सहिष्णुता
विक्रमार्काने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडाजवळ गेला, प्रेत खांद्यावर काढून घेतले व नेहमीप्रमाणे काहीही बोलल्याशिवाय स्मशानाच्या दिशेने चालू लागला. तेव्हा प्रेतात बसलेला बेताळ त्याला म्हणाला— "राजा! तुझी ही सहनशक्ती पाहून आश्चर्य वाटते. तुला पाहून मला शिवकाम नावाच्या एका माणसाची बायको केतकी ही आठवते. तुला मी तिची गोष्ट सांगतो. लक्ष देऊन ऐक." असे सांगून बेताळ गोष्ट सांगू लागला.
एका डोंगराळ प्रदेशात एका गावी एक शेतकरी तरुण रहात असे. त्याची जमीन डोंगराच्या पायथ्याशी होती. जवळच त्याच्या गुरांचा गोठा पण होता. कापणी होऊन पीक घरी पोचेपर्यंत तो गोठ्यातच रात्री रहात असे. कारण त्या प्रदेशात चोरांचा उपद्रव जास्त होता.
एके दिवशी शिवकाम झोपण्यासाठी खाटेवर अंग टाकणार इतक्यात त्याला डोंगराच्या बाजूने कोणी तरी येत असल्याचा भास झाला. बाहेर येऊन त्याने पाहिले तेव्हा त्याला कोणी तरी डोंगराच्या बाजूने पळत असलेला दिसला. शिवकाम एक काठी घेऊन पाठोपाठ निघाला.
एका जागी वाट वळली तेव्हा त्याला समोर एक घर दिसले. घरांतून दिव्याचा अंधुक उजेड दिसत होता. ते घर पाहून त्याला आश्चर्य वाटले. कारण पूर्वी कधी त्या जागी घर नव्हते.
घरांत कोण आहे हे पाहण्यासाठी तो जवळ गेला. घर नवीन नव्हते. आंत चांदीच्या वस्तू व लाकडी सामान पुष्कळ होते. तो आंत गेला. आंत एक मध्यम वयाचा पुरुष व एक बाई होती आणि एक तरुण मुलगी. तिने शिवकामाला तोंड फिरविल्या शिवायच पाहून घेतले. तो तेथे उभाच होता, ती मुलगी त्या दोघांना म्हणाली— "उठा जेवायला."
तो मध्यम वयाचा मनुष्य शिवकामाला म्हणाला— "येरे बुबा! तू पण जेवायला!" शिवकामला ते सर्व पाहून आश्चर्य वाटत होते. त्याचा पाय पुढे पडत नव्हता. त्याला मागे पुढे करीत असलेला पाहून तो मनुष्य म्हणाला— "घाबरण्याचे कारण नाही. तुझ्यावर आकाश नाही कोसळणार. तू आलास तसाच परत जाशील."
परंतु शिवकाम इतका भ्याला होता की त्याच्या तोंडातून शब्दच उमटत नव्हता. त्याचे डोळे त्या मुलीवर खिळून होते. इतक्या सुंदर स्त्रीची कल्पना स्वप्नात देखील त्याने केली असती. ती त्याच्याकडे चोरट्या नजरेने मधून मधून पाहात आहे हे देखील त्याच्या लक्षात आल्याशिवाय राहिले नाही.
इतक्यात त्याला घेरी आल्यासारखे वाटले. त्याने डोळे मिटले व पुन्हा उघडून पाहिले तेव्हा दृश्य अगदी निराळेच होते. तो आपल्या गुरांच्या गोठ्यात होता. समोर डोंगर व चारी बाजूला काळोख. घर नव्हते की कोणी दुसरे माणूस पण नव्हते. आकाशाकडे पाहिले तेव्हा जे तारे डोक्यावर असायला पाहिजे होते ते पश्चिमेकडे वळलेले होते. म्हणजे गुरांच्या गोठ्यातून बाहेर येऊन त्याला बराच वेळ झाला होता.
त्या सर्व गोष्टींसंबंधी विचार करीत असतां त्याला छान झोप लागली. परंतु दुसऱ्या दिवसापासून तो अगदी बदललेला दिसला. पहिल्या रात्री त्याने ज्या मुलीला पाहिले होते ती राहून राहून त्याच्या नजरेसमोर येऊन उभी राही. कोणतेही काम करीत असतां त्याला ती मुलगी आठवे. वेड्यासारखा तो तासन् तास डोंगराच्या खोऱ्यांत हिंडे, पण त्याला ते घर, तो मनुष्य, ती स्त्री किंवा ती मुलगी कधी दिसली असेल तर शपथ. स्वतःचे देहभान विसरून तो हिंडे फिरे.
असेच एक वर्ष लोटले. पुन्हा कापणीचे दिवस आले. शिवकाम पुन्हा गोठ्यातच रात्र काढू लागला. एके दिवशी रात्री त्याने गोठ्याच्या बाहेर पाऊल टाकले मात्र, पुन्हा त्याला त्या जुन्या घरांत तो असल्याचा भास झाला. पुन्हा त्याला तो मनुष्य, ती स्त्री व ती मुलगी तशीच दिसली. त्या मुलीला पाहताच शिवकामला जिवात जीव आल्यासारखे वाटले. या खेपेस तो घाबरला नाही. त्या माणसाने त्याला जेवायला बोलावताच तो आंत गेला. जेवण त्याला फार आवडले. त्याने पोटभर जेवून घेतले. इतके स्वादिष्ट जेवण आयुष्यभरात जेवल्याचे त्याला आठवले नाही. जेवताना तो नवरा बायको त्याला म्हणाली— "आमच्या मुलीचे लग्न तुझ्याशी करून द्यावे असे म्हणत आहोत. आयुष्यभर तू सुखांत घालविशील."
