उतावीळपणाचे काम
बसरा शहरात अब्दुल रजाक नावाचा एक व्यापारी रहात असे. त्याला दोन जुळी मुले होती. एकदा तो व्यापारा निमित्त जहाजात प्रवास करीत निघाला आणि एका बेटावर येऊन पोहचला. त्याला पुष्कळ दिवस प्रवास करावा लागला होता. त्या गावी किंमती वाढल्या असल्या कारणाने त्याने जो माल विकला त्यात त्याला पुष्कळ फायदा झाला. त्या बेटाच्या सुलतानाने स्वतःच त्याच्या गलबताजवळ येऊन खूप मूल्यवान वस्तू विकत घेतल्या.
रजाकने त्या पूर्वी आपल्या गलबतांतून अनेक देशात प्रवास केला होता. सुलतानाने रजाकला आपल्या महालात मेजवानी दिली आणि तो ज्या ज्या देशांचा प्रवास करून आला होता, त्या त्या देशांतील मुख्य मुख्य गोष्टी विचारून घेतल्या. रजाकसारख्या प्रवासी व्यापाऱ्याकडून निरनिराळ्या देशांची माहिती करून घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात होती. म्हणून सुलतानाने त्याला आपल्या दरबारात काही दिवस रहायला सांगितले.
अशा तऱ्हेने अनेक वर्षे लोटली. रजाकची बायको काळजी करू लागली की नवरा इतकी वर्षे परत का आला नाही? ती आपल्या दोघां मुलांना बरोबर घेऊन त्या बेटावर जायला निघाली. काही दिवसांनी ते एका बंदरात येऊन पोहचले. त्या बंदरात रजाक ज्या देशात गेला होता, त्या देशातून एक जहाज त्या दिवशी रात्री येणार असल्याचे रजाकच्या बायकोला कळले. तिने आपल्या दोघां मुलांना पाठवून त्या जहाजावरून आपल्या वडिलां विषयी काही माहिती मिळते का, विचारून यायला सांगितले.
दोघं जुळी भावंडे त्या जहाजावर गेली. ते जहाज आणखी कोणाचे नव्हते, त्यांच्याच वडिलांचे होते. रजाक सुलतानाचा निरोप घेऊन आपल्या गलवतात स्वदेशी परत येत होता. जुळी मुले जहाजात गेली तेव्हा रजाक त्याची पैशाची पिशवी दिसली नाही, म्हणून आपल्या खलाशांजवळ चौकशी करीत होता. ज्या चोराने पिशवी चोरली होती त्याने गलवतात नुकत्याच आलेल्या जुळ्या मुलांना दाखवून त्या दोघांनी पिशवी चोरली असल्याचे सांगितले.
रजाक त्या मुलांना ओळखू शकला नाही व अत्यंत रागाने त्या दोघां मुलांना समुद्रात फेकून द्या असा त्याने खलाशांना हुकूम सोडला. त्यांनी लगेच त्या दोघां मुलांना धरून समुद्रात फेकून दिले. रजाकची बायको मुले परत आली नाही म्हणून रात्रभर काळजी करीत राहिली आणि उजाडल्या बरोबर गलवताजवळ गेली. तिला पाहून रजाकला फार आनंद झाला. परंतु तिने जेव्हा आपल्या दोघां जुळ्या मुलांचा उल्लेख केला तेव्हा रजाक आपले दुःख आवरू शकला नाही. रात्री त्याने ज्या मुलांना समुद्रात फेकविले ती आपलीच मुले असल्याचे रजाकला कळले.
मुलं कशीतरी किनाऱ्यावर येतील ही आशा धरून दोघां आई वडिलांना रहावे लागले. दोघांनी कित्येक दिवस समुद्र किनाऱ्यावर ढुंढकत राहिल्यावर मुलं मिळाली नाहीत म्हणून स्वदेशी प्रयाण केले. आणखी काही काळ लोटला. दोघांनी कोणाला तरी दत्तक म्हणून घ्यायचे ठरविले. एके दिवशी रजाक गुलामांच्या बाजारातून एका तरुण मुलाला विकत घेऊन घरी आला. त्याची बायको त्या गुलामाला पाहताच नवऱ्याला म्हणाली- “तुम्ही ओळखलं नाहीत का? हा आणखी दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या जुळ्या मुलांपैकी धाकटा!” तिने त्या तरुणाला ओढून घट्ट पोटाशी धरले.
