अंड्यांचा व्यापार
गीतापूरची अंडी फार प्रसिद्ध होती. त्या गावचे शेतकरी शेतकामाबरोबर कोंबड्या पाळीत आणि जोडधंदा म्हणून हा गावरान कोंबड्यांचा धंदा करीत. त्यांना त्यातून चांगली मिळकत होत असे. अंडी चांगल्या आकाराची आणि रुचकर असल्यामुळे त्यांना बाजारात चांगली किंमत मिळे.
परंतु एका वर्षी कसला तरी रोग पसरला आणि कोंबड्या पटापट मरू लागल्या. आणि अशी वेळ येऊन ठेपली की गावात एकही कोंबडी नमुन्यालादेखील उरली नाही. दीनानाथ नावाच्या शेतकऱ्याकडे पाचशे कोंबड्या होत्या, त्यांपैकी एकदेखील वाचली नाही.
"ही काहीतरी भूतपिशाच्च बाधा असावी," असा दीनानाथला संशय येऊ लागला. "त्या भूतांचा नाश व्हावा यासाठी होम केल्याशिवाय भागणार नाही. दुर्लक्ष केले तर ती भुते आपल्या मानेवर बसायला मागेपुढे पाहणार नाहीत," असे त्याला वाटले.
इतर शेतकऱ्यांना दीनानाथचे म्हणणे बरोबर वाटले. शेजारच्या गावी एक मांत्रिक राहत होता. सर्वांनी मिळून चंदा केला आणि त्या मांत्रिकाला बोलवून भूतबाधा नष्ट करण्याचा त्याच्या करवी प्रयोग करायचे ठरले.
एका शनिवारी रात्री तो मांत्रिक आपल्या शिष्यवर्गासह गीतापूरला आला आणि भूतांना पळवून लावण्यासाठी मंत्रतंत्र काय ते त्याने केले आणि खूप जेवून-खाऊन व बरेचसे पैसे मिळवून आपल्या गावी निघून गेला.
आता यापुढे भीती नाही असा विचार करून गावकऱ्यांनी कोंबड्या विकत आणल्या आणि अंड्यांचा धंदा पुन्हा सुरू केला. परंतु एका आठवड्याच्या आत सर्व कोंबड्या मेल्या.
"पुरे झाला बाबा हा कोंबड्यांचा धंदा. आपण बरे आणि आपली शेती बरी. कोणता तरी शाप आहे आपल्या कपाळी," दीनानाथ म्हणाला.
अशा तऱ्हेने गीतापूरला औषधालादेखील अंडे मिळणे अशक्य झाले. शेतकरी वर्गाला तेव्हापासून फावल्या वेळी माश्या मारीत बसण्याव्यतिरिक्त काही काम उरले नाही.
गीतापूरच्या एका धनी शेतकऱ्याचा मुलगा शंकर सुट्टीचे दिवस होते म्हणून घरी आला होता. मागच्या खेपेस तो घरी आला होता तेव्हा दोन्ही वेळ अंड्याशिवाय त्याचे जेवण होत नसे. या खेपेस तीन दिवस झाले तरी जेवणाबरोबर अंड्याचा वासही मिळाला नाही.
त्याने आपल्या आईला विचारले तेव्हा ती म्हणाली, "पाप लागलं आहे आपल्या गावाला. भुतांनी सर्व कोंबड्या खाऊन टाकल्या." परंतु शंकरला ते खरे वाटेना. अंड्यांचा धंदा गावात खूप चाले आणि शेतकऱ्यांना चांगली मिळकत होत असे, हे त्याला चांगले माहीत होते. गावात पुन्हा तो धंदा सुरू झाला पाहिजे आणि त्यासाठी काय वाटेल ते करावे लागले तरी करायचे त्याने मनाशी ठरविले. देशात अन्नधान्याचा तुटवडा होता, मांस-मासळीसुद्धा फारच कमी मिळे, म्हणून कोंबड्या पाळण्याचा धंदा वाढविणे आवश्यक होते.
दुसऱ्या दिवशी उजाडताच शंकर दीनानाथच्या घरी गेला आणि "कोंबड्या मेली ती कोणत्या तरी स्पर्शजन्य रोगाने, म्हणजे साथीच्या आजाराने मेल्या आहेत; भूत-पिशाच्च बाधा वगैरे सर्व खोटे आहे," असे शंकरने दीनानाथला अनेक प्रकारे समजावून सांगून पाहिले. परंतु त्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्याला त्याचे म्हणणे खरे वाटेना.
शहरात असताना त्याने थोडी जादू शिकून घेतली होती. त्या जादूचा प्रयोग करून शेतकऱ्यांचा अंधविश्वास दूर करण्याचे त्याने ठरविले. तो गावकऱ्यांना म्हणाला, "मी जास्त दिवस शहरात असतो ना! तिथल्या देवळात पुष्कळ वैरागी आणि सिद्धपुरुष राहतात. आमच्या बाबांनी गावातली खबरबात पत्रात लिहिताना गावात होत चाललेला हा प्रकारही मला कळविला होता. तेव्हा मी एका सिद्धपुरुषाकडे जाऊन त्याला कोंबड्या पटापट मरत असल्याचे सांगितले. त्यांचे नाव आहे गंभीरानंद महाराज. त्यांनी मला एक ताईत दिला आणि त्याचा प्रभाव कोंबड्यांवर फार चांगला होईल असे सांगितले. तो प्रभाव तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनीच पहा. तुम्हाला खरे वाटावे म्हणून मीच कोंबड्यांचा धंदा सुरू करून शापमुक्ती कशी मिळेल हे दाखवितो. ताईताचा प्रभाव पाहताय का? केव्हा म्हणाल तेव्हा दाखवायला मी तयार आहे."
