Bookstruck

किन्नर राणी

गोष्ट खूप जुनी आहे. त्या काळात काश्मीरमध्ये एक गरीब फासेपारधी राहत असे. तो रोज सकाळी जंगलात जाऊन सुंदर-सुंदर पक्षी पकडून पिंजऱ्यात बंद करी आणि संध्याकाळी ते शहरात आणून विकी. अशा प्रकारे तो आपला मुलगा सुधाम याचे पालनपोषण करीत असे. काही दिवसांनी तो फासेपारधी मरून गेला, अन् बिचारा सुधाम पोरका झाला! लहानपणीच आपले पोट भरण्यासाठी त्याला आपल्या पित्याचा व्यवसाय पत्करून फासेपारधी बनावे लागले. पित्याच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी जंगलात जाऊन सुधामने आपले जाळे एका झाडाच्या फांदीला लटकावले आणि तो वाट पाहू लागला. थोड्याच वेळात जाळ्यात पक्षी अडकला. सुधाम लगेच झाडावर चढून पाहू लागला, तर त्याला दिसले, की एक कावळा अडकला आहे! ‘हा कावळा कोण खरेदी करणार, याचं काय बरं करावं?’—असा विचार सुधाम करत होता, इतक्यात तो कावळा मानवी आवाजात बोलू लागला— "महाराज, मला सोडून द्या ना! मीही बदल्यात तुमच्यावर उपकारच करीन! उद्या तुमच्या पिंजऱ्यात एक खूपच सुंदर पक्षी अडकेल अशी व्यवस्था करीन मी! तो तुम्ही आपल्या राजाकडे घेऊन गेलात, तर तुम्हाला अपार धन मिळेल!" कावळ्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून सुधामने त्याला सोडून दिले आणि खरोखरच कावळ्याच्या बोलण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जाळ्यात एक अत्यंत सुंदर असा पक्षी अडकला. तो घेऊन सुधाम राजाकडे गेला. असा दुर्मिळ पक्षी मिळाल्यामुळे राजाने खूश होऊन सुधामला खूपसे सोने दिले. पण एवढे सोने मिळूनही सुधामची कष्ट-दशा संपली नाही. कारण, काश्मीरच्या राजाजवळ जो विदूषक होता, त्याला सुधामला इतके सोने मिळालेले पाहून असूया वाटली. तो राजाला म्हणाला— "महाराज, याच्यासाठी तर आपल्याला एक हस्तिदंती घरच बनवायला हवं!" "अरे, पण इतकं हस्तिदंत कुठून मिळवायचं?" राजाने विचारले. "का? या सुधामला हस्तिदंतही मिळवणं काय अवघड असेल का?" विदूषकाने राजाला फूस लावली. आता राजाने सुधामला बोलावून म्हटले— "तू जो दुर्मिळ पक्षी आणला आहेस, त्याच्यासाठी आम्हाला एक हस्तिदंताचं घर बनवायचं आहे. तेव्हा हस्तिदंत आणायचं काम तुझं. मी तुला चाळीस दिवसांची मुदत देत आहे, त्यापूर्वी ते मिळालं नाही, तर तुझी घडगत नाही." राजाचे हे कठोर वचन ऐकून दुःखी झालेला सुधाम घरी परतला. इतक्यात तो कावळा तिथे आला आणि सुधामला म्हणाला— "तुम्ही इतके उदास का मालक?" सुधामने त्याला आपल्यावर आलेले संकट सांगितले. यावर कावळा म्हणाला— "इतक्याशा गोष्टीसाठी हैराण झालात आपण? राजाकडे चाळीस पिंपं दारूची मागणी करा आपण. इथून शंभर योजनांच्या अंतरावर एक सरोवर आहे. तिथे पाणी पिण्यासाठी रोज हत्तींच्या झुंडीच्या झुंडी येत असतात. त्या पाण्यात ती सारी दारू ओतून द्या, की झालेच आपले काम!" सुधामने ताबडतोब राजाकडे जाऊन म्हटले— "महाराज, आपण माझ्याबरोबर चाळीस पिंपं दारू लादून गाड्या माझ्याबरोबर दिल्यात, तर आपल्याला आवश्यक तेवढं हस्तिदंत मी आणून देऊ शकेन." राजाने लगेच तशी व्यवस्था करून दिली. कावळ्याच्या सांगण्याप्रमाणे सुधामने शंभर योजनांवरील त्या सरोवराच्या पाण्यात ती दारू ओतून दिली. रात्री सरोवरावर हत्तींचा