All Marathi Stories
जडभरत
भरत नावाचा एक राजा वृद्ध झाल्यावर आपले राज्य मुलांवर सोपवून संन्यस्त जीवन व्यतीत करण्यासाठी वनात निघून गेला. एके दिवशी स्नान करताना त्याने एक मृगशावक पाहिले. त्याची आई मरून गेली होती म्हणून दया येऊन राजा त्याला आपल्या झोपडीत घेऊन आला व आपल्या मुलाप्रमाणे त्याचे पालन करू लागला. ते शावक वाढून मोठे झाले. त्याच्यावरील विशेष वात्सल्यामुळे मृत्यूसमयी राजाला त्याचेच स्मरण होत होते. पण त्यामुळे त्याला हरणाच्या रूपात पुन्हा जन्म मिळाला. मागील जन्मी हरिणात फार मन अडकल्याने आपल्याला पुनर्जन्म मिळाल्याचे त्याला या जन्मी फार दुःख वाटले. या हरणाच्या मृत्यूनंतर त्याला एका ब्राह्मणाच्या घरी जन्म मिळाला.
पूर्वजन्माची आठवण असल्यामुळे आता तो प्रत्येक वस्तूच्या बाबतीत अनासक्त राहिला. पण ही वस्तुस्थिती माहीत नसल्याने त्याला इतर सर्वजण 'मंदबुद्धी' म्हणून चिडवू लागले. त्याची सावत्र आई त्याला छळू लागली. त्यामुळे त्रासुन संन्यासी बनायला तो घरून बाहेर पडला.
त्या अवस्थेत राजाच्या काही सेवकांनी त्याला पकडले आणि त्याला राजाची पालखी वाहण्याच्या कामी लावले. पालखी वाहताना पायाखाली कृमि-कीटक मरू नयेत म्हणून तो फार सावधगिरी बाळगीत असे. पण त्यामुळे पालखी डोलू लागे. यावर चिडून राजा भरताला लाथ मारू लागला. ते सहन करीत मोठ्या शान्तिपूर्वक भरत त्याला पुराण व इतिहासांतील बारकावे सांगू लागला. राजा चकित होऊन पालखीतून उतरला व त्याने भरताच्या पायावर लोळण घेतली. तो विचलित न होणारा मुनि म्हणून 'जडभरत' या नावाने ओळखला जाऊ लागला.