Bookstruck

कमेरची सूचना

लक्ष्मणदास सिंहपुरीत राहत होता. त्याला तीन मुलगे व तीन मुली होत्या. सर्वांची लग्ने झाली होती आणि सगळेजण त्याच गावात राहत होते. लक्ष्मणदासची एक तीव्र इच्छा होती की त्याची एखादी तस्वीर असावी, पण त्यांच्या गावात अशी चित्रे काढणारा कोणीही चित्रकार नव्हता. लक्ष्मणदासचे आपल्या नातवावर, शंकरवर फार प्रेम होते. शंकरने चित्रकलेचा अभ्यास करावा असं लक्ष्मणदास त्याला लहानपणापासूनच सांगत होता. पण आपल्याला चित्रकलेत मुळीच रस नाही, असे शंकरने आजोबांना स्पष्टच सांगून टाकले. कोणत्याही परिस्थितीत तो चित्रकार होणार नव्हता. आता शंकर अठरा वर्षांचा झाला, तरीदेखील त्याला चित्रकलेची गोडी लागली नाही. जेव्हा लक्ष्मणदास खूप आजारी पडला, तेव्हा त्याने नातवाला सांगितले, "आता मी काही फार दिवस राहणार नाही. मरण्यापूर्वी माझं एखादं चित्र असावं असं मला नेहमी वाटत होतं. पण ते माझं स्वप्न, आता केवळ एक स्वप्नच राहील." आजोबांचा आवाज अगदी केविलवाणा झाला होता. शंकरने धीर एकवटून म्हटले, "तुमची इच्छा पूर्ण करायला मी आत्ताच शहरात जातो आणि तिथून एखाद्या चित्रकाराला घेऊन येतो." नातवाचे हे आश्वासक शब्द ऐकून लक्ष्मणदास बेहद खूश झाला. त्याने नातवाला म्हटलं, "तुझा हा निर्णय बरोबर आहे, पण हे कळल्यानंतर लोक हसतील. या वयात ही इच्छा धरलेली ऐकून मला टोमणे मारतील. आपल्या कुटुंबात सुमारे तीसजण आहेत. तू त्या चित्रकाराला सांग की आपल्या साऱ्या परिवाराचे चित्र त्याने काढले पाहिजे, म्हणजे त्यात माझे चित्र येईलच!" शंकर शहरात गेला. त्याने चित्रकाराला शंभर रुपये द्यायचे असे मनाशी ठरवले होते. पण चित्रकाराने सांगितले की या कामासाठी दहा हजार रुपये अगोदर दिले, तरच तो हे काम करू शकला असता. त्याचे म्हणणे होते की इतक्या जणांचे एकत्र चित्र काढायचे म्हणजे त्यावर बरीच मेहनत करावी लागली असती. प्रत्येकाचा चेहरा स्पष्टपणे दाखवायचा म्हणजे काही सोपे काम नव्हते. त्याची ही मागणी ऐकून शंकर गार पडला. आता त्याला कळले की त्याचे आजोबा त्याने चित्रकार व्हावे म्हणून इतका आग्रह का धरीत होते! एवढी मोठी रक्कम देणे त्याला काही शक्य नव्हते. नाइलाजाने तो सिंहपुरीला जायला निघाला. सुदैवाने त्यावेळी त्याची भेट कमेरशी झाली. कमेरजवळ एक यंत्र होते. त्या यंत्रात पांढरे कापड ठेवायचे आणि मंत्रोच्चारण करीत जे दृश्य यंत्रासमोर दिसत असे, त्याची प्रतिमा त्या कापडावर चित्रासारखी उमटत असे. चित्रकारांनी काढलेल्या चित्रापेक्षा हे यंत्रातले चित्र जास्त स्पष्ट व सहजसुंदर दिसत असे. "मला तुझ्या इच्छेबद्दल माहिती आहे. तुमच्या परिवाराचे चित्रांकन करण्यासाठी या यंत्राचा उपयोग करता येईल. त्यासाठी जास्त नाही, फक्त पन्नास रुपये तू मला दे!" कमेरने सांगितले. शंकरला आनंद झाला. पण शंका वाटून त्याने विचारले, "हे यंत्र तुला कुठे मिळालं?" कमेरने न चाचरता स्पष्ट उत्तर दिलं, "माझे मामा या मंत्रतंत्रात प्रवीण आहेत. वर्षांपूर्वी त्यांनी हे यंत्र तयार केलं आणि मला दिलं. माझ्या साऱ्या नातेवाइकांना बरोबर घेऊन मीही सर्वांचे एकत्र असे एक चित्र काढले contemplation. हे बघ!" असे म्हणून कमेरने एक कापडाचा तुकडा बाहेर काढला. त्यावरच्या चित्रात प्रत्येकाचा चेहरामोहरा व छबी अगदी स्पष्ट व रेखीव दिसत होती. पण त्यांच्यापैकी एक माणूस असा होता की त्याचे चित्र पाहून हसायलाच येत होते. "हा असा विकृत दिसणारा माणूस कोण आहे?" शंकरने आश्चर्याने विचारले. कमेरने हसत म्हटले, "याचं नाव आहे सुरूपी! मी जी चित्रे या यंत्रावर बनवतो, त्यात कोणी ना कोणी एकजण आपल्याला असा अवश्य दिसेल." क्षणभर विचार करून शंकर पुढे म्हणाला, "माझ्या आजोबांची इच्छा आहे की त्यांच्या संबंध परिवाराचं एक चित्र बनवावं. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कुठलाही त्याग करायला तयार आहे. फक्त मला चिंता वाटते ती एकाच गोष्टीची! की माझ्याऐवजी जर माझे आजोबा चित्रात कुरूप दिसले तर त्यांना वाईट वाटेल." "अगोदर तूच कबूल कर की मग तुझंच चित्र विकृत दिसेल." कमेर म्हणाला. दोघेही सिंहपुरीला पोहोचले. शंकरने आपल्या परिवारातल्या सर्व मंडळींना त्या यंत्राचा महिमा सांगितला. त्या यंत्रातून आपले चित्र काढण्यासाठी सारेजण उतावीळ झाले होते. बागेत सर्वजण एकत्र जमले. साऱ्यांनी चांगली वस्त्रे परिधान केली होती आणि भरपूर दागदागिने अंगावर घालून साऱ्याजणी नटल्या होत्या. आपले यंत्र घेऊन कमेर सर्वांच्या समोर उभा राहिला. त्या यंत्रात त्याने एक पांढरे शुभ्र कापड घातले आणि डोळे मिटून मंत्रोच्चारण केले. नंतर डोळे उघडून ते वस्त्र त्याने शंकरला दिले. त्यातली आपली छबी पाहून शंकर उदास झाला. त्याचे चित्र पाहून रागावलेला माणूसदेखील हसत सुटला असता. जवळ असलेले इतर लोक चित्र पाहायला उत्सुक होतेच. ते गडबड करू लागले. शंकरने ते चित्र त्यांना दिले आणि तो स्वतः दूर जाऊन उभा राहिला. कमेरने शंकरची पाठ प्रेमाने थोपटली व म्हटले, "तुझ्या आजोबांचं चित्र पाहायची तुला तीव्र इच्छा होती ना? आवडली की नाही त्यांची छबी?" "मी त्यांचं चित्र पाहिलंच नाही. माझी छबी खराब दिसली, तेव्हा माझं मन देखील दुःखी झालं. आता हे सगळेजण माझी टिंगल करतील!" शंकर म्हणाला. त्यावर मोठ्याने हसून कमेरने त्याला सांगितले, "तू तुझ्या आजोबांसाठी एवढा मोठा त्याग केलास खरा; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तू त्यांची तस्वीर पाहिलीच नाहीस; तू फक्त स्वतःचीच तस्वीर बघितलीस, आता तिकडे बघ!" शंकरने आपल्या कुटुंबातल्या इतर लोकांकडे निरखून पाहिलं. प्रत्येकजण स्वतःचंच चित्र पाहण्यात रमला होता व खूश होत होता. इतरांच्या चित्राकडे पाहण्यात कुणालाच रस नव्हता. तेव्हा कमेर शंकरला म्हणाला, "पाहिलंस ना, आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्तीच्या चित्राकडे कुणाचं लक्ष नसतं. प्रत्येकजण फक्त आपलेच चित्र पाहण्यात गुंग होतो. मनुष्यस्वभाव असाच असतो. म्हणून तुझे चित्र बिघडलेले दिसले, तरी तुझी टिंगल करतील असं मुळीच मनात आणू नकोस." कमेरचे हे शब्द ऐकून शंकरची खिन्नता नाहीशी झाली. आता त्याचा चेहरा शांत झाला व मनोमन तो आनंदून गेला. त्याने कमेरला ठरल्यापेक्षा जास्त पैसे दिले आणि त्याला प्रसन्न मनाने निरोप दिला.