All Marathi Stories
कविची राजशिष्टाई
कांचनबर्मा कांचनपूरचा राजा होता. तो कोणत्याही परिस्थितीत प्रजेला त्रास होऊ देत नसे. प्रजेचा तो फार आवडता होता. राजाने विचारपूर्वक वेगवेगळ्या सुधारणा केल्या. थोडक्यांत जनता सुखी होती. तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती. धनधान्याची सुबत्ता होती.
एके दिवशी राजदरबारांत एक व्यापारी आला. तो सुगंधी द्रव्यांचा व्यापारी होता. त्याचे नाव निरंजन सावकार होते. देशविदेशांत कांहीही चढउतार न होता त्याच्या व्यापार भरभराटीला आला होता. तो राजाला म्हणाला "बहुतेक अत्तरें मी विदेशांतून आणली आहेत. जावा द्वीपावरून एक नवीन अत्तर आणले आहे. सर्वात प्रथम ते आपल्याला अर्पण करणे हे माझे कर्तव्य आहे." मग त्याने कांचनबर्मा महाराजांना अत्तराची शिशी अर्पण केली. राजाला ते अत्तर फार आवडले. त्याने नोकराला आज्ञा केली की सर्वांना ते अत्तर लाव. नोकराने राजाच्या आज्ञेप्रमाणे सर्वांना अत्तर लावले. संपूर्ण दरबारभर अत्तराचा घमघमाट सुटला. तेव्हा राजकवी उठून म्हणाले "निरंजन सावकारांनी आणलेले हे अत्तर, अत्तर नसून जावा द्वीपांत पसरलेल्या महाराजांच्या किर्तीचा सुगंध आहे."
राजाच्या प्रशंसापर केलेल्या बोलण्याला सर्वांनी टाळ्या वाजवल्या. खूष झालेला निरंजन म्हणाला "कविवर्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या किर्तीचा सुगंध हाच माझ्या व्यापाराचा आधार-स्तंभ आहे. कविवर्यांचे म्हणणे शंभरटक्के सत्य आहे."
दरबारांत घडलेल्या घटनेचे वर्णन अंत:पुरापर्यंत पोहोचले. महाराणीपासून दासींपर्यंत सर्वांनी अत्तराची खूप स्तुती केली. कांचनबर्मा अत्तर ह्या नावाने हे अत्तर कांचनपुरात मोठ्या प्रमाणावर विकले जाऊं लागले.
एक दिवस सावकाराने राजकवींना आपल्या घरी बोलावले व म्हणाला, "मला स्वतःला माहीत नाही की हे अत्तर किती प्रभावी आहे. पण तुमच्या प्रशंसेमुळे ह्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. कांचनबर्मा अत्तर ह्या नांवाने हे खूप प्रसिद्ध झाले आहे. ह्याचा चांगला खप पण होतो आहे. त्यामुळे मी खूप पैसा कमविला. ह्या फायद्यांत तुम्हाला पण हिस्सा मिळाला पाहिजे."
असे म्हणून त्याने कविराजांना रेशमी वस्त्रे व दक्षिणा दिली. मग तो म्हणाला, "माझे व माझ्या व्यापाराचे कौतुक करणारे काव्य रचा, प्रत्येक माणसाच्या तोंडी माझे नांव येऊ दे. ज्याच्या त्याच्या तोंडी माझी व माझ्या व्यापाराची प्रशंसा येऊ दे. जर असे घडले तर तुम्ही मागाल ते बक्षिस मी तुम्हाला देईन."
त्याचे बोलणे ऐकून कवी चंद्रचूडांनी रागावून रेशमी वस्त्रे व दक्षिणा घेण्यास नकार दिला. ते म्हणाले "आंब्याची नवी पालवी खात कोकीळा फक्त वसंत ऋतूतच कूजन करते. आकाशात विजा चमकतात तेव्हांच मोर नाचतो. त्याचप्रमाणे काव्य करण्यालायक व्यक्ती किंवा घटना असली तरच कवीला काव्य करण्यास स्फूर्ती येते. तुझ्यासारख्या लोभी व स्वार्थी माणसाची प्रशंसा करणारे काव्य मी कधीही करणार नाही. अशा काव्यास कविता म्हणणेदेखील योग्य होणार नाही. तुझ्या व्यापारवृद्धीसाठी केलेले काव्य कविता ह्या सदरात येतच नाही. जर कुठे चूक होत असेल, प्रजेचे अहित होत असेल, तर प्रत्यक्ष राजाची निंदा करायला देखील मी मागेपुढे पाहणार नाही. आपल्या काव्याने मी लोकांना जागृत करीन, प्रोत्साहित करीन. तेव्हा आपल्या व्यापारवृद्धीसाठी मला वापरायचा व्यर्थ प्रयत्न करूं नकोस."
राजकवींच्या बोलण्याने व्यापारी अगदी सुन्न झाला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. ही गोष्ट महाराजांच्या कानावर गेली. त्यांनी राजकवींना बोलावून म्हटले "समजा, माझ्या हातून कांही चूक झाली तर माझीसुद्धा निंदा करण्यास तुम्ही तयार आहात? ह्या क्षणी मी तुम्हाला तुरुंगात टाकतो. मग तुम्ही काय कराल?"
