत असे. स्वतःसाठी तो कधीच कोणासमोर हात पसरत नसे. त्यामुळे गावचे लोक पुष्कळदा त्याला बक्षीस-रूपाने काही देऊन त्याच्याबद्दल आपला आदर प्रकट करत. त्याच्या कुटुंबासाठी आवश्यक अशा सर्वच वस्तू गाववाले त्याच्याकडे आपण होऊनच पोहोचवत असल्याने त्याचे दिवस सुखासमाधानाने व्यतीत होत असत. परंतु श्रीमुखचा मुलगा चतुर्मुख याला मात्र अभ्यासाची मुळीच आवड नव्हती; नेहमीच तो गावात इतरांच्या खोड्या काढत फिरत असे. गाववाले खरे तर त्याच्या खोड्यांमुळे त्रासून गेले होते, परंतु त्यांच्या मनात श्रीमुखबद्दलचा आदर असल्यामुळे ते हा त्रास निमूटपणे सहन करीत. श्रीमुखला हे सर्व कळत असे, परंतु त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न करून तो हारला होता. आपल्या या एकुलत्या एका पोराच्या नशिबात काय आहे याची त्याला नेहमीच काळजी लागून राहिलेली असे. एक दिवस श्रीमुखचा एक जुना विद्यार्थी महानंद हा त्याला भेटण्यासाठी आला. महानंदाने श्रीमुखकडे सकल शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि नंतर कठीण तपश्चर्या करून त्याने अनेक अद्भुत अशा सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या. आता आपल्या गुरुला काही गुरुदक्षिणा देण्याच्या विचाराने तो त्यांच्याकडे आला होता. "तू चांगलं नाव मिळव, तीच माझी खरी गुरुदक्षिणा होईल," श्रीमुख महानंदाला म्हणाला. पण श्रीमुखने आपल्याकडून काही घ्यावेच असा महानंदाचा आग्रह होता. तेव्हा श्रीमुखने त्याच्याजवळ आपल्या मुलाचा—चतुर्मुखचा विषय काढला व गुरुदक्षिणा म्हणून मुलाला सुधारायचे काम त्याच्यावर सोपवले. महानंदाने चतुर्मुखला बोलावून त्याच्याशी काही गप्पागोष्टी केल्या. एकूण अंदाज घेऊन त्याला नीट मार्गावर आणण्याचे प्रयत्नही महानंदाने करून पाहिले. पण पालथ्या घड्यावर पाणी! चतुर्मुखमध्ये काहीच सुधारणा होईना. शेवटी आपल्या तपोबळाचा वापर करून महानंदाने एक तांब्याचे कडे निर्माण केले आणि ते चतुर्मुखच्या हातात घालून तो म्हणाला— "हे नेहमी आपल्या हातातच राहू दे. ते असले म्हणजे विद्वत्ता आणि सद्वर्तन या बाबतीत तुझ्याशी कोणीही बरोबरी करू शकणार नाही. या कड्यापासून केवळ तुझ्या एकट्याचाच फायदा होईल. रोज आंघोळ झाल्यावर लगेच ते हातात चढवत जा. यामुळे तुझे नक्कीच कल्याण होईल." त्या दिवसापासून खरोखरीच चतुर्मुख आमूलाग्र बदलून गेला. प्रत्येकाशी तो मोठ्या लीनतेने बोलू लागला. त्याच्या बोलण्यात विलक्षण अशी विद्वत्ताही प्रतीत होऊ लागली! श्रीमुखने आपल्या चिरंजीवाच्या विद्वत्तेची परीक्षा करून त्याला म्हटले— "चतुर्मुख, तुझी विद्वत्ता इथे अशीच कुजत राहणे बरे नव्हे. तू राजधानीला जा आणि प्रसिद्ध अशा विद्वानांसमोर आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन कर. अशा प्रकारे तुझी विद्वत्ता सार्थकी लागेल." पित्याच्या आज्ञेनुसार चतुर्मुख राजधानीला गेला, पण राजाचे दर्शन काही त्याला मिळाले नाही. कोणीतरी त्याला सांगितले की विद्वत्ता दाखवून द्यायची असेल तर दरबारी पंडित विद्याधर याला खुश करायला हवे. हे ऐकून चतुर्मुख विद्याधरकडे गेला. पण त्या दरबारी पंडिताने चिडून, मोठ्याने गर्जत चतुर्मुखला हाकलून लावले! आता चतुर्मुख वैतागून गेला. त्याला वाटले की आपण परत आपल्या गावी निघून जावे. पण पुन्हा दुसरा विचार असाही आला की आपल्या पित्याची आज्ञा न पाळता तसेच निघून जाणेही योग्य नव्हे. आणखी काही दिवस गेले आणि चतुर्मुख जवळचे पैसेही संपून गेले. तेव्हा हताश होऊन तो राहत असलेल्या खानावळीच्या मालकाला म्हणाला— "महाराज, माझ्या जवळचा पैसा तर संपून गेला, पण अजूनही मला राजाचे दर्शनही झाले नाही. ते होईपर्यंत आपण मला इथे राहून दिलेत, तर त्या बदल्यात मी रोज आपणाला गीतासार सांगत जाईन." चतुर्मुखच्या एकूण चालचणुकीवर तो मालक खूप होता, त्यामुळे त्याने हा प्रस्ताव मान्य केला. त्या दिवसापासून चतुर्मुख खानावळ मालकाला भगवद्गीतेतल्या श्लोकांचा अर्थ सांगू लागला. चतुर्मुखच्या गीतासाराच्या विवरणावर तो मालक फारच मोहून गेला. एके दिवशी राजाने राजधानीतल्या सर्वच खानावळ मालकांना बोलावून घेऊन