चोखियाचे घरा आले नारायणा ...

चोखियाचे घरा आले नारायणा । होउनी ब्राह्मण दिनें वृध्द ॥१॥

हातामध्ये कांठी सावळा जगजेठी । तुळसीमाळा कंठी बुका भाळीं ॥२॥

कांपत कांपत जातसे चांचरी । मोठा नटधारी घरघेणा ॥३॥

चोखियाचे घर पुसतसे लोकां । वैकुठीचा सखा भक्त काजा ॥४॥

दुरोनियां पाहे चोख्याची अंतुरी । तंव तो आला द्वारी चोखियाच्य़ा ॥५॥

हांसत कांपत मुखाने बोलत । लाळही गळत मुखावाटे ॥६॥

वंका म्हणे पंढरीचा राणा । देखिला नयनां सोयराई ॥७॥