"हो! उद्या दुपार उलटल्यावर ये. येथे माझ्या घरीच तो प्रयोग दाखव. मी सर्व शेतकऱ्यांना पाहायला बोलावितो," दीनानाथ म्हणाला.
दुसऱ्या दिवशी तीन प्रहरी शंकर दीनानाथच्या घरी गेला. तिथे पुष्कळ गावकरी जमले होते. शंकरने आपल्या खिशातून एक तांब्याचा ताईत काढून चौरंगावर ठेवला. मग उजव्या हाताने खिशातून कोंबडीचे अंडे काढून डाव्या हातात ठेवले आणि ते हातरुमालात झाकून ठेवले. नंतर ताईत काढला आणि उजव्या हाताने तो हातरुमालात घालून त्याने आत काहीतरी हालचाल केली. पुन्हा ताईत बाहेर काढला. काही वेळ थांबून हातरुमालाची टोके बाजूला सरकवली. त्याच्या डाव्या हातात दोन अंडी दिसल्यावर गावकरी आश्चर्यचकित होऊन डोळे फाडून पाहू लागले.
शंकरने दोन अंडी रुमालात गुंडाळून खिशात ठेवली आणि ताईत काढून डोळ्यांना लावून तांबड्या दोऱ्याने आपल्या दंडाला बांधून ठेवला. त्या दिवशी प्रयोग करण्यापूर्वी एक-दोन दिवस शंकर शहरात जाऊन पशुचिकित्सक आणि कुक्कुट तज्ज्ञांना भेटला आणि त्यांचा सल्ला व मदत घेऊन कुक्कुटपालनावर पुस्तके, औषध व इंजेक्शन विकत घेतली होती. इंजेक्शन कशी द्यायची हे त्याने शिकून घेतले होते. दोन दिवसात या विषयावर त्याने अनेक गोष्टींची माहिती करून घेतली होती आणि दीनानाथच्या घरी प्रयोग करण्यापूर्वी अंडी 'दुप्पट' करण्याची रीतदेखील समजून शिकून घेतली होती.
ती रीत अशी: एका मोठ्या अंड्याचे टरफल घेऊन त्याचे दोन उभे समसमान भाग कापून घ्यायचे. अर्ध्या टरफलात एक लहान अंडे सहज राहू शकते. अशी दोन अंडी ठेवलेली मोठी अंडी शंकरने प्रयोगाच्या वेळी पूर्वी तयार करून आणली होती. त्याने प्रेक्षकांना अंड्याचा वरचा भाग तेवढा दाखविला. हात घालून हालचाल करताना अंडी टरफलातून बाहेर काढली. थोड्या अंतरावरून पाहणाऱ्यांना टरफलाचे दोन जोडलेले भाग एकाच अंड्यासारखे वाटत होते.
जादू यशस्वी झाल्यावर शंकरने पुढला कार्यक्रम हाती घेतला. त्याने काही कोंबड्या विकत आणून पाळल्या. सरकारकडून त्याला उत्तम प्रकारचा कोंबड्यांना घालायचा चारा मिळाला. स्पर्शजन्य रोग होऊ नयेत म्हणून त्याने कोंबड्यांना रोगनिरोधक इंजेक्शन दिली. कोंबड्या झपाट्याने वाढल्या आणि मोठी अंडी घालू लागल्या. एकदेखील कोंबडी मेली नाही. गावकरी येऊन त्याच्या कोंबड्या पाहून त्याची पद्धत व रीत पाहून जात. चार आठवड्यात शंकरचा धंदा उत्तम तऱ्हेने चालू लागला.
"हा सर्व या ताईताचा प्रताप आहे दीनू मामा! त्यानेच माझा धंदा वाचविला," असे तो वरवर म्हणे, पण प्रत्यक्षात त्याने कोंबड्यांना चांगला आहार दिला आणि कोंबड्यांची वाढ चांगली झाली होती. इंजेक्शनांनी त्यांना पुष्ट केले होते. तो म्हणाला, "तुम्ही मुळीच भिण्याचे कारण नाही यापुढे. पुन्हा कोंबड्या पाळण्याचा धंदा सुरू करून गीतापूरच्या अंड्यांना पुन्हा बाजारात पाठवा. त्या सिद्धपुरुषाकडून मी आणखी ताईत घेऊन येतो. मी येथे आहे तोपर्यंत माझा ताईत आहेच. मी दररोज प्रत्येकाकडे जाऊन कोंबड्यांना काही त्रास होऊ नये याची काळजी वाहतो."
शंकरने दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी पुन्हा कोंबड्या पाळण्याचा धंदा सुरू केला. त्यांना खूप फायदा होऊ लागला. शंकरने स्वतः पशुचिकित्सा शास्त्राचा जास्त अभ्यास करून त्यात प्राविण्य संपादन केले. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोंबड्या पाळण्याचाच धंदा नव्हे, तर गोपालन वगरे धंदेही ऊर्जितावस्थेत आले.