खरी संपत्ती
रामपूरमध्ये गंगाधर हा एक लहानसा व्यापारी होता. त्याची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेलेली होती. बायको व नवजात बाळाला पाहून गंगाधर संध्याकाळी घराकडे येत असताना दूरूनच त्याला आपल्या घरासमोर एक बग्गी उभी असलेली दिसली. रेशमी पडदे वगैरे लावून ती सुशोभित केलेली होती. त्याची आई अन्नपूर्णा स्वतः बग्गीपर्यंत येऊन तिने पाहुण्यांना निरोप दिला. हा प्रकार पाहून गंगाधरला भारी आश्चर्य वाटले. 'हे इतके श्रीमंत पाहुणे आपल्या घरी कसे?'
गंगाधर घरी पोहोचेपर्यंत बग्गी बरीच पुढे निघून गेली होती. आईने त्याला पाहताच विचारले, "सूनबाई ठीक आहे ना? मुलगा कसा आहे दिसायला?"
"दोघंही ठीक आहेत आई. पण आपल्या घरी कोणी बडी माणसं आली होती? बग्गीला रेशमी पडदे वगैरे लावलेले दिसले. कोण आलं होतं आपल्याकडे?"
मुलाच्या या प्रश्नाने अन्नपूर्णा एकदम दचकली. पण स्वतःला सावरून ती पटकन म्हणाली, "ते लोक? अरे कोणी दोन-चार माणसं नव्हती रे; एकच बाई आली होती बग्गीतून. माझी लहानपणची ती मैत्रीण खुशाली विचारायला आली होती."
"पण तू तर कधी आपल्या या श्रीमंत मैत्रिणीबद्दल बोललीही नव्हतीस माझ्याशी?" आश्चर्य प्रकट करत गंगाधर बोलला.
"एककाळी ते कुटुंबही मध्यमवर्गीयच होतं. भाग्य उजळलं अन् आता लखपती बनलीय ती. तुझे वडील गेल्यावर आपल्यालाही नाही का संकटांना तोंड द्यावं लागलं? भाग्यानं आपणही आता चांगले आहोत ना! कुणाचं नशीब कसं पालटेल सांगता येतं का कुणाला?" अन्नपूर्णाने समजावणी केली.
गंगाधरच्या वयाच्या आठव्या वर्षीच त्याचे वडील वारले. झोपडीच्या चारी बाजूंना जी मोकळी जागा होती, त्यात नारळाची बरीच झाडे होती. गंगाधर नारळ हातगाडीवर घालून गल्लोगल्ली फिरून विकत असे. त्याची आई तीन-चार घरी मोलकरणीचे काम करी. लहानपणापासूनच गंगाधरने आईला खूप मदत केली, अन् आता त्याने एक छानसे घरही बांधले होते.
मागील दाराच्या विहिरीवर पाय धुवून घरात येत गंगाधरने आईला विचारले, "काय बोलत होती मैत्रीण तुझी?"
"ती उगीच काही गप्पा मारायला नव्हती आली रे! तिच्या एकुलत्या एका मुलाचं लग्न ठरलंय. एका आठवड्यानंतरचाच मुहूर्त आहे. तिनं आग्रहानं चार दिवस अगोदरपासूनच बोलावलं आहे आपल्याला." अन्नपूर्णाने सांगितले.
जरा विचार करून गंगाधर म्हणाला, "तुझी जवळची मैत्रीण असेलही ती. पण तीन-चार दिवस अगोदर जाणं गैरसोयीचं आहे आपल्याला. आपण फक्त आदल्या दिवशीच जाऊ. ठीक आहे ना?"
अन्नपूर्णाला हा बेत तितकासा रुचला नाही. पण तिने 'हो' म्हणत डोके हलवले. लग्नाला जायच्या दिवशी तिने खरेदी केलेले कपडे गंगाधरला दाखवत म्हटले, "मी हा पोशाख नवऱ्यामुलासाठी घेतलाय. कसा आहे?"
गंगाधरच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. तो बोलला, "चांगला तर आहेच; पण तुला शहरात घेऊन जाऊन डॉक्टरकडून तपासण्यासाठी मी जे पैसे बाजूला ठेवले होते, त्यातून तू पाचशे रुपये खर्च केलेस. बास, यांचंच वाईट वाटलं मला जरासं." यावर काही बोलायचे मनात असूनही अन्नपूर्णा गप्प बसली.
संध्याकाळी मायलेक लग्नघरी पोहोचले. दुसऱ्या दिवशी लग्न होते. थाटामाटाचे, किमती कपडे घातलेल्या तिथल्या लोकांनी सामान्य पोशाखातल्या या दोघांकडे काहीसे दुर्लक्षच केले. दोन-तीन खोल्या ओलांडून पुढे गेल्यावर अन्नपूर्णाला आपली मैत्रीण इन्दुमती दिसली. "या, या!" म्हणत तिने अन्नपूर्णाचा हात पकडला. अन्नपूर्णाने विचारले, "पण नवरामुलगा कुठाय?"
"इतकी काय उतावळी होतेस? चल दाखवते." असे म्हणत इन्दुमती त्या दोघांना आपल्या महालवजा वाड्याच्या मागल्या भागात घेऊन गेली.
तिथे नवरामुलगा कमल आपल्या मित्रांसह बसलेला होता. मोठ्याने बोलणे-हसणे चालू होते सर्वांचे. आईला तिथे आलेली पाहून चिडचिडत तो म्हणाला, "आई, किती वेळा सांगितलंय मी तुला, की मी मित्रांबरोबर बसलेला असताना तू येत जाऊ नकोस म्हणून!"
ते ऐकून जरा खिन्न होत इन्दुमती म्हणाली, "माझ्या या मैत्रिणीला तुला पाहायचं होतं म्हणून घेऊन आले रे!"
