प्रकरण ४

संध्याकाळ होत आली होती. अमेयचा अजुन पत्ता नव्हता. दुपारची भयानक घटना शारदाच्या डोक्यातून जात नव्हती. तिने स्वतःला कामात गुंतवून घ्यायच ठरवल. अचानक तिला आठवल की तिने दुसरा तिसरा मजला अजुन पाहीलाच नव्हता. ती दुसर्या मजल्यावर आली. त्या मजल्यावर तीन बेडरूम्स होत्या. त्याच निरीक्षण करत करत ती तिसर्या मजल्यावर आली. इथे आल्या आल्या तिला अस्वस्थ वाटायला लागल.ह्या मजल्यावर एकच दरवाजा होता. त्याला एक भलमोठ कुलूप ठोकलेल होत. त्या कुलूपाला वेगवेगळे रंगीबेरंगी धागेदोरे बांधलेले होते. शारदा नकळतच त्या बंद दरवाज्याकडे आकर्षिली गेली. हळू हळू पावले टाकीत ती दाराजवळ आली. तिने दाराला हात लावला. अचानक पलीकडून ते बंद दार जोरजोरात ठोकल जाऊ लागल! त्या बंद दाराच्या मागुन कोणीतरी ते दार ठोकत होत. या विचित्र घटनेने शारदा इतकी घाबरली की तिने एक भयानक किंचाळी ठोकली.