मध्यपुराणाश्मयुग

यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे.