अप्सरेचा वंश
मनुष्य सुरुवातीला फार कुरूप होता असे सांगतात. पण पुढे मनुष्य जातीत देखील सुंदर लोक जन्माला आले. त्याला कारण एक अप्सरा आहे. ती गोष्ट अशी:
देवलोकात सुभ्रम नावाची एक अप्सरा राहत असे. एखाद्या देवाशी लग्न करून घेऊन तिला सुखी होता आले असते. पण तिला भूलोकी वास करण्याची इच्छा उत्पन्न झाली. तिला तिच्या मैत्रिणींनी समजावून सांगितले की, "मर्त्यलोकात स्वर्गलाभ व्हावा म्हणून लोक दानधर्म करतात आणि तुला हे काय सुचले आहे?" पण तिला ते पटले नाही. इंद्राने तिला बोलावून पुष्कळ समजावून सांगितले. तो म्हणाला— "हे पहा, भूलोकी तुझी जाण्याची इच्छा आहे, जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव. तू तेथल्या एकाही वस्तूला हात लावलास तर तू दगड होऊन जाशील. एवढे लक्षात ठेव."
इंद्राने एवढे सांगितल्यावर तिने विचार केला की इंद्राने मला सावध केले आहे, भूलोकी जाण्यास नकार दिलेला नाही. सहजासहजी इंद्राची परवानगी मिळेल असे तिला स्वप्नात देखील वाटले नव्हते. म्हणून तिला आनंद झाला व ती आपल्या मैत्रिणींचा व इंद्राचा निरोप घेऊन भूलोकी प्रस्थान करण्यास तयार झाली.
ती आपल्या एका मैत्रिणीला बरोबर घेऊन आली. आकाशात विचरण करीत जमिनीकडे चकित होऊन ती पाहत राहिली. ती अगदी जमिनीजवळ आकाशातच बराच वेळ घिरट्या घालीत असताना तिला एक मनुष्य एका चाफ्याच्या झाडावर चढून फुले तोडीत असलेला दिसला. त्या दोघींना पाहून त्याला आश्चर्य वाटले. आकाशात उडत त्या थोड्या जवळ आलेल्या पाहून त्याने काही फुले त्यांच्यावर फेकली. त्यातले एक फूल सुभ्रमला लागले व ती दगड होऊन खाली जमिनीवर आदळली.
तिच्या मैत्रिणीने आपल्या अंगाला एकाही फुलाचा स्पर्श होऊ दिला नाही. ती परत इंद्राकडे गेली व सुभ्रम कशी दगड होऊन खाली पडली हे वर्णन करून सांगितले. इंद्र ते सर्व ऐकून म्हणाला— "तेथून तो दगड कोणी बाजूला सारला तर तिला स्वतःचे रूप पुन्हा मिळेल. तिने मर्त्यलोकात कोणाशी लग्न करून घेतले व तिला मुलेबाळे झाली, तर मी तिला पुन्हा स्वर्गात बोलावून घेईन."
"देवेंद्रा! रानात पडलेला दगड उचलून नेण्याची गोष्ट कोणाला सुचेल? माझ्या मैत्रिणीला त्या स्थितीत किती दिवस कंठावे लागतील कोण जाणे?" सुभ्रमची मैत्रीण म्हणाला. "त्याकरिता सुद्धा काही उपाय करावा लागेल व मी तो करीन," इंद्र म्हणाला.
तिकडे मर्त्यलोकातल्या त्या माणसाला दोघी अप्सरा अदृश्य झालेल्या दिसल्या. बराच वेळ तो त्या पुन्हा दिसतील म्हणून वाट पाहत राहिला. शेवटी आपले काम संपवून झाडावरून तो खाली उतरला व घरी जाऊ लागला, तेव्हा त्याला एक काळा दगड पडलेला दिसला. तो आला तेव्हा तो दगड तेथे त्याला दिसला नव्हता. 'आता कुठून आला?' असा एक विचार त्याच्या मनात आला व त्याने त्याला पाय लावला. पण आश्चर्य असे की, पाय लागताच त्या दगडावर चार मोती लकाकत असलेले त्याला दिसले. त्याने ते मोती उचलून घेतले. त्याने पुन्हा एकदा त्या दगडाला पाय लावला, पण या खेपेस त्या दगडांतून काही निघाले नाही.