एक मोठासा कळप आला. पाण्यात मिसळलेली दारू पोटात गेल्याने ते सारे हत्ती बेहोश होऊन खाली पडले. गाडीवानांच्या मदतीने त्यांचे दात कापून घेऊन सुधामने ते गाड्यांवर लादले आणि तो राजाकडे गेला. इतके सारे हस्तिदंत पाहून राजा फारच खूश झाला. सुधामला त्याने चांगले बक्षीस दिले. लवकरच सुंदरसे दंतगृह तयार झाले. आता विदूषकाच्या मनातली असूयेची आग आणखीनच भडकली. तो राजाकडे जाऊन म्हणाला— "महाराज, आपला पक्षी फारसा मनापासून गात नाही!" "ओहो! मग त्यासाठी आता काय करायला हवं आपण?" राजाने विचारले. "हं! त्यासाठी या पक्षाच्या मालकाला शोधून आणायला पाहिजे. मालकाला पाहून हा आनंदाने गाऊ लागेल!" "पण मालकाचा पत्ता कसा लागेल?" "का बरं? सुधामला यात काय अवघड आहे?" विदूषकाने पुन्हा संधी साधत विचारले. मग काय! राजाने पुन्हा सुधामला वेठीला धरले. तो सुधामला म्हणाला— "हे बघ, या पक्षाच्या मालकाला शोधून काढून चाळीस दिवसांच्या आत माझ्यासमोर हजर कर; नाहीतर तुझं मस्तक धडावेगळं झालंय असं समज!" राजाची ही आज्ञा ऐकून सुधाम दुःखी झाला. उदास मुद्रा घेऊन तो घरी परतला. पुन्हा तो पहिला कावळा सुधामपुढे हजर होऊन म्हणाला— "अरेच्चा! पुन्हा आपण उदास? आता काय झालं नवीन?" सुधामने आपली नवी कामगिरी त्याला सांगितली. ते ऐकून कावळा म्हणाला— "इतकंच ना? राजाला सांगून एका नौकेची व्यवस्था करून घ्या. नौकेवर राजेशाही सर्व सुख-सुविधा आणि वैभव असलं पाहिजे अशी अट घाला. त्या नौकेत बसून आपल्या नदीतून आपण पूर्वेकडे शंभर योजने गेलात की किन्नरांची एक वस्ती लागेल. तिथे तुमची नौका पाहायला लोकांची खूप गर्दी होईल. पण फक्त किन्नर-राणी सोडून आपण कोणालाही नौकेवर येऊन देऊ नका. किन्नर राणीने नौकेवर येऊन त्यावरील सुंदर वस्तू पाहायला सुरुवात करताच नौका पुढे हाकायची आज्ञा आपल्या नावाड्यांना द्या; अन् तिच्यासह राजाकडे या. ती किन्नर राणीच त्या पक्षाची मालकीण आहे." कावळ्याच्या सांगण्याचे सुधामने तंतोतंत पालन केले. राजाला सांगून त्याने अजब वस्तू आणि अद्भुत तसबिरी वगैरेंनी सुसज्जित अशी एक नौका बनवून घेतली आणि तिच्यात बसून नदीतून तो पूर्वेकडे निघाला. काही दिवसांच्या सफरीनंतर तो किन्नर-देशाच्या किनारी पोचला. तिथे किन्नर लोकांनी नौका बघण्यासाठी मोठी गर्दी केली. पण किन्नर राणी सोडून सुधामने कोणालाही आपल्या नौकेवर चढू दिले नाही. तो म्हणाला— "प्रथम मी तुमच्या राणीला नौका दाखवणार आहे. त्यानंतरच तुम्ही बाकी सर्वजण नौका पाहू शकाल." हे ऐकून किन्नर राणी मोठी खूश झाली आणि नौकेवर चढली. नौकेवर निरनिराळ्या खोल्यांतून सर्व अद्भुत वस्तू सजवून मांडून ठेवलेल्या होत्या, मऊ गलिचे सर्वत्र अंथरलेले होते, सुंदरसे दिवे आपला रंगीत प्रकाश पसरवत होते. ते सर्व पाहता पाहता किन्नर राणीला वेळेचे भानच राहिले नाही. पण इकडे तिने पहिल्या खोलीत प्रवेश करताच शिडे उभारून सुधामने नौका केव्हाच पुढे हाकारली होती, आणि त्याने आपला परतीचा प्रवास सुरू केला होता! किन्नर राणीने नौकेवरचे प्रदर्शन पाहून पूर्ण केले तेव्हा तिचा चार योजनांचा प्रवास पूर्ण झाला होता. किन्नर राणीला बरोबर घेऊन सुधामने राजमहालात प्रवेश करताच दंतगृहातला तो पक्षी आनंदाने गाऊ लागला.