अघटित अनपेक्षित: प्रामाणिक मुंगूस
देवशर्मा नावाच्या एका गरीब ब्राह्मणाला पुष्कळ उशिरा एक मुलगा झाला. मुलाचे तोंड पाहिल्याबरोबर त्या जोडप्याला परमानंद झाला. सर्वांना चंदन लावलं तरी त्यापेक्षा मुलाच्या अंगाचा स्पर्श झाला तर मनाला जो गारवा वाटतो तो अपूर्वच असतो. मुलासाठी, भावंडांशी, आईवडिलांशी किंवा प्रत्यक्ष अन्नदात्याशी भांडायला आई-बाप मागेपुढे पाहत नाहीत ही गोष्ट सर्वांच्या परिचयाचीच आहे.
देवशर्मा दंपतीने मुलगा झाला नव्हता तोपर्यंत घरात एक मुंगूस पाळलेले होते. ते मनाला वाटेल तेव्हा वाटेल तसे घरात चहूकडे हिंडे फिरे. तोपर्यंत त्या मुंगसाला ते जोडपे स्वतःच्या मुलासारखे पाही. परंतु मुलगा झाल्यावर त्या मुंगसाचा मुलाला काही अपाय तर होणार नाही ना, अशी त्यांना शंका वाटू लागली. मुलावरच्या अपार प्रेमामुळेच ही शंका त्यांच्या मनात उद्भवली होती, हे सांगायला नकोच.
मुलगा झाल्यावर दहाव्या दिवशी मुलाची आई तान्ह्या मुलाला घरात ठेवून नदीवर नहायला गेली. जातांना ती नवऱ्याला बजावून गेली— "मी आंघोळीला जाते आहे, मुलावर चांगलं लक्ष ठेवा, बरं का?"
ती गेल्यावर काही वेळाने राणीची एक दासी येऊन ब्राह्मणाला म्हणाली— "राणीसरकारांनी शिधा दक्षिणा तयार ठेवला आहे, येऊन घेऊन जा, म्हणून सांगायला सांगितले आहे." राणीसरकारांनी दाखविलेल्या अनुग्रहाला बळी पडून ब्राह्मण आपले मूल आणि घर मुंगसावर सोडून लगेच निघाला.
तो गेल्यावर थोड्याच वेळाने भिंतीतल्या भोकांतून एक साप सरसर पुढे आला आणि मुलगा निजला होता त्या बाजूला निघाला. मुंगसाचे सापाशी हाडवैर असल्याकारणाने मुंगसाने सापाला धरले व त्याची खांडोळी करून त्याला ठार केले.
इतक्यात मुंगसाने ब्राह्मणाला परत येतांना पाहिले आणि आपण काही मोठे काम केले हे दाखविण्यासाठी मोठ्या उत्साहाने, रक्ताने माखलेल्या तोंडाने दारापर्यंत गेला. ब्राह्मणाने मुंगसाच्या तोंडावर रक्त पाहिले व त्याला संशय आला की मुंगसाने मुलाला ठार केले असावे. असा विचार करून त्याने मागचा पुढचा विचार न करता हातातल्या जड दंडाने मुंगसाला ठार केले.
परंतु घरात गेल्यावर त्याला मुलगा शांतपणे झोपलेला व सापाचे तुकडे पडलेले दृष्टीस पडले.
"बाप रे! मी केवढा मूर्खपणा केला? मी पापी आहे! माझ्या मुलाला वाचविणाऱ्या मुंगसाला मी आपल्या हातांनी ठार केले." तो स्वतःला आवरू शकला नाही आणि स्वतःचे डोके आपटून जमिनीवर लोळू लागला.
त्याच वेळी त्याची बायको नदीवरून परतली व तिने तसे करण्याचे कारण विचारले. ब्राह्मणाने घडलेले वृत्त सांगितले. तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली— "तुम्ही लोभाला बळी पडून मुलाला एकट्याला सोडून निघून गेलात, आणि अविचाराने मुलाला वाचविणाऱ्या मुक्या प्राण्याचा जीव घेतलात! माणसात अशा कामना असणे साहजिक आहे, परंतु लोभ असू नये. लोभी लालची माणसाच्या डोक्यावर कपाळावरचे चक्र नव्हते का फिरले?"
"ती कोणती गोष्ट?" ब्राह्मणाने विचारले व त्याची बायको सांगू लागली.