"हं, असल्या येऱ्यागबाळ्या मैत्रिणी तुझ्या!" असे म्हणत कमलने अन्नपूर्णा व गंगाधरकडे तुच्छतेने पाहिले. पण त्याच्या या बोलण्याची काही पर्वा न करता अन्नपूर्णा त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, "लग्न करून शंभर वर्ष सुखी रहा बाळ!" अन् नवा पोशाख तिने त्याच्या हाती दिला.
त्या कपड्यांकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहून कमल म्हणाला, "अगदी वेळेवर कपडे आणलेस पहा मावशी! आमचा नोकर त्याला लग्नासाठी नवे कपडे न घेतल्याबद्दल तक्रार करत होता." अन् लगेच नोकराला बोलावून त्याने तो पोशाख त्याच्या हवाली केला.
अन्नपूर्णा आणि इन्दुमतीने एकमेकींकडे पाहून माना खाली घातल्या. अन् त्या तिथून बाहेर निघून आल्या. गंगाधरचा तर या अपमानाने अगदी तिळपापड झाला होता! वाड्यापासून दोन गल्ल्या दूर असणाऱ्या एका मोठ्या महालात लग्नसोहळा धुमधडाक्याने पार पडला. नवरीमुलगी दिसायला अगदीच कशीतरी होती. मित्र जेव्हा कमलजवळ तिच्या रूपाबद्दल बोलले, तेव्हा तिथेच असणाऱ्या गंगाधर व अन्नपूर्णा यांची दखल न घेता त्याने तारे तोडले, "काय करायचं! माझा जो व्यापार आहे ना, तेवढ्यावर मी खूश नाहीये. समुद्री व्यापारासाठी खूपच मोठी रक्कम हवीय मला. या लग्नामुळे मला पाच लाख हुंडा मिळतोय, म्हणून मी बायकोच्या रूपाचा विचारच नाही केला. आणखी दोघांनी दहा लाखांचीही गोष्ट केली होती. पण त्या तर अगदीच 'हिडिंबा' होत्या! म्हणून हे स्थळ पत्करलं; दुर्भाग्य माझं!"
हे प्रलाप ऐकून तर गंगाधर चाटच पडला! अन्नपूर्णाच्या डोळ्यांतही अश्रू उभे राहिले. मायलेक त्याच दिवशी भाड्याच्या गाडीने घरी निघून गेले. आईला फार दुःख झालंय, अन् ती मधून मधून पदराने डोळे पुसतेय हे पाहून गंगाधरलाही वाईट वाटले. तो म्हणाला, "आई, कमलने केलेल्या अपमानाने वाईट वाटतंय का तुला? पण आपण तरी काय करणार? मोठा गर्विष्ठ आहे तो. बास झालं, आता नको रडूस."
पण आता मात्र तिला रहावेना. ती म्हणाली, "तुला माहीतय, हा कमल कोण ते?"
"तूच तर म्हणालीस ना, की तो तुझी मैत्रीण इन्दुमती हिचा मुलगा म्हणून?" आश्चर्याने गंगाधरने विचारले.
"नाही. तो भाऊ आहे तुझा! आजपर्यंत मी ही गोष्ट गुप्त ठेवली होती तुझ्यापासून! आता मात्र सांगितल्याशिवाय राहावत नाही मला!" तिने दृढपणे म्हटले.
पतिनिधनानंतर अन्नपूर्णा आसपासच्या घरांतून मोलकरणीचे काम करू लागली. त्यावेळी गंगाधर जवळपास आठ वर्षांचा होता. तो नारळ विकायचे काम करू लागला. पण त्याच्यापेक्षा धाकटा कमल दोनच वर्षांचा होता. एके दिवशी दुपारी इन्दुमती आपल्या बग्गीतून घरी परतत होती. ऊन लागून ती बेशुद्ध झाली. ते पाहून गाडीवान घाबरला अन् अन्नपूर्णाच्या झोपडीसमोर त्याने बग्गी थांबवली. त्याचवेळी नारळ विकून गंगाधर घराकडे येत होता. त्याने भरकन नारळ फोडून त्यातले पाणी इन्दुमतीच्या चेहऱ्यावर शिंपडले अन् ती सावध झाल्यावर तिला नारळाचेच पाणी पाजले. संध्याकाळपर्यंत तिने झोपडीतच आराम केला. गंगाधर तर तिला देवासारखाच वाटू लागला.
निघण्यापूर्वी अन्नपूर्णाला जरा बाजूला घेऊन जाऊन इन्दुमती म्हणाली, "तुमच्या मुलानं आज माझा जीव वाचवलाय. मला कोणी मूलबाळ नाही, म्हणून एखादा मुलगा दत्तक घ्यायचाय मला. तुझी हरकत नसेल तर गंगाधरलाच दत्तक घेईन मी. नीट विचार कर अन् चार दिवसात कळव मला. आपले नाव आणि पत्ता एका कागदावर लिहून दिला तिने."
"गंगाधर तसा मोठा झालाय. मला मदत करतो. पैशांच्या दृष्टीनेही हातभार लावतो. त्याला दत्तक दिला तर माझ्या अडचणी आणखीनच वाढतील. पण धाकट्या कमलचं लालन-पालन मात्र माझ्याकडून ठीक होत नाहीये. मुलांना दूर करायचं मन होत नाहीये, पण याला दत्तक दिला, तर त्याचं तरी भविष्य बरं होईल!" अन्नपूर्णाने विचार केला आणि तिने हा निश्चय केला अन् इतरांना 'आपण कुंभमेळ्याला जात आहोत' असे सांगून कमलला इन्दुमतीच्या स्वाधीन केले.