Bookstruck

जानव्याचे वजन

एका गावी एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो अशिक्षित होता. परंतु त्याला पैसे मिळवण्याचा मोह होता. एके दिवशी तो ब्राह्मण दुसऱ्या गावी गेला. तेथे एका चौथऱ्यावर एक म्हातारा ब्राह्मण बसलेला होता. तो जानवी मोजून विकत असे. तराजूच्या एका पारड्यात तो जानवे ठेवी व दुसऱ्या पारड्यात गिऱ्हाईकाला पैसे टाकायला सांगे. काही लोक तांब्याची नाणी टाकीत तर काही चांदीची टाकीत. परंतु त्या नाण्यांच्या वजनाशी आणि जानव्यांच्या वजनाशी परस्पर काहीच संबंध नसे. ते पाहून तरुण ब्राह्मण चकित झाला. काही वेळ तो ती गंमत पाहत उभा राहिला, पण राहवले नाही तेव्हा त्याने त्या म्हाताऱ्या ब्राह्मणाला विचारले— "काय हो! मी एक गरीब ब्राह्मण आहे, मला एक जानवे दान म्हणून देता का?" म्हाताऱ्याने त्याला एक जानवे दिले. ते घेऊन तो गरीब ब्राह्मण त्या देशाच्या राजाकडे गेला आणि म्हणाला— "महाराज! माझ्याजवळ एक जानवे आहे. मला त्याच्या वजनाएवढे सोने दिलेत तर आपले फार उपकार होतील माझ्यावर." राजाने होकार दिला. मंत्र्याने एक तराजू मागविला. एका पारड्यात जानवे व दुसऱ्यात सोने ठेवून वजन करून पाहिले. परंतु जानव्याचे पारडे खालीच राहिले. मंत्र्याने आणखी थोडे सोने टाकले. तरी जानव्याचे पारडे खालचे खालीच. मंत्री थोडे थोडे सोने टाकीत गेला तरी जानव्याचे पारडे जागेवरून हालेना. तेव्हा राजा व मंत्री परस्परांकडे चकित होऊन पाहू लागले. मंत्र्याला एक उपाय सुचला. तो ब्राह्मणाला म्हणाला— "हे पहा, जेवणाची वेळ झाली आहे. तेव्हा जेवून घ्या. त्यानंतर बसू पुन्हा जानव्याचे वजन करायला." असे सांगून मंत्र्याने ब्राह्मणासमोरच त्याच्या जेवणासाठी पावशेर तांदूळ आणून ते पारड्यात घातले. पावशेर तांदळाचे वजन बरोबर जानव्याइतके असल्याचे आढळले. त्या तांदळाचा भात शिजवून ब्राह्मणाला जेवायला वाढण्याची व्यवस्था झाली. ब्राह्मणाला पोटभर जेवायला मिळाले. तेव्हा मंत्री राजाला ऐकू जाईल इतक्या हळू स्वरात म्हणाला— "महाराज! मला वाटले होते तसेच घडले. हा ब्राह्मण जानवे घेऊन आला आहे त्यात एक विशेष आहे. ब्राह्मणाच्या मनाचे समाधान झाले पाहिजे. पावशेर तांदळाचा भात ब्राह्मणाला लागतो. म्हणून बरोबर पावशेर तांदूळ जानव्याच्या वजनाएवढे झाले. सोन्याने पोट भरणे शक्य नव्हते. मनाचे समाधान व्हायला पोटभर अन्न हेच मुख्य असते. आपण किती सोने घातले असते तरी जानव्याचे वजन जास्तच राहिले असते." "हो, पण आपण जानव्याच्या वजनाचे सोने द्यायचे कबूल केले आहे ना?" राजाने विचारले. "ते मी पाहून घेईन." मंत्री म्हणाला. ब्राह्मण जेवणखाण आटोपून थोडा वेळ वामकुक्षी करून आला आणि म्हणाला— "मला जानव्याच्या वजनाएवढे सोने देऊन निरोप द्या, महाराज!" मंत्री म्हणाला— "तुम्हाला जानव्याच्या वजनाएवढे सोने दिले तर ते तुम्हाला घरी नेणे अशक्य होईल. वाटेत चोर भामटे लुबाडून घेऊन जातील. तुम्ही स्वतःच पाहिलेत, जानव्याचे वजन पावशेर तांदळाएवढे आहे. दररोज राजवाड्यात येऊन जेवून जाणे तुम्हाला आवडेल की तुम्हाला तेवढे सोने हवे आहे? तुम्हीच ठरवा." ब्राह्मणाने विचार केला, जानव्याचे वजन फार तर पावशेर सोन्याएवढेच होणार. तो म्हणाला— "महाराज! मला दररोज पोटभर जेवायला मिळाले की माझे समाधान होईल!"