Bookstruck

खडका कोथिंबिरीची गोष्ट

एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. पहिल्या बायकोला दोन मुले होती—एक मुलगा आणि एक मुलगी. दुसऱ्या बायकोला मूलबाळ काही नव्हते. बऱ्याच वर्षांनी राजाची पहिली बायको मेली. तेव्हा तिची दोन्ही मुले अगदी पोरकी झाली. सावत्र आई त्यांचे अतिशय हाल करू लागली. त्यांना पुरेसे खायला द्यायची नाही, प्यायला द्यायची नाही. त्यांच्याकडून अनेक कष्टाची कामे करून घेतली जात. अशा रीतीने त्रासात दिवस काढता काढता ती मुले खंगत चालली. त्यांच्या अंगात बिलकूल त्राण उरले नाही. त्यांची सावत्र आई तर त्यांचा जास्तीत जास्त द्वेष करू लागली. अशा तऱ्हेने दिवस चालले असता एके दिवशी त्या दुष्ट राणीच्या मनात आले की, या दोन्ही पोरांना मारून टाकावे. तेव्हा तिने बाजारातून 'जलाल विष' आणले व त्याचे दोन लाडू तयार केले आणि ते त्या बहीण-भावंडांना खावयास दिले. इकडे लाडू मिळाल्यामुळे त्या दोन मुलांना फार आनंद झाला. मुलाने आपला लाडू खाल्ला, पण फार दिवस पोटात काही नसल्यामुळे त्याची भूक काही भागली नाही. तेव्हा तो बहिणीला म्हणाला, "ताई, ताई, तुझा लाडू मला दे गं, मला अतोनात भूक लागली आहे." भावाचे ते शब्द ऐकून बहिणीला अतिशय वाईट वाटले व तिने स्वतःची मुळीच फिकीर न करता आपला लाडू त्यालाच खावयास दिला. तो दुसरा लाडू खाल्ल्याबरोबर मुलाच्या अंगात विष चांगलेच भिनले. एकाएकी त्याच्या पोटात गडबडून आले व त्याने तात्काळ प्राण सोडला. इकडे राणी मनात मांडे खात होती की, विषाचे लाडू खाऊन दोन्ही मुले मरून जातील. पण तिला जेव्हा मुलगा मेल्याचे वृत्त समजले, तेव्हा तिचा आनंद मावळला. मुलगी मेली नाही म्हणून तिला फार दुःख झाले. "आता मुलीची व्याद कशी नाहीशी करावी?" अशी तिला काळजी पडली आणि तिने पुन्हा मुलीचे हाल करण्यास प्रारंभ केला. जेवायला घालायचे नाही आणि मरेमरेतो काम सांगायचे, असे तिने पूर्ववत सुरू केले. इकडे भाऊ मेला, त्याला बहिणीचा हा छळ पाहून फार दुःख झाले. तो बहिणीच्या स्वप्नात येऊन् तिला म्हणतो, "ताई, काय गं तुझे हाल होताहेत हे? मी आता खडकावरची कोथिंबीर होतो, ती खाऊन तू राहा." बहीण म्हणाली, "बरं." तेव्हापासून ती खडकावर रुजलेली कोथिंबीर खाऊन राहू लागली. पुन्हा ती पूर्वीसारखी सुंदर दिसू लागली. राणी मनात म्हणते, "मी हिला खायला देत नाही, प्यायला देत नाही, हाल करते, तरी ही पूर्वीप्रमाणेच सुंदर दिसते आहे. तेव्हा ही चोरून काहीतरी खात असावी." म्हणून तिने गुप्तपणे तिच्यावर नजर ठेवली. तेव्हा तिला कळले की, ती खडकावरची कोथिंबीर खाऊन राहते. मग त्या दुष्ट राणीने राजाचे मन वळवून ती सर्व कोथिंबीर उपटून टाकविली व पुन्हा मुलीचे हाल करू लागली. ते पाहून पुन्हा त्या मुलीचा मेलेला भाऊ तिच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, "ताई, आता मी राजाच्या तळ्यात सोन्याचा मासा होतो. मोठे मोठे लोक मला तांदूळ घालतील, ते मी तुला देईन." तो राजाच्या तळ्यात मासा होऊन राहिला. सोन्याचा मासा पाहून सर्व