Bookstruck

अन्याय आणि दुर्दैव

गोपाळ नावाचा एक माणूस देशाटन करीत निघाला. फिरत-फिरत तो विजयपुरी या राज्यात आला. तिथे बलवंतवर्मा नावाचा राजा राज्य करीत होता. एका गावी जात असताना काही चोरांनी त्याला गावाच्या वेशीवरच अडवले आणि त्याच्याजवळ असलेला पैसाअडका घेऊन पसार झाले. गोपाळने त्या गावातील पोलीस पाटलाकडे फिर्याद केली. पोलीस पाटलाने गोपाळकडे रागाने पाहिले व म्हणाला— "भल्या गृहस्था! चोरांची उपजीविकाच चोरी, लूटमारीवर चालते. ते नाही करायचे तर त्यांनी काय उपाशी राहायचे?" व वर चार शिव्या हासडल्या. गोपाळला त्या राज्याचा व राजा बलवंतवर्माचा अतिशय राग आला. तो राजधानीत पोहोचताच— "बलवंतवर्माजवळ राज्य चालवण्याची लायकी नाही, तो निव्वळ मूर्ख आहे. देशात चोर-लुटारूंचा सुळसुळाट झाला असून ते देशाचा घात करतील." असे तावातावाने बोलू लागला. राजाच्या शिपायांनी त्याला पकडून नेले व राजद्रोही म्हणून त्याला दहा वर्षांसाठी कारागृहात डांबण्यात आले. दहा वर्षांचा तुरुंगवास भोगून बाहेर पडल्याबरोबर पूर्वानुभवाने शहाणपण शिकल्यामुळे तो उत्साहाने ओरडू लागला— "राजा बलवंतवर्मा फार विवेकी व राजधर्माचे पालन करणारा आहे; बलवंतवर्मा महाराज की जय!" वगैरे. त्याला पुन्हा पकडण्यात आले व यावेळी राजदरबाराने त्याला वीस वर्षांच्या बंदिवासाची शिक्षा ठोठावली. त्याला आश्चर्य वाटले, मागच्या वेळी राजाविरुद्ध बोलल्यामुळे दहा वर्षांची शिक्षा आणि आता राजाला चांगले म्हटल्यामुळे दुप्पट शिक्षा! गोपाळ दहा वर्षांसाठी तुरुंगात असताना राजा बलवंतवर्माच्या सेनापतीने बंड केले होते व त्याला हटवून स्वतःच राजा झाला होता. ही गोष्ट गोपाळला नंतर कळली.