All Marathi Stories

कार्यकुशल

दृढनिश्चयी विक्रम पुन्हा त्या झाडाकडे गेला. झाडावरून प्रेत उतरवून ते आपल्या खांद्यावर लावून नेहमीप्रमाणे मौन धारण करून तो स्मशानाकडे निघाला. तेव्हा प्रेतात वास करणारा वेताळ राजाला म्हणाला, "हे राजा, कोणाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी तू या मध्यरात्रीच्या वेळी अशा भयाण जंगलात हे कष्ट उपसत आहेस, याबद्दल मला काहीच कल्पना नाही. महान स्वामीभक्त आणि असामान्य धैर्य असणारे विवेकी लोक सोडून दुसऱ्या कोणाच्या आवाक्यातले हे काम नव्हे, हे मात्र मी बरोबर ओळखतो. पण कधीकधी अशा कुशल व कार्यक्षम लोकांनाही अपमानित होऊन आपले उच्च स्थान घालवावे लागते. अशा तऱ्हेने अपमानित व पदच्युत झालेल्या एका गुप्तचर प्रमुखाची गोष्ट मी तुला सांगतो, ती नीट सावध चित्ताने ऐकून घे. तुझा थोडासा श्रमपरिहारही होईल." असे बोलून वेताळ गोष्ट सांगू लागला: गिरिपुरचा राजा धूमकेतू हा अत्यंत क्रूर होता. त्याची राज्यलालसा अदम्य होती. त्याच्या राज्याजवळच धनदौलतीने शिगोशीग भरलेले कांभोज नावाचे राज्य होते. ते हस्तगत करायची धूमकेतूची बरीच जुनी इच्छा होती, पण ते जिंकणे सोपे नव्हे हे ही तो जाणून होता. अशातच एक दिवस कांभोज राजकुमारी मदालसा आपल्या सख्यांसह वनविहाराला गेली असल्याची बातमी त्याला कळली. धूमकेतूने लगेच आपले सैनिक पाठवून तिला पकडले आणि एका गुप्त स्थानी कैद करून ठेवले. राजा धूमकेतूने यानंतर एक दूत पाठवून कांभोज राजाला निरोप दिला की, "तुमची कन्या मदालसा सध्या माझ्या ताब्यात आहे. तेव्हा आपण महसूल म्हणून दहा लाख मोहोरा ताबडतोब पाठवून द्याव्यात. महसूल पाठवलात की आपल्या कन्येला सकुशल परत पाठवण्यात येईल." कांभोजच्या वृद्ध मंत्र्याने हे वृत्त आपल्या राजाला कळवून, त्या दूताला म्हटले, "आम्ही एक महिन्याच्या आतच महसूल पाठवायची तजवीज करू," आणि त्याने दूताला इतमामाने परत पाठवले. यावर कांभोज राजा रागावून आपल्या मंत्र्याला म्हणाला, "आम्ही धन पाठवले तरी तो दुष्ट माझ्या मदालसेला सुखरूप परत पाठवीलच याचा काय भरोसा?" वृद्ध मंत्री उतरला, "सरकार, मी तसा निरोप यासाठी दिला की आपल्याला अजून थोडा वेळ मिळेल विचार करायला. एखादा स्वामीभक्त आणि समर्थ असा गुप्तहेर पाठवून आपण राजकुमारीला कुठे ठेवले आहे, याचा पत्ता काढून घेऊ." राजा आणि मंत्र्याने एकमताने ठरवले की, या कामाला आपल्या गुप्तहेर विभागाचा नायक केशववर्मा हाच अत्यंत योग्य होईल. केशववर्मा दुसऱ्या दिवशी सकाळीच रवाना झाला. एक रात्र आणि एक दिवस चालून तो गिरिपुरच्या सरहद्दीवरील नदीकिनारी पोहोचला. कोळ्याच्या वेषात नदी पार करून केशववर्मा राजधानीत पोहोचला. एक आठवडाभर अनेक प्रकारे प्रयत्न केल्यावर त्याला पत्ता लागला की, नदीकिनारी जंगलात एका जुन्या किल्ल्यात राजकुमारीला कैद करून ठेवलेले आहे. रात्रीच्या वेळी केशववर्मा त्या जंगलात पोहोचला आणि आसपास शोध घेऊ लागला. इतक्यात अचानक त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार झाला. त्याने लगेच मागे वळून पाहिले, तो हातात मशाल घेतलेला एक शिपाई त्याला दिसला. तो पुन्हा दुसरा प्रहार करणार, तोच केशववर्माने त्या शिपायाच्या छातीत आपली तलवार भोसकली. खाली पडता पडता शिपाई जोरात ओरडला आणि त्यामुळे आणखी काही शिपाई तिथे धावत येऊ लागले. ते पाहून केशववर्माने शिपायाच्या हातातील मशाल घेऊन आसपासच्या वाळलेल्या पालापाचोळ्याला आग लावली. पाहता-पाहता आगीच्या ज्वाळा पसरू लागल्या आणि त्यामुळे तिथे धावपळ सुरू झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन केशववर्मा तिथून निसटला आणि तीन-चार दिवसांत कांभोजनगरला पोहोचला. डोक्याला पट्टी बांधून आलेल्या केशववर्माला पाहून राजा आणि मंत्री आश्चर्यचकित झाले. त्याची कहाणी ऐकून त्यांना वाईट वाटले. दुसऱ्याच दिवशी कृतसेन नावाचा एक तरुण शिपाई राजाकडे आला व म्हणाला, "मी राजकुमारीला सोडवून आणू शकेन." राजाचा त्याच्यावर जराही विश्वास बसला नाही, तरीही तो म्हणाला, "ठीक आहे! तू केशववर्माला भेटून त्या जुन्या किल्ल्याबद्दल माहिती मिळवून ठेव." "क्षमा असावी महाराज, पण केशववर्माला भेटून फारसा काही उपयोग होईल असे नाही वाटत मला," कृतसेन म्हणाला. राजा व मंत्री हे ऐकून आश्चर्याने पाहू लागले. "इतकी गडबड झाल्यानंतरही धूमकेतूने राजकुमारीला तिथेच ठेवले नसणार, खरं ना?" कृतसेनने स्पष्टीकरण दिले. आता मात्र राजा व मंत्री समजून चुकले की हा कृतसेन चांगलाच बुद्धिमान आहे. राजा त्याला म्हणाला, "ठीक आहे, तू आता तुला हवा तसा प्रयत्न कर." चार दिवसांनी कृतसेन परत आला, पण राजकुमारी त्याच्याबरोबर नव्हती. राजाने रागाने त्याला म्हटले, "मला वाटते की तू केवळ बुद्धिहीनच नव्हे, तर भित्राही असला पाहिजेस." यावर कृतसेन नम्रपणे म्हणाला, "क्षमा असावी महाराज, हे काम पूर्ण करायला मी एकटाच पुरेसा नाही. आपल्या दोन्ही राज्यांच्या सरहद्दीवरील नदी जिथे समुद्राला मिळते, तिथे एका बेटावर धूमकेतूने राजकुमारीला कैद करून ठेवले आहे आणि खूपसे सैन्यही तिच्या पहाऱ्याला बसवले आहे. ही गोष्ट आपल्याला न कळवता सरळ तिथे जाणे बरोबर वाटले नाही. कारण तिथे माझाच मृत्यू ओढवला असता तर राजकुमारीच्या ठावठिकाण्याचे रहस्यही माझ्याबरोबरच पुरले गेले असते." राजा आणि मंत्र्याने सेनापतीला बोलावून घेतले. सेनापती म्हणाला, "सहज शक्य आहे महाराज! आपले शंभर बहादूर सैनिक कोळ्यांच्या वेषात जाऊन त्या बेटाला वेढा घालतील." मंत्र्याची कल्पना शंभर टक्के बरोबर ठरली. कांभोज सैन्याने राजकुमारीला सोडवले आणि गिरिपुरचा किल्ला जिंकून राजा धूमकेतूला युद्धकैदी म्हणून कांभोजच्या कारागृहात टाकले. विजयाचा उत्सव साजरा केला जात असताना राजाने सुचवले की केशववर्माचा सत्कार करावा. परंतु मंत्र्याने म्हटले, "नाही महाराज, सत्कार करायचा तर कृतसेनचा करायला हवा." राजाने वृद्ध मंत्र्याचा सल्ला मानला आणि कृतसेनचा सत्कार करून त्याला केशववर्माच्या जागी गुप्तहेर विभागाचा प्रमुख म्हणून नेमले. गोष्ट इथवर संपवून वेताळाने विक्रमला विचारले, "राजा, कांभोज राजाने मंत्र्याच्या सांगण्यावरून केशववर्माला पदावरून हटवले, हे बरोबर झाले का? ज्या कृतसेनला एकदा 'भित्रा' म्हटले होते, त्यालाच प्रमुख नेमणे अयोग्य नाही का? या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस, तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील!" राजा विक्रम म्हणाला, "केशववर्मा समर्थ असेलही, पण त्याचा रागीट स्वभाव त्याला मारक ठरला. आपल्या प्राणावर बेतले तेव्हा त्याने अविचाराने सारं जंगलच जाळून टाकले. त्यावेळी तो हेही विसरून गेला की राजकुमारी तिथेच आहे आणि आगीमुळे तिच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो. त्याच्या उतावळेपणामुळे समस्या अधिक गुंतागुंतीची झाली. पण ही गोष्ट ओळखून कृतसेनने राजकुमारीचा खरा पत्ता मिळवला. म्हणूनच कार्यकुशल असणाऱ्या कृतसेनचा सत्कार करणे योग्यच होते." अशा रीतीने राजाचे मौन भंग झाल्यामुळे वेताळ त्या प्रेतासह पुन्हा एकदा अदृश्य होऊन पूर्वीच्या जुन्या झाडाच्या फांदीला लटकू लागला.