Bookstruck

कुंभची निद्रा

शाम आणि रुक्मिणी हे पती-पत्नी एका गावात राहत होते. खूप वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की मुलाने डोळे उघडले नाहीत की तो जरा सुद्धा रडला नाही. घाबरून आजीने त्याला थोडं ढोसले तेव्हा त्याने जराशी हालचाल केली. पण तो दूध व पाणी प्यायला मात्र तोंड उघडत असे. असे सात दिवस गेले. आठव्या दिवशी एक साधू त्यांच्या घरी आले. शामने आपल्या मुलाबद्दल सर्व हकीगत सांगून त्यांना विनंती केली की, असा काही उपाय सांगा ज्याने माझा मुलगा बरा होऊन इतर मुलांसारखा हसू-खेळू लागेल. साधूंनी त्यांना बाळाचे जन्म नक्षत्र विचारून हातावर बोटं मोजून हिशोब करून आश्चर्याने म्हटले, "हे बघ शाम, तुम्हाला एवढी काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या मुलात कुंभकर्णाचा थोडा अंश आहे. तुला माहिती आहे ना, त्रेतायुगात कुंभकर्ण अर्धवट झोपेतून उठून युद्धात भाग घेतला होता आणि त्या युद्धातच तो मारला गेला होता. त्याची झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याने पुन्हा जन्म घेतला. कुंभकर्ण वर्षात सहा महिने जागत असे व सहा महिने झोपत असे. म्हणून तुझा मुलगा वर्षातले बरेचसे दिवस झोपेल. तो जर रडला तर त्याला झोपेतून जाग येईल म्हणून तो रडत नाहीये." साधूंचे बोलणे ऐकून शाम व रुक्मिणी निर्धारित झाले व मोठ्या प्रेमाने त्यांनी मुलाचे नाव 'कुंभ' असे ठेवले. व ते त्याचा सांभाळ करू लागले. तो पहाटे उठून सर्व विधी आटपून दूध पिऊन झोपत असे. दुपारी उठून जेवण परत झोपत असे. तो फक्त खाण्यासाठी उठत असे व उरलेला सर्व वेळ झोपत असे. तो काही काम न केल्याने लठ्ठ झाला. पाचव्या वर्षी कुंभ शाळेत जाऊ लागला. त्याच्या लठ्ठपणामुळे तो पायी शाळेत जाऊ शकत नसल्याने त्याच्या वडिलांनी शाळेत जायला एक बैलगाडी ठेवली. शाळेत जाताना सुद्धा तो गाडीत झोपत असे. शाळेतल्या मुलांच्यात त्याच्या जाडीमुळे तो एखाद्या राक्षसासारखा दिसत असे. सुटीत मुलं त्याच्या अंगावर खेळत असत. कोणी त्याचे कान उपटी, पण त्याला काही जाग येत नसे. आता कुंभ सोळा वर्षांचा झाला. आता तो आणखी जाड झाला होता. या वयात देखील त्याला जरा सुद्धा लिहिता-वाचायला येत नव्हते. कुंभ कोणावरही रागवत नसे. कारण असं केलं तर आपली झोप मोडेल अशी त्याला भीती वाटे, म्हणून तो मुलांना अजूनच आवडू लागला. शाम व रुक्मिणीला आता कुंभची काळजी वाटू लागली. की याला आपण चार चौघांसारखा कसा बनवणार? इतक्यात त्याच्या जन्मवेळी आलेले साधू परत त्यांच्याकडे आले. कुंभच्या आई-वडिलांच्या आग्रहावरून साधूने एक पूर्ण दिवस अगदी बारकाईने कुंभचे निरीक्षण केले. व ते म्हणाले "कुंभ खूप झोपतो हे खरे, पण तो अत्यंत बुद्धिमान आहे. झोपेसाठी कितीही अवघड काम तो चटकन करू शकतो. म्हणून त्याच्यात कुठलीही विद्या शिकण्याची क्षमता आहे. मागल्या जन्मीची निद्रा आता पुरी झाली असल्याने मी एक महिना इथे राहून त्याला विद्या देईन." साधूंचा उपाय यशस्वी झाला. झोपण्यासाठी तो कितीही अवघड धडा क्षणात आत्मसात करून लगेच झोपत असे. बाकीची मुले वर्षभरात जेवढं शिकतात तेवढं तो महिन्यात शिकत असे. साधूंनी कुंभचे कौतुक करत म्हटले, "तू खूपच हुशार आहेस आणि पटापट अभ्यास करतोस. तू आता गुरुकुलात जा. आणि मोठमोठ्या शास्त्रांचा अभ्यास कर. त्याचा फायदा इतरांना होईल." "साधू महाराज, मी अधिक वेळ जागा राहू शकत नाही. आपण श्रेष्ठ आहात. आपल्या अंगात दैवीशक्ती आहे. आपण माझ्या स्वप्नात येऊन मला कां शिकवत नाही?" कुंभने साधूंना विनंती केली. "ठीक आहे, मी तसं करीन, पण माझी एक अट आहे. तुला तुझं जेवण देखील स्वप्नातंच जेवावं लागेल." साधू म्हणाले. कुंभने साधूची अट मान्य केली. आता साधू त्याला त्याच्या स्वप्नातच शिकवू लागले. कुंभ स्वप्नातच खाऊं लागला, पण त्यामुळे त्याचे पोट भरत नसे आणि मग तो चांगल्या तऱ्हेने अभ्यास नीट शिकू शकत नव्हता. चार दिवसांतच कुंभच्या लक्षात आले की स्वप्नात जेवणे शक्य नाही. अशक्तपणामुळे त्याला नीट झोप देखील येत नसे. वेळ घालवण्यासाठी तो गावात इकडे तिकडे फिरू लागला. तेव्हा त्याला गाव आवडू लागले. त्याला भूक सहन होत नसे म्हणून तो गावातल्या खानावळीत खाऊं पिऊं लागला. ते जेवण त्याला फार चवदार आहे असे वाटून आवडू लागले. माझ्या आजूबाजूला एवढे मोठे जग आहे, हे न जाणताच मी नुसता झोपलो आहे. हे जग स्वप्नातल्या जगापेक्षा केवढे वेगळे आहे. जे डोळे उघडून दिसते तेच सत्य आहे. ही गोष्ट त्याला पटली. त्याने ती साधूमहाराजांना पण सांगितली. "ज्याने मनुष्याचा जन्म घेतला आहे, त्याने स्वप्नरंजनात वेळ कमी घालवून सत्य काय आहे याचा शोध घेण्यात जास्त वेळ घालवावा. झोपेत जी स्वप्ने आपण पाहतो ती जाग आल्यावरच खरी होऊ शकतात. म्हणून मनुष्याला जास्तीत जास्त वेळ जागं राहिलं पाहिजे. परंतु काही काम न करता जागं राहणं हे झोपल्यासारखंच आहे. म्हणून मनुष्याला कष्ट करून स्वतःचं व जगाचं भलं साधलं पाहिजे." साधूंनी अशातऱ्हेने कुंभला हितोपदेश केला. आता कुंभच्या विचारांत अमुलाग्र बदल झाला. त्याने एकानंतर एक असा सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. आणि तो एक ज्ञानी व्यक्ती झाला. आता तो खूपच कमी झोपत असे. पण ही थोडी झोप देखील त्याला पहिल्यापेक्षा जास्त आनंद देऊ लागली.