Bookstruck

अधिकार लालसा

शिव नावाच्या तरुणाने शहरात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले, व तो स्वग्रामी-विजयपुरीला परत आला. शिवचे वडील त्याच्या लहानपणीच वारल्यामुळे आईनेच त्याला वाढवले होते, शहरात पाठवून उच्च शिक्षणही दिले होते. गावात येऊन एक आठवडा लोटल्यावर, कुठे तरी नोकरी करायचा आपला मानस त्याने आईजवळ व्यक्त केला. ती म्हणाली, "शिव, तुझ्या योग्य नोकरी तुला जमीनदारांच्या कचेरीत नक्की मिळेल. तुझ्या बाबांचे लहानपणचे मित्र धनंजय तुला या बाबतीत मदत करू शकतील. रघुनाथपुरला जाऊन त्यांची भेट घे शिवा." दुसऱ्याच दिवशी शिव रघुनाथपुरला जाऊन धनंजयला भेटला. ते म्हणाले, "जमीनदाराच्या कचेरीत काम मिळवणं सोपं नव्हे. कारण तिथे असणारा भैरवनाथ नावाचा माणूस प्रत्येक बाबतीत आपलं नाक खुपसत असतो, अन् जमीनदार नेहमी त्यांचंच बोलणं मानत असतो." "मग त्या भैरव नाथला खुश करण्याचा काही उपाय असला तर सुचवा न काका!" काही विचार करत शिव उत्सुकतेने म्हणाला. "भैरवला अधिकार दाखवायची भारी हौस आहे." धनंजय उत्तरले. "ठीक आहे. मी त्यालाच गाठून माझं भाग्य आजमावून पाहीन. मला आशिर्वाद द्या काका!" असे म्हणून शिव तेथून निघून जमीनदाराच्या कचेरीकडे वळला. जमीनदार ज्या शहरात रहात असे, तेथेच शिवचा एक मित्रही रहात असे. मित्राचे नाव होते चलपति. त्याला आपल्या कामाबद्दल अन् भैरवबद्दल सांगून शिव म्हणाला, "कचेरीत नोकरी मिळवायची, तर प्रथम या भैरवनाथला आपलंसं करायला हवं. पण यासाठी काय करायला हवं, ते मात्र समजत नाहीय मला!" नंतर दोघा मित्रांनी काही विचार करून एक योजना बनवली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शिव कचेरीत गेला अन् त्याने भैरवला भेटायचा प्रयत्न केला. भैरव काही कामात आहे असे सांगून, काही वेळ बसवून ठेवल्यानंतर नोकर त्याला जेवणाच्या वेळी भैरवकडे घेऊन गेला. मोठ्या नम्रतेने भैरवला नमस्कार करून म्हणाला, "महाराज, कृपा करून आपण मला जमीनदारांच्या कचेरीत एखादं काम मिळवून द्या ना. आपण शिफारस केलीत तर जमीनदार 'नाही' म्हणत नाहीत असं ऐकलंय मी!" मोठ्या ऐटीत डोके हलवत भैरवनाथ म्हणाला, "हं! ठीक आहे, उद्या ये परत. पाहू काही जमतंय का." शिव तेथून निघून चलपतीकडे गेला. त्याला कचेरीत घडलेली वार्ता त्याने सांगितली. चलपती म्हणाला, "आपण अंदाज केला होता तसंच झालं की नाही? उद्याही जा त्याच्याकडे. मग उतरू मैदानात आपण!" दुसऱ्या दिवशी शिवला भैरवची भेट लवकर मिळालीच नाही. चांगली चार पाच तास वाट पहायला लावून त्याने नोकराकरवी शिवला बोलावून घेतले अन् म्हणाला, "उद्या ये, पाहू आपण." दुसऱ्या दिवशी शिव जेंव्हा भैरवला भेटला, तेंव्हा अगोदरच तिथे चार मोठी माणसे बसलेली होती, अन् ती सारी भैरवची मोठ्या अहमहमिकेने स्तुति करत होती. त्याचवेळी चलपति तेथे आला व घाबऱ्या घाबऱ्या इकडे तिकडे पाहू लागला. शिव त्याला विचारू लागला. "अरे काय झालं? इथे का आलास? कुणाला शोधतो आहेस तू?" "काही नाही. मी रामदादाला शोधतो आहे. त्यानं मला कचेरीत नोकरी द्यायचं कबूल केलं होतं." चलपतीने सांगितले. हे ऐकताच भैरवनाथ रागाने लाल होत म्हणाला, "मला काहीच न सांगता त्या नालायकानं तुला इथं कसं पाठवलं? बागेत काम करणारा रामदादा काय तुला नोकरी देण्याइतक्या मानाचा झाला? अन् कायरे, इथे कचेरीत नोकरी देववण्याइतका लायक माणूस कोण, हे तुला नाही माहीत?" तेंव्हा चलपति शान्तपणे त्याच्याकडे पहात विचारू लागला, "आपण कोण महाराज?" यावर आपली मान जोराने शिवकडे वळवत तो विचारू लागला. "गेला आठवडाभर रोज तू नोकरीसाठी माझ्याकडे येतोयस, होय ना? या येडपटाला सांग, मी कोण आहे ते!" भैरवने त्याला आज्ञा केली. शिवने चटकन सांगितले, "यांचं नाव भैरवनाथ अन् यांचा सल्ला घेतल्यावाचून जमीनदार कुणाला ही नोकरीला ठेवून घेत नाहीत." तेंव्हा शिवकडे तुच्छतेने पहात चलपति म्हणाला, "ओहो! हे भैरवमहाराज आहेत! पण रामदादापेक्षा यांची हुकुमत इथे जास्त चालते, यावर माझा विश्वास नाही बसत." चलपतीचे बोलणे ऐकून, त्या मोठ्या लोकांसमोर आपले नाक कापले गेल्यासारखे भैरवला वाटले. चलपतीकडे तीक्ष्ण नजरेने पहात तो म्हणाला, "मीही पाहूनच घेतो तुझा रामदादा तुला या कचेरीत कशी नोकरी देतो ते! आता नीट कान उघडून ऐक, मी या मुलाला उद्याच संध्याकाळपर्यंत इथे नोकरी देववत आहे; साधीसुधी नव्हे - इतर सर्व लहानमोठ्या नोकरांवर देखरेख ठेवायची नोकरी! आता पहाच कि इथं माझा शब्द चालतो, की त्या नालायक रामदादाचा!" अन् अशा प्रकारे शिवला त्या कचेरीत एक छान नोकरी मिळाली.