लोकांना मोठे नवल वाटले. लोक हौसेने त्याला तांदूळ घालू लागले. ते जमवून तो आपल्या बहिणीला देई. अशा तऱ्हेने तांदूळ मिळू लागल्यामुळे बहीण पुन्हा आनंदाने राहू लागली. मुलगी पूर्ववत टवटवीत दिसू लागलेली पाहून राणीला शंका आली. तिने बारकाईने चौकशी केली तेव्हा तिला समजले की, ती सोन्याच्या माशाने दिलेले तांदूळ खाऊन राहते. म्हणून तिने दुष्टपणाने राजाकडून ते तळेच आटवून टाकले व सावत्र मुलीचे हाल पुन्हा सुरू केले. इकडे तो मुलगा बहिणीची कीव येऊन् पुन्हा तिच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, "ताई, आता मी आंब्यावरचा कीर (पोपट) होतो. मी आंबे खाईन आणि तुला टाकीन." बहीण म्हणाली, "बरं." तेव्हापासून पुन्हा तिचे दिवस आनंदात जाऊ लागले. राणीसाहेबांना जेव्हा कळले की, राजकन्या पोपटाने टाकलेले आंबे खाऊन राहते, तेव्हा तिने राजाकडून ते झाडच तोडविले. बिचाऱ्या मुलीच्या दैन्यावस्थेस पारावार राहिला नाही. तेव्हा चौथ्यांदा तिचा भाऊ तिच्या स्वप्नात आला आणि म्हणाला, "ताई, आता मी देवाच्या दारी मोर होतो. देवापुढे लोक तांदूळ ठेवतील ते खाऊन आपण राहू." बहीण हर्षित होऊन म्हणाला, "बरं भाऊ." त्या दिवसापासून तो मुलगा देवाच्या दारी मोर झाला व ती बहीण देवापुढचे तांदूळ खाऊन राहू लागली. ते पाहून राणीचा द्वेषाग्नी भडकला आणि तिने त्या मोरालाच मारून टाकले व मुलीची छळणूक पुन्हा सुरू केली. इकडे असे चालले असता राजाची दुसरी बायको गरोदर राहिली. राजाला फार आनंद झाला व तो तिचे सर्व लाड पुरवू लागला. आपल्या बहिणीचे हाल कळसाला गेलेले पाहून पुन्हा भाऊ तिच्या स्वप्नात आला व म्हणाला, "ताई, सावत्र आईने तुला फार छळले आहे आणि हा छळ कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाही. आता मला एक युक्ती सुचते आहे ती मी करतो. मी या सावत्र आईच्याच पोटी जन्म घेतो. बारशाच्या दिवशी मी एकाएकी रडून रडून आकांत करीन. तेव्हा तू मला कडेवर घे आणि ही ओवी म्हण, म्हणजे मी गप्प राहीन." बहिणीने ते मान्य केले. पुढे नऊ महिने लोटल्यावर राणीला एक अत्यंत सुंदर पुत्र झाला. राजाला अतिशय आनंद झाला. मुलाच्या बारशाच्या दिवशी मुलाने असा आकांत मांडला की सगळ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले. काही केल्या तो गप्प राहीना. तेव्हा बहीण म्हणाला, "मी घेऊन बघते." तिने त्याला मांडीवर घेतले आणि ही ओवी म्हटली: खडका कोथिंबिरी जळामध्ये मासा आंब्यावरी कीर देवांदारी मोर राजाघरी थोर भाई माझा अशी ओवी म्हटल्याबरोबर तो मुलगा एकदम रडायचा थांबला. ते पाहून राजाला फार आश्चर्य वाटले. त्याला त्या ओवीचा अर्थ कळेना, म्हणून त्याने मुलीला विचारले की, "या गाण्याचा अर्थ काय?" तेव्हा मुलीने राजाला पहिल्यापासून झालेली सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून राजाला इतका क्रोध आला की त्याने ताबडतोब राणीचे नाक कापून, त्यात तिखट-मीठ भरले व गाढवावरून धिंड काढून तिला राज्याबाहेर घालवून दिले. इटकुली मिटकुली गोष्ट संपली, तुमचे आमचे पोट भरले.