Bookstruck

खरा कुरूप

जगन्नाथपुरीत जगन राहात होता. त्याला वीर व शूर असे दोन मुलगे होते. लहानपणीं उकळते पाणी तोंडावर सांडल्यामुळे वीरच्या चेहऱ्यावरची कातडी जळली होती. आता तोंडावर काळे डाग फक्त दिसत, त्यामुळे तो थोडा कुरूप दिसूं लागला होता. पण त्याचे मन अत्यंत निर्मळ व साफ होते. धाकट्या शूरचा स्वभाव मात्र वीरपेक्षां निराळा होता. त्याला आपल्या सुंदर रुपाचा फारच अभिमान होता. एके दिवशी जगनने शेतांमध्ये बकऱ्या नेल्या व एका जागी उभ्या केल्या. उन्हाळ्याचे दिवस होते. झाडांच्या लहान डहाळ्या तोडून, त्यांची पाने काढून, वीर बकऱ्यांना खाऊं घालत होता. शूरदेखील त्याला मदत करूं लागला. आपले दोन्ही मुलगे उन्हाच्यावेळीं आपल्या कामांत मदत करीत आहेत हे पाहून जगनला फार आनंद झाला. तो म्हणाला, "वीर, बांधावर ताडाची मुळे आहेत बघ; ती उपटून घेऊन ये. आपण ती भाजून खाऊं या." थोड्याच वेळांत वीरने ताडाची मुळे उपटली व ती तो घेऊन आला. तोपर्यंत शूरने वाळलेल्या ढलप्या एकत्र करुन ती मुळे त्याने भाजायला घेतली. बापलेक एकत्र बसून ती खाणार तोच गांवाचा पुरोहित धनंजयशास्त्री तिथे येऊन पोंचला. त्याचे स्वागत करीत जगनने प्रेमाने विचारले, "अगदी योग्य वेळेवर आलात. आणखी थोडी मुळे उपटून आणूं कां? घरी नेता येतील ना?" "हो तर! माझ्या मनांत हाच विचार होता. पण सांगायला संकोच वाटत होता. पण इतक्या कडक उन्हांत मी दुसऱ्याच कामासाठी आलो होतो." शास्त्रीने सांगितलं. "बोला, शास्त्रीजी, कोणतं काम काढलं आहेत?" जगनने आदराने विचारलं. "जगन, तुला तर माहीत आहेच कीं या गांवाच्या भरवशावरच माझा चरितार्थ चालतो. मला एक गाय दान मिळाली आहे. पण तिला खाऊं घालायला गवत तर हवेच कीं! तुझा पुरोहित या नात्याने मी तुझ्या गवताच्या भाऱ्यांतले गवत माझ्या गाईसाठी मागतो आहे." शास्त्रीने सांगितलं. "जे हवं असेल ते मागायचा आपला अधिकार आहेच. गाईची देखभाल करायला जर त्रास पडत असेल तर माझ्याकडे गाय धाडून द्या. माझ्या इतर गुरांप्रमाणेच मी तिची अगदी चांगली काळजी घेईन. गवताचा भारा माझ्या मुलांपैकी एकजण तुमच्या घरीं घेऊन येईल. चलावं, त्या झाडाच्या सांवलीत बसून जरा बोलूं या." असं म्हणत जगन त्यांना झाडाकडे घेऊन गेला. तितक्यांत ताडाची मुळे घेऊन शूरही तिथे आला व म्हणाला, "शास्त्रीबुवा, राग मानूं नका. पण तुम्हाला ठाऊक आहेच कीं मी एक देखणा तरुण आहे. माझं लग्न केव्हांही होईल, कुणीही आपली मुलगी मला अगदी आनंदाने देईल. वीर माझ्यापेक्षां मोठा आहे. मी असं आता म्हणूं नये कीं तो कुरूप आहे, पण माझा नाईलाज आहे! त्याच लग्न झाल्याशिवाय माझ्या लग्नाचा विचार कुणी करणार नाही. म्हणून तुम्हीच माझ्या भावासाठी एखादं स्थळ सुचवा! मुलगी कशीही असली तरी चालेल." शूरचे हे बोलणें ऐकून वीरला फार वाईट वाटले. जगनही मनांतून शूरवर रागावला होता. पण त्याने आपली नाराजी बोलून दाखवली नाही. ताडाची मुळे उचलत शास्त्रींनी मात्र त्याला फटकारले, "शूर, काय बोलतो आहेस तू हे? असं बोलणं अगदी चुकीचं आहे. दुसऱ्याचे मन दुखावणें हे पाप आहे. आणि कुरुपतेपेक्षांही जास्त मोठा दोष आहे." आणि वीरच्याकडे वळून बघत त्यांनी म्हटले, "वीर, सौंदर्यापेक्षांही माणसाचा सदगुण हा फार मोठा अलंकार आहे. तुझ्या चांगल्या स्वभावावर खूष होऊन तुझ्याशी लग्न करायला तयार होईल अशी गुणवती पत्नी तुला मिळेल ही मला खात्री आहे. तू गोविंदपूरला जा आणि तिथे राहाणाऱ्या गोपीला जाऊन भेट. तुझे भलेंच होईल." शास्त्रीजींच्या बोलण्यामुळे वीरच्या मनांत कुतूहल निर्माण झाले. कांही दिवसांनंतर तो गोविंदपूरला गेला. गोपीच्या घराचा पत्ता शोधायला त्याला फारसा त्रास झाला नाही. गोपी फुलांचा व्यापारी होता. त्याच्या शेतींत अनेक जातींची रंगीबेरंगी फुलांची झाडे त्याने लावली होती व त्या फुलांचा तो व्यापार करीत राहिला. त्या गांवात त्याने एक छानसे घर बांधले. आपली