उगी उगी गे उगी आभाळ...

उगी उगी गे उगी

आभाळातून खाली येते चांदोबाची पहा बगी

ढगावरून ती चाले गाडी

शुभ्र पांढरी जरा वाकडी

ससा सावळा धावत ओढी

असली अद्‌भुत गाडी कुठली रडणार्‍यांच्या कुढ्या जगी

चांदोबाच्या बघ माथ्यावर

निळसर काळी छत्री सुंदर

नक्षत्रांची तिजसी झालर

हसणार्‍यांच्या घरी पिकवतो सर्व सुखाची चंद्र सुगी

उगी पहा तो खिडकियात

चांदोबाचा आला हात

हात आईचा जणु दुधात

घे पापा तू त्या हाताचा भरेल इवले पोट लगी

गीत - ग. दि. माडगूळकर