तणाव
आधुनिक जीवनात तणाव नाही हे शक्य नाही. जीवन मिळाले आहे तेव्हाच दररोजच्या कटकटी सुद्धा मिळाल्या आहेत. गरीब, मध्यमवर्गीय, धनिक, धनकुबेर - सगळेच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चिंतेत असतात आणि तणाव त्यांचे शरीर पोखरत असतो. समस्यांवर प्रतिक्रिया केल्याने तणाव उत्पन्न होतो. तणाव हे जीवनाचे अविभाज्य अंग बनलेले आहे. परंतु मी असे मानतो की बहुतेक सर्व तणाव हा अवांछित असतो आणि तो काही सुलभ आणि काही कमी सुलभ उपाय करून कमी करता येऊ शकतो. अर्थात हे काही एका झटक्यात संभाव नाहीये - त्यासाठी मलाच अनेक वर्षे लागली आणि अजूनही मी तणाव उत्पन्न करणाऱ्या साऱ्या कारणांना दूर करू शकलेलो नाही. ध्येय कठीण आहे परंतु गाठण्यासारखे निश्चितच आहे.