पत्नी गंगा आणि एक मुलगी ज्योती यांच्याबरोबर तो आरामशीर आयुष्य कंठीत होता. वीरला पाहून गोपीला वाटले कीं तो फुलें खरेदी करायला आला असावा. पण जेव्हां त्याला खरे कारण समजले तेव्हां त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले. आपली पत्नी व मुलगी यांच्याशी त्याची ओळख करुन दिली. थोडा वेळ सटरफटर गप्पा झाल्यानंतर गोपीने वीरला सांगितले, "बेटा, बऱ्याच वर्षांपूर्वी मी चोरी करताना पकडला गेलो आणि मला तुरुंगवास घडला. चोरीचा छाप कपाळावर बसला. तुरुंगातून सुटल्यावर मला मदत करायला कुणी तयार होत नव्हता. मी भुकेने कळवळून जायचो. म्हणून मी पुन्हां चोरी करायचे ठरवले. मी त्याच घरांत चोरी केली नि पुन्हां मी पकडला गेलो. तो घरमालक अतिशय भला माणूस होता, विचारी होता. त्याने मला म्हटलं, "कुणीही चोर म्हणून जन्माला येत नसतो. परिस्थितीच्या कचाट्यांत सांपडून तू चोरी केली असली पाहिजेस. तुला शिक्षा झाल्यामुळे कांही तुझ्यामध्ये परिवर्तन येणार नाही. तुला पुन्हां तुरुंगात डांबण्याची चूक मी करणार नाही." त्याने मला त्याच्या घरांतच नोकरी दिली. जेव्हां या घटनेला दोन वर्षे होऊन गेली, आणि माझ्यांत सुधारणा झाली आहे अशी त्यांची खात्री पटली तेव्हां त्यांनी आपल्या नोकराची मुलगी गंगा हिच्याशी माझं लग्न लावून दिलं. त्यानंतर आता माझी परिस्थिती चांगली सुधारलीय, तरीदेखील माझ्या ज्योतीशी लग्न करायला गांवात कुणी तयार नाही. त्यांचं म्हणणं असं कीं ज्योती ही एका चोराची मुलगी आहे. असं म्हणून वर हे लोक टिंगलटवाळी करीत म्हणतात कीं एखादा चोरच जांवई म्हणून पत्करायला हवा." यावर वीरने कांही बोलण्यापूर्वीच गंगा सांगायला लागली, "माणसांचे गुण पाहायला हवेत, नुसते सौंदर्य नव्हे. तुझ्याबद्दल शास्त्रीजींनी आम्हाला सगळं कांही सांगितलंय. आमच्या मुलीचं लग्न तुझ्याशी करावं अशी आमची इच्छा आहे. तुला हे मान्य आहे कां?" वीरने उत्तर दिले, "मला ठाऊक आहे कीं माझा चेहरा थोडासा कुरूप आहे. तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मी तुमच्या मुलीचे मन दुखावू इच्छित नाही. मी तिच्याशी लग्न करूं शकणार नाही. माझा धाकटा भाऊ आहे, तो तुमच्या मुलीसाठी योग्य आहे." आणि त्याने आपल्या पित्याला ही बातमी कळवली. हा निरोप मिळाल्यावर जगन, त्याची पत्नी व शूर, असे तिघेही गोविंदपूरला आले. ज्योतीला पाहिल्यानंतर शूरला ती आवडली. पण जेव्हां त्याला कळलं कीं तिचा बाप पूर्वी एक चोर होता, तेव्हां त्याने स्पष्टच सांगितलं कीं त्याला हे लग्न मान्य नाही. कोणत्याही परिस्थितींत एका चोराच्या मुलीशी लग्न करायची त्याला इच्छा नव्हती. त्याचे हे बोलणें ज्योती खालीमानेने ऐकत होती. पण जेव्हां अगदी असह्य झाले तेव्हां तिने शूरला एकदम ताडकन उत्तर दिले, "काय बोलता आहात तुम्ही? कावळ्याचे पिल्लू आणि कोकिळेचं पिल्लू दिसायला सारखीच असतात, फारसा फरक नसतो. पण कोकिळा आपल्या मंजुळ स्वराने सर्वांचे मन प्रसन्न करते. आताच तुमच्याकडे बघून मला कळलं, कीं माणसांच्यात देखील कावळे असतात. तुमचा गोंडस चेहरा पाहून कोणतीही मुलगी तुमच्याशी लग्न करायला तयार होईल असं मात्र समजू नका. तुमचे विचार गलिच्छ आहेत, तुमचे बोलणें कडवट आहे. जर तुमचे मोठे भाऊ तयार असतील तर मला त्यांच्याशीच लग्न करायची इच्छा आहे." ज्योतीचे बोलणें सर्वांनाच पटले. जगनने शूरला चांगलेच सटकावले, "अरे, मुलगी पसंत नसली तरी जरा आपले तोंड सांभाळून बोल. उचलली जीभ, लावली टाळ्याला, अशी बडबड करूं नकोस. ज्याला स्वतःवर आवर घालता येत नाही, तोच खरा कुरूप असतो. समजलं कां?" आणि वीरकडे वळून त्याने विचारलं, "वीर, ज्योतीला तू पसंत आहेस. तुला ही सोयरीक पसंत आहे ना?" वीरने होकारार्थी मान डोलावली. तेव्हां ज्योतीच्या व वीरच्या मातापित्यांनी दोघांना आशिर्वाद दिले. वीर व ज्योतीचा विवाह झाला आणि दोघेही आनंदाने संसारात रमले.