त्याने आपल्या गावी जाऊन गावकऱ्यांना ते विचित्र वृत्त वर्णन करून सांगितले. पण कोणाला ते खरेच वाटेना. "आकाशात बायका उडत असलेल्या दिसल्या म्हणे, आणि दगडांतून मोती निघाले म्हणे!" परंतु काही लोकांना कुतूहल वाटून ते तो दगड पाहायला निघाले. प्रत्येकाने त्या दगडाला पाय लावला व प्रत्येकाला एकेकदा चार मोती मिळाले.
प्रत्येकाला चार मोती मिळाले होते, म्हणून ती गोष्ट लपविण्याचे कारण राहिले नाही. गावभर ती गोष्ट पसरली व आसपासच्या गावी पण पसरली. लोक तेथे तीर्थस्नानाला जमतात तसे येऊ लागले व मोती घेऊन परत जाऊ लागले. त्या दगडाजवळ रात्रंदिवस गर्दी राही. मोती मिळावा म्हणून लोकांची मारामारी पण होऊ लागली. अधिकाऱ्यांनी शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून रांगेने लोकांना उभे केले. राजाला देखील ही गोष्ट कळली. राजाने आज्ञा काढली की, मोती मिळविणाऱ्यांनी त्यांतले दोन मोती 'कर' (Tax) म्हणून खजिन्यात जमा करावेत. दूरदूरचा प्रवास करून लोक येऊ लागले. त्यांच्या उतरण्यासाठी जागोजागी धर्मशाळा बांधण्यात आल्या.
शेजारच्या राजेरजवाड्यांकडे देखील ही बातमी पोहोचली व तो दगड म्हणजे चिंतामणी किंवा कल्पवृक्षासारखा वाटला सर्वांना. नवीन जन्माला आलेले लोक सुद्धा दगडाला पाय लावून मोती जमा करू लागले. राजाचा खजिना भरू लागला. म्हणून शेजारच्या राजांना त्या राजाचा हेवा वाटू लागला. त्यांनी त्याच्या राज्यावर स्वारी करण्याचे ठरविले. ते कळल्यावर राजाने तो दगड उचलून आणून आपल्या किल्ल्यात ठेवून देण्यास सैन्य पाठविले. सैनिकांनी मोठ्या कष्टाने तो दगड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवून पाहिला, आणि आश्चर्य म्हणजे तो दगड अदृश्य झाला व त्याच्या जागी एक सुंदर स्त्री उभी असलेली त्यांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले, काही जणांना भीती पण वाटली.
"कोण तू? या दगडाचे रूप घेऊन तू येथे कशाला पडून होतीस इतके दिवस? कोठली राहणारी तू? तुझ्या पतीचे नाव काय?" त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
"मला देश नाही, पति नाही. मी स्वतःच्या हट्टामुळे व चुकीमुळे दगड होऊन गेले होते. आता तुमच्या कृपेने मला माझे पूर्वरूप मिळाले आहे. कोणी माझ्याशी लग्न करण्यास तयार असेल तर मी त्याची पत्नी व्हायला तयार आहे," सुभ्रम म्हणाला.
त्या सैनिकांपैकी फक्त एकच सैनिक साहस करून म्हणाला— "माझे लग्न अद्याप झालेले नाही. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करून घ्यायला."
त्या दोघांचे लग्न झाले. सुभ्रमला एक जुळे झाले— एक मुलगी व एक मुलगा. आणि नंतर ती परत इंद्रलोकी निघून गेली. तोपर्यंत मनुष्याला हल्लीचे रूप नव्हते. परंतु सुभ्रमच्या दोन्ही मुलांना देवांसारखे सुंदर रूप होते. आज सुंदर स्त्री-पुरुष मनुष्य जातीत दिसतात, ते त्यांचेच वंशज होत, असे मानले जाते.