चंद्रचूड उत्तर देणार येवढ्यात मंत्री मध्ये पडून म्हणाले, "महाराज शूरज दुष्ट होता. दुर्योधन अहंकारी होता. त्या दोघांचे दुर्गुण कवीने स्पष्ट शब्दांत मांडले म्हणून राम देवस्वरूप मानले गेले. महाभारताकारानी धर्मराजांच्या गुणांची स्तुती केली म्हणून लोकांना त्यांचे मोठेपण समजले. त्याचप्रमाणे कीचकासारख्याचा बीलंपटपणा उघडा पाडून त्याला शिक्षा दिली गेली. ह्याबद्दल देखील कवींनी लिहीले आहे. ते फक्त चांगल्या नाही तर वाईट गोष्टीबद्दलसुद्धा लिहीण्याची सचोटी दाखवतात. चंद्रचूडांच्या बोलण्यामागे कुठलाही वाईट हेतू नाही. ते कर्तव्यभावनेच्या पोटी असे बोलले."
राजकवींनीही मंत्र्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला तेव्हां कुठे राजा जरा शांत झाला.
ह्या गोष्टींनंतर राज्यांत लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. निरंजन सावकाराचे नुकसान व्हायला लागले तेव्हा तो दुसऱ्या देशात जाण्याची तयारी करूं लागला. ह्याचवेळी शेजारच्या कल्याणदेशाचा राजा शक्तिसिंह कांचनपूरवर स्वारी करण्याच्या बेतांत होता. ह्यावर दुसरा कोणताच उपाय नसल्याने कांचनबर्माने शत्रुपक्षाशी तह करायचे ठरविले. मंत्र्यांच्या सांगण्यावरून राजाने चंद्रचूड कवींना राजदूत म्हणून कल्याण देशांत पाठविले. कल्याण देशाचे राजे शक्तिसिंह यांनी चंद्रचूड कवींचा आदर सत्कार करून म्हटले "शास्त्रांनुसार राजदूतास शिक्षा करणे योग्य नाही. तुमच्या देशाला आमच्या देशांत सामील करून घ्यायचे आम्ही पक्के ठरविले आहे. तुम्ही कवी आहात, पण राजदूत म्हणून आमच्याकडे आला आहात. तुम्ही आम्हाला कितीही दूषणे दिली तरी तुमचा देश आम्ही आमच्या देशास जोडणारच. तुम्हाला काय म्हणायचे आहे, हे मी जाणूं इच्छितो."
चंद्रचूड हंसून म्हणाला, "मी अजून आमच्या महाराजांचा निरोप देखील आपल्याला सांगितला नाही. तेवढ्यांतच आपण आपला मनसुबा जाहीर केलात. आमचा देश अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. रक्तपात न करता आपल्या स्वाधीन होण्याची आमची इच्छा आहे. आपले म्हणणे मी लक्षपूर्वक ऐकले आहे. आता कांचनपूरचा नागरीक म्हणून माझे म्हणणे पण ऐकून घ्या. घराचे दरवाजे उघडे असतांना कुत्रें आंत घुसले तर आम्ही भले काय करणार? ठीक आहे की आमची मान झुकलेली आहे. आम्ही कडवे देशभक्त आहोत, येवढ्या प्रमाणांत आमच्या महाराजांनी आमची देशभक्ती प्रज्वलित ठेवली आहे की एक दिवस आपल्याला आमच्या देशांतून हाकलून देण्याची शक्ती आमच्यांत आहे." त्यांचे बोलणे ऐकून शक्तिसिंह रागाने वेडा झाला. पण चंद्रचूड राजदूत म्हणून आलेले असल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
परत आल्यावर चंद्रचूडांनी राजाला सर्व हकीकत सांगितली. शक्तिसिंहाच्या धमक्यांनी रागावून कांचनबर्माने युद्ध करण्याचे ठरविले. "विजय तरी मिळेल किंवा वीरगती प्राप्त होईल." तो म्हणाला.
कवि चंद्रचूडाने शक्तिसिंहासमोर ज्या देशभक्तीच्या गोष्टी केल्या, त्यांनी जनतेवर जादू केली. त्यांच्या हृदयांत देशभक्ती उफाळून आली. जनतेने प्रतिज्ञा केली की जय अथवा पराजय, कुठल्याही परिस्थितीत ते राजाची साथ सोडणार नाहीत. युद्धात शत्रूचा जीव घेऊं किंवा देशासाठी आपला जीव देऊ. निरंजन सावकाराने देखील परदेशातून दैनंदिन आवश्यकतेच्या गोष्टी मागविल्या व जनतेला स्वस्थ दरांत विकल्या.
कांचनपूरच्या जनतेची प्रतिज्ञा ऐकून व देशभक्ती बघून कल्याणदेशाची प्रजा आपापसात कुजबुजायला लागली. "अशा परिस्थितीत आपल्या राजाने त्यांच्यावर स्वारी केली तर आपला विजय निश्चित आहे. ह्या परिस्थितीत त्यांच्यावर स्वारी न करण्यांतच शहाणपणा आहे." शक्तिसिंहाला पण गुप्तचरांकडून जनतेचे हे म्हणणे कळले. त्याच्या लक्षांत आले की आपली चूक होत आहे, ती सुधारली पाहिजे. त्याने कांचनबर्माला एका राजदूताकरवी संदेश पाठविला "मी आपल्या देशावर आक्रमण न करता, मैत्री करूं इच्छितो. आपली जनता दुष्काळग्रस्त आहे. तिच्यासाठी खाद्यपदार्थ पाठवीत आहे. जे झाले ते कृपया विसरून जावे."
आपल्या वचनाप्रमाणे शक्तिसिंहेने कांचनपूरच्या जनतेस मदत केली. त्याने मैत्रीचा करार पाळला. चंद्रचूडच्या राजशिष्टाईचे खूप कौतुक झाले.
राजकवि चंद्रचूडाने आपल्या राज्याच्या गुण-वर्णन पर एक काव्य रचिले. ज्यांत त्याने निरंजन सावकाराच्या उदारतेची आवर्जून प्रशंसा केली.