रजाकला ते ऐकून व त्या मुलाला पाहून जो आनंद झाला तो एवढा तेवढा नव्हता. त्याने त्या धाकट्याला त्याच्या थोरल्या भावा विषयी विचारले. त्याला त्याच्या मोठ्या भावाचे काय झाले माहीत नव्हते. समुद्रात पडल्यानंतर बुचकळ्या खात असतां त्याला एका पडाव वाल्याने पाहून त्याचे रक्षण केले व गुलामांच्या एका व्यापाऱ्याला विकले. सहा महिने लोटायच्या आत पितापुत्र दोघे काही व्यापाराच्या वस्तू घेऊन आपल्या गलवतात बसून निघाले आणि एका बेटांत येऊन पोहचले. धाकटा भाऊ काही अमूल्य वस्तू घेऊन त्या बेटावर राज्य करणाऱ्या सुलतानाला देण्यासाठी त्याच्या महालाकडे निघाला.
सुलतान त्या बहुमूल्य वस्तू पाहून फार खूप झाला. त्याने धाकट्याला काही दिवस त्याचा अतिथी म्हणून रहायला विनंती केली. अशा तऱ्हेने त्या दोघांमध्ये परस्पर स्नेह वाढला. त्याचा सुलतानाच्या परिवारातील काही जणांना राग आला. त्यांनी छोट्याला जाळ्यात पकडण्यासाठी कट करायला सुरवात केली. एके दिवशी संध्याकाळी सुलतान एकाएकी आजारी पडला. सुलतानाचे काही अधिकारी त्याचा द्वेष करीत असल्यामुळे सुलतानाला ते त्याच्या आजारात काही अपाय करणे अशक्य नाही, असे धाकट्याला वाटले. अशा लोकांच्या हातून सुलतानाला वाचविणे आपले कर्तव्य आहे, असा त्याने निश्चय केला. असा विचार करून धाकटा सुलतानाच्या झोपायच्या खोली बाहेर उजाडेपर्यंत तलवार उपसून उभा राहिला. उजाडल्यावर सुलतानाला थोडे बरे वाटले.
रात्री अधिकाऱ्यांनी धाकट्याला सुलतानाच्या झोपायच्या खोली बाहेर तलवार उपसून फिरत असल्याचे पाहिले होते. म्हणून ते सुलतानाचे कान भरू लागले- “रात्री व्यापाऱ्याच्या मुलाला झोपायच्या खोलीकडे जातांना आम्ही पाहिले त्याच्या हातात तलवार होती. आम्हांला पाहून तो गप्प राहिला. नाहीतर त्याने तुमचा खूनच केला असता. त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा करावी.”
सुलतान काही वेळ विचार केल्यावर म्हणाला- “असली घाई आणि उतावीळपणा करून कोणत्या दुष्टांच्या रागाला मी कारण होईल सांगणे कठीण. तरी त्याला तुरुंगात टाका. पुढे काय करायचे ते सर्व चौकशी करून ठरवीन.”
ही बातमी कळल्यावर रजाक सुलतानाकडे येऊन म्हणाला- “सुलतान, माझा मुलगा अपराधी आहे की नाही, या विषयी प्रथम चौकशी करावी. घाईगर्दी करू नये. काही काही वेळां त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मी अशीच एकदां घाईगर्दी केली व परिणामी मला आयुष्यभर दुःखच अनुभवावे लागले.”
सुलतान ते ऐकून चकित झाला व त्याने विचारले- “कोणते ते काम?” रजाकाने घडलेली सर्व घटना सांगितली. “मी आपल्या पोटच्या जुळ्या पोरांना समुद्रात फेकून दिले होते. हे तुम्हांला खरे वाटेल का?” असे सांगून रजाकाने घडलेली सर्व घटना सांगितली.
सुलतान आनंदाने ओरडला- “म्हणजे अब्बा जान, मी कैदेत टाकला आहे तो माझा धाकटा भाऊ की?” असे म्हणत सुलतानाने रजाकला मिठी मारली. आपला थोरला मुलगा जिवंत असल्याचे व्यापाऱ्याला कळले. त्याला परमानंद झाला. सुलतानाने लगेच आपल्या धाकट्या भावाला सोडवून बोलाविले. झालं असे की एका कोळ्याने थोरल्याला वाचविले. थोरला या बेटावर आला. बेटावरच्या सुलतानाला मुलगा नव्हता. त्याने थोरल्याला दत्तक घेऊन मृत्यू समयी त्यालाच सुलतान केले.
अशा तऱ्हेने ही गोष्ट सुखांत ठरली. आई मुलांची भेट झाली आणि पुढील आयुष्य सुखाचे झाले. त्याने सविस्तर ती गोष्ट सांगितली.