म्हटले— "तुम्ही सर्वजण राजधानीतल्या खानावळी मोठ्या उत्तम तऱ्हेने चालवत आहात. तुम्ही हे सर्व कसे करू शकता? तुमच्या यशाचे गमक मला सांगाल?" सर्व खानावळवाले आपल्या मोठेपणाच्या गोष्टी अगदी अहमहमिकेने सांगू लागले. परंतु चतुर्मुख रहात असलेला खानावळवाला मात्र म्हणाला— "एका खानावळीचे असे जे सर्वसाधारण नियम असतात, तेच फक्त मी पाळत असतो. बाकी सर्व त्या देवाची कृपा! बस, त्यामुळेच तर सर्व ठीकठाक चाललंय!" राजा यावर आश्चर्याने म्हणाला— "अरे, देवाच्या कृपेच्या गोष्टी कशाला सांगतोस? तुझा स्वतःच्या शक्तीवर विश्वास नाही काय?" "महाराज, आम्हाला जे करायला हवं ते मी करतोच. पण त्याचं फळ किंवा त्यातला मोठेपणा हा काही माझा नव्हे. असं पहा, शेतकरी नांगरणी वगैरे करून चांगलं पीक काढू इच्छित असतो. पण पाऊस नीट झाला तरच तो हे करू शकतो ना? पाऊसच नाही पडला तर शेतकऱ्याच्या स्वतःच्या शक्तीचा काय उपयोग? पण पाऊस पडूनही केवळ मानवाच्या प्रयत्नावाचून काहीच होऊ शकत नाही. तेव्हा देवाची कृपा व मानवाची मेहनत या दोन्हीची नितांत आवश्यकता असते," तो खानावळ मालक उत्तरला. यावर राजा तत्काळ म्हणाला— "तू तर मोठा ज्ञानी दिसतो आहेस. उद्याच्या दरबारात मी तुझा सत्कार करीन." यावर खानावळवाला चकित होऊन म्हणाला— "महाराज, या सत्काराला मी योग्य नाही. ज्याने मला हे ज्ञान दिलं तो पंडित बिचारा किती दिवसांपासून आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करत आहे. त्याची इच्छा आपण पूर्ण करावी महाराज!" दुसऱ्या दिवशी चतुर्मुखला बरोबर घेण्याची आज्ञा राजाने त्या खानावळवाल्याला दिली. घरी गेल्यावर हे सर्व वर्तमान त्याने जेव्हा चतुर्मुखला सांगितले तेव्हा त्याने याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी चतुर्मुख राजदरबारात हजर झाला. चतुर्मुखने तेथे जेव्हा पुराणांवर व्याख्यान दिले, तेव्हा दरबारीतील सर्व पंडित ते आश्चर्याने ऐकत राहिले! राजाने चतुर्मुखची प्रशंसा केली. तो म्हणाला— "आपण तर महान पंडित आहात! मला भेटण्यापूर्वी आपण जर पंडित विद्याधर यांना भेटला असतात तर आपल्याला इतके दिवस वाट पाहावी लागली नसती." तेव्हा चतुर्मुखने आपण एकदा विद्याधरची भेट घेतली असल्याबद्दलची वार्ता सांगितली आणि त्याने चिडून आपल्याला कसे हाकलून दिले, ते ही सांगितले. हे ऐकून राजाला वाईट वाटले. तो चतुर्मुखला म्हणाला— "महाराज, आपला असा अपमान झाला, याचे मला फार दुःख होत आहे. मी तर हा आपल्या दरबाराचाच अपमान मानतो. आपण स्वतः आमचे दरबारी पंडित विद्याधर यांना काही शिक्षा द्याल, तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल." स्वीकारात्मक डोके हलवून चतुर्मुखने हातातले तांब्याचे कडे काढून राजाच्या हाती दिले. नंतर तो विद्याधरजवळ गेला आणि त्याने अनेक प्रकारे शिवीगाळ करून त्या दरबारी पंडिताची भर दरबारात खूप निंदा केली. त्यावेळची चतुर्मुखची वागणूक एखाद्या अशिक्षित अडाणी माणसासारखी होती. ते पाहून राजालाही मोठे आश्चर्य वाटले. विद्याधर तर काहीच बोलू शकला नाही; तो बिचारा शरमेने मान खाली घालून अपशब्द ऐकत राहिला. यानंतर चतुर्मुखने तांब्याचे कडे राजाकडून परत घेऊन हातात घातले. राजा त्याला म्हणाला— "महापंडितजी, मी आपल्याला एक लहानशी संधी काय दिली, अन् तुम्ही तर विद्याधरला घाणेरड्या शिव्या देऊन त्याची निंदा केलीत. तुमची वागणूक तर या दरबारालाच अपमानजनक अशी झाली. तरीही मला असं वाटतंय की यात काही विशेष असा अर्थ दडलेला असावा. सांगा बरं काय प्रकार आहे, आम्हाला तरी कळू दे?" चतुर्मुख मोठ्या अदबीने राजाला म्हणाला— "क्षमा असावी प्रभू, आपल्या वागणुकीची मला स्वतःलाच लाज वाटते आहे. माझा मोठेपणा हा माझा स्वतःचा नव्हे, तो या तांब्याच्या कड्याचा मोठेपणा आहे." असे म्हणून त्याने आपली स्वतःची कहाणी राजाला कथन केली. ती ऐकून राजाला आणखीच आश्चर्य वाटले. तो म्हणू लागला— "पंडितोत्तम! मग तुम्ही हे कडे धारण करूनच विद्याधरला शिक्षा द्यायला गेला असतात, तर किती बरं झालं असतं! तुम्ही तर कडे उतरवून माझ्या हाती देऊन विद्याधरची अयोग्य शब्दात निंदा करायला सरसावलात!"