भारतातील अश्मयुग

भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते; पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत