All Marathi Stories

गर्वाचं घर खाली

कमलावती गावात कैलासशास्त्री नावाचा एक ज्योतिषी राहात असे. भविष्य सांगून, शिवाय ग्रहपीडेतून लोकांना मुक्त करण्यासाठी तो लोकांकडून कसल्या ना कसल्या पूजा वगैरेही करवून घेत असे. जिथे कुठे महावृक्ष नसेल तिथे एरंडालाच महावृक्ष मानलं जातं. 'गावड्या गावात गाढवी सवाष्ण' या नात्याने गावात दुसरा कोणी ज्योतिषी नसल्याने कैलासशास्त्रींचं महत्त्व अकारणच वाढलं होतं. कैलासशास्त्रीकडे आपल्या अडचणी घेऊन कोणी आलं की तो म्हणे, "मी म्हणीन ते नक्की होणारच समजा! तेव्हा मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेवून सांगितल्याप्रमाणे तुला करावंच लागेल." एकदा अशीच कैलासशास्त्रीची चेष्टा केल्यामुळे दोन-तीन जणांवर त्याची खप्पामर्जी झाली; अन् पुढे त्यांच्या दुभाग्यांने त्यांच्यावर अशी काही संकटपरंपरा कोसळली की, त्यांना वाटू लागलं की हा सगळा कैलासशास्त्रीचा आपल्यावरील रागाचाच प्रताप असला पाहिजे. कैलासशास्त्री सांगू लागला, "एक कर्णपिशाच्च मला वश आहे. रोजच्या शिवपूजेमुळे मला वाक्सिद्धी मिळाली आहे. त्यामुळे माझ्या तोंडातून जे निघेल, ते खरंच होईल." लोकांत त्याचा दरावा यामुळे अधिकच वाढला. रामनाथ नावाचा एक माणूस कमलावतीत नवीनच आला होता. त्याने तिथे काही जमीन खरेदी केली आणि शेती करून तो आपल्या बायकोमुलांसह तिथे राहू लागला. एक विकाऊ घर होतं, ते त्याने खरेदी केलं. गृहप्रवेश करण्यापूर्वी त्याने कैलासशास्त्रीला त्या वास्तूत काही दोष असेल तर पाहण्याची विनंती केली. कैलासशास्त्री घराचं निरीक्षण करून म्हणाला, "हे घर खरेदी करण्यापूर्वीच तू मला विचारलं असतंस, तर बरं झालं असतं. या घरात तू राहिलास तर तूच मालक असल्यामुळे तुझं मरण ओढवेल. तेव्हा माझं ऐक; हे घर सोडून दे तू ताबडतोब!" पण जवळच रामनाथची सासू होती, ती मात्र रागाने कैलासशास्त्रीवर तुटून पडली, "काय म्हणालास? घरमालकाचं मरण ओढवेल? घरात प्रवेश करताना जमलं तर शुभ बोलावे; नाहीतर गप्प बसावे. असली अपशकुनी भाषा बोलल्याबद्दल तुझे हात-पाय तुटून जातील, कंबरच मोडेल बघ तुझी!" तेव्हा कैलासशास्त्रीही उखडला. आपली शेंडी धरून त्याने जोरात हलवली, अन् गळ्यातलं जानवं वरखाली झटकत तो ओरडला, "वाहवा! कैलासशास्त्रीसारख्या दिग्गज पंडितालाही शिक्षा देण्याचं धाडस हं! ठीक आहे, ऐकून घ्या—एकच पूजा करून, आणि एकच मंत्र म्हणून मी तुम्हा लोकांना यमयातना भोगायला न लावल्या, तर माझं नाव कैलासशास्त्री नव्हेच!" रागाने कापत तो तसाच घरातून बाहेर पडला. तरीही रामनाथची सासू गप्प न राहता बडबडतच राहिली, "अरे जा जा! तूच खाट पकडून यमयातना भोगताना पाहू आम्ही याची देही, याची डोळा!" आता मात्र या अपमानामुळे कैलासशास्त्री जोरात बोलू लागला, "मी यांच्या डाकिणी, पिशाच्चांच्या मदतीने सत्यानाशच करून टाकीन." अन् दातओठ खात तो त्या ओघात इकडे तिकडे न पाहताच जात राहिला अन् सामनेरून येणाऱ्या एका बैलगाडीशी त्याची टक्कर झाली! या टक्करीमुळे कैलासशास्त्री जबर जखमी झाला. त्याची कंबर मोडल्यातच जमा झाली अन् हातापायांवरही त्याचा ताबा राहिला नाही. लोकांनी उचलून त्याला घरात आणून खाटेवर झोपवलं. त्या दिवसापासून सहा महिने निरनिराळ्या वैद्यांकडून इलाज करून घेत कैलासशास्त्रीने खरोखरच अगदी यमयातना भोगल्या. या अवधीत रामनाथच्या सासूच्या शिव्यांच्या प्रभावाबद्दल निरनिराळ्या कथा पसरू लागल्या. लोकांना वाटू लागले की ती जर कोणाला काही शिव्या-शाप देईल, तर ते खरेच होऊन राईल. कैलासशास्त्रीसारखा प्रकांड ज्योतिषीसुद्धा तिच्या शिव्याशापांनी सहा महिने खाट पकडून बसला ना? कैलासशास्त्री जेव्हा चांगला खडखडीत बरा झाला, तेव्हा तो आपल्या बायकोला म्हणाला, "गावची भोळीभाबडी माणसं आता रामनाथच्या सासूच्या वचनात, शापात किंवा आशीर्वादात अडकतील..."