(येथून पुढे लोभावर आधारित दुसरी उप-कथा 'लालची लोभी' सुरू होते, ज्यात चार मित्रांची गोष्ट आहे)
लालची लोभी
एका गावात अल्प लोभी, मित लोभी, अति लोभी आणि अत्यंत लोभी नावाचे चार मित्र राहत होते. आपसात गाढ मैत्री होती. ते सर्व गरीबच होते. एकदा जेव्हा चारही तरुण एका जागी एकत्र जमले तेव्हा अत्यंत लोभी इतर तिघांना म्हणाला—
"मित्र हो! गरीबी पेक्षा दुसरा मोठा शाप नाही व अपमानास्पद गोष्ट ही नाही. भाऊबंद आणि नातेवाईकांमध्ये राहून गरिबीत दिवस काढण्यापेक्षा हिंस्र रानटी जनावरांबरोबर जंगलात आणि काटेरी रानात राहणे परवडले. अत्यंत विश्वासपात्र नोकराशी सुद्धा त्याचा मालक अगदी नीचपणाने वागतो. इतरत्र सज्जन म्हणविणारे नातेवाईक देखील गरीब व्यक्तीशी निर्दयपणाने आणि अपमानास्पद वागतात. गरिबाच्या चांगल्या गुणांना किंमत नसते. मुलेसुद्धा त्यांना सोडून देतात. बायकोसुद्धा त्यांची परवा करीत नाही. मित्र त्यांच्याकडे वळूनसुद्धा पाहत नाहीत. या जगाचा नियमच असा काही विचित्र आहे की साहस, सौंदर्य, वाक्चातुर्य, चमत्कार, ज्ञान, विद्या, युद्धकौशल्य इत्यादी चांगले गुण असूनही जर थोडे फार धन आणि दौलत नसेल तर मानवाला प्रतिष्ठा व मान मिळत नाहीत. धन असेल तरच अशा गुणांचा उपयोग होतो व जगावर जय मिळविता येतो. त्याशिवाय हे सर्व व्यर्थ आहे. म्हणून आपण देशाटन करून धनार्जन करू या."
बाकी मित्रांनी तो म्हणाला त्याला दुजोरा दिला. नंतर चौघे मित्र धनार्जन करण्यासाठी आपल्या गावाहून निघाले. एक वेळ पोटाला मिळणारा माणूस आपल्या बंधुबांधवांना, आईबाप व गाव सोडून देशभर भटकत फिरला नाही तर त्याशिवाय त्याला करता येण्यासारखे काय आहे?
काही दिवसांनी ते अवंती राज्यात पोहोचले. क्षिप्रा नदीत स्नान करून नदीकाठावरच्या देवळात त्यांनी महाकालाचे, म्हणजे शंकराचे दर्शन केले. देवळातून ते बाहेर पडले तेव्हा भैरवानंद नावाचा एक तांत्रिक साधू त्यांना भेटला. सर्वांनी त्याला नमस्कार केला आणि त्याच्याबरोबर जवळच असलेल्या त्याच्या मठात गेले.
साधूने विचारले— "कोण तुम्ही? कोठून आलात? कोठे जायचे आहे?"
ते म्हणाले— "आम्ही धनाच्या शोधार्थ निघालो आहोत. त्यासाठी जीव द्यावा लागला तरी आम्ही तयार आहोत. परंतु धन्वेषणाचे काम मात्र आम्ही सोडणार नाही. आम्ही असे ऐकले आहे की मंत्रबळाने जमिनीत पुरलेले धन किंवा ठेवा कोठे आहे हे कळते. अशा एका मंत्रिकाकडे जाण्याच्या हेतूने आम्ही आलो आहोत. साहसी व्यक्तीचे आकाशातून अध:पतन होते, तर दुसरा नरकातून निघून चारही समुद्रांवर अधिकार गाजवितो. उत्थान व पतन यांचे कारण प्रारब्ध नसून प्रयत्नांची उणीव आहे. परिश्रम आणि प्रयत्न यांचे फळ सहजी हाती लागलं तर त्याला नशीब म्हणतात, परंतु साहसी अधिकाराची पर्वा करीत नाहीत. त्यांचे ते दु:साहस उदात्त आहे. प्रयत्नाशिवाय कोणत्याही सुखाचा लाभ होत नाही. नारायणाने लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी हाताला घट्टे पडेपर्यंत समुद्रमंथन केले होते. जो मेहनत करीत नाही, त्याच्या जवळची संपत्ती त्याच्या पासून पाठ फिरविते. ज्याच्या अंगात शौर्य नाही असा राजा परराज्य कसा जिंकणार? स्वतःचे राज्यसुद्धा तो घालवून बसतो. धन खोल भुयारात असो, नागसाप रक्षणार्थ नेमलेले असोत, भुतांना संतुष्ट करावे लागो, स्मशानात प्रेतांतले मांस काढून भुतांना विकावे लागो किंवा निधी जेथे आहे ती जागा विझलेल्या मंत्रदीपांवरून सूचित होणाऱ्या असोत, आम्ही त्या सर्वांला तयार आहोत. तुम्हांला पाहिल्यावर तुमच्या अंगात अतीव शक्ती आहे, असे आम्हांला वाटले. तुम्ही आम्हांला मदत करा. मदत केलीच पाहिजे. मोठी कामे मोठ्यांच्या हातूनच झाली पाहिजेत. वडवाग्नीचा ताप समुद्रच सहन करू शकतो." चार मित्र त्या साधूला म्हणाले.