शिवकामाने त्याचे काहीच उत्तर दिले नाही. पण तो लग्नाला कबूल झाला. त्या मुलीचे नाव केतकी असे होते.
त्या वर्षी तो पीक घेऊन आपल्या घरी गेला नाही. गुरांच्या गोठ्यात पण राहिला नाही. तो कोठे आहे, हे त्याच्या नातेवाईकांना पण कळले नाही. पण तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या बरोबर अप्सरेसारखी एक सुंदर स्त्री आलेली पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. "या मुलीशी मी लग्न करणार आहे." शिवकाम म्हणाला. कोणी त्याला नकार दिला नाही व लग्न समारंभ पार पडला. मुलगी कोठून आली, कोणाची, हे कोणाला माहीत नव्हते, तरी कोणी कधी तिला किंवा शिवकामला एका शब्दाने विचारले नाही. सर्व तिचे कौतुकच करीत.
त्या मुलीने घरांत पाऊल ठेवले त्या दिवसापासून घराचे रूपच बदलले. शिवकामला सर्व वैभव प्राप्त होते. तिच्या रूपाने प्रत्यक्ष लक्ष्मीनेच जणू काही त्याच्या घरांत प्रवेश केला. जो कोणी त्याच्या घरी येईल, जे काही मागे, ते त्याला देऊन केतकी आनंदाने पाठवी. आसपासच्या गांवी त्याचे औदार्य व दानवृत्ती यांची प्रसिद्धी झाली. म्हणून गोरगरीब त्याच्याकडे येऊ जाऊ लागले व त्याच्याकडून आपल्या गरजा भागवून जाऊ लागले.
केतकीशी लग्न झाल्यानंतर शिवकाम लवकरच सामान्य माणसासारखा वागू लागला आणि हातात थोडे पैसे जमा झाल्यावर त्याला थोडा गर्व पण झाला. तो आपल्या बायकोला देखील तोंडाला येईल ते बोले. केतकी तो जे बोले वा करी, त्याबद्दल कधी काही बोलत नसे.
काही दिवसांनंतर एक मस्तवाल बैल साखळीच्या आधी काही दिवस एकदा शिवकामला खुंट्यासकट ओढू लागला. ते पाहून केतकी घराबाहेर धावत आली व नवऱ्याच्या हातचा खुंटा घेऊन तिने तो शिताफीने जमिनीत दाबून रोवला. लगेच बैल जमिनीवर इतक्या जोराने आदळला की जणू खुंटा त्यालाच कोणी भोसकला. मोठ्या कष्टाने तो उभा राहिला. शिवकामने चकित होऊन त्याच्याकडे पाहिले. बैल थरथर कापत होता.
नंतर केतकी बैलाला जणू काही बकरीसारखे धरून खुंट्याजवळ घेऊन गेली व त्याला तेथे बांधून ठेवला. बैल तिला पाहूनच भ्याला होता. ते पाहून शिवकाम पण घाबरला. त्याची बायको म्हणजे सामान्य स्त्री नव्हे हे माहीत असूनही त्याने तिची कधी कदर केली नव्हती. तिचा अपमान केला होता व तिला कित्येकदा रागावला पण होता. शिवकामच्या लक्षात त्याची ती चूक आली व तेव्हापासून तो बायकोचा आदर करू लागला. त्यांना त्यानंतर मुले बाळे झाली, त्यांनी पुष्कळ दौलत मिळविली व कित्येक वर्षे त्यांचा संसार सुखाचा झाला.
येथवर गोष्ट सांगून बेताळ म्हणाला— "राजा, मला एका गोष्टीची शंका आहे. शिवकाम आपल्या बायकोला एक सामान्य स्त्री मानूनच तिच्याशी वागला. परंतु केतकीच्या अंगी देवी शक्ती असूनही ती सर्व कष्ट मुकाट्याने कां सहन करीत होती? सामान्य स्त्रीसारखी सहिष्णुता तिने दाखविण्याचे काय कारण? या प्रश्नाचे उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील."
विक्रमार्क म्हणाला— "केतकी तशी वागली त्याला पुष्कळ कारणे होती. एक, ती देवी होती तरी तिने एका सामान्य माणसाशी लग्न स्वतःच्या इच्छेने केले होते. त्यासाठी तिने मनुष्य जातीच्या स्त्रीचे रूप घेतले होते. म्हणून एका सामान्य स्त्रीसारखे वागणेच तिला योग्य होते. प्रत्येक वेळी आपल्या असामान्य शक्तीचे प्रदर्शन करून त्याच्या मनात दहशत उत्पन्न करणे दोघांच्या जीवनाला सुखाचे ठरले नसते. दुसरी गोष्ट ती देवी होती म्हणूनच सामान्य स्त्रीला वाईट जाचक वाटणाऱ्या गोष्टींची तिने कधीच फिकीर केली नसावी. शक्तिशाली व्यक्तीच्या अंगी अशक्तापेक्षा जास्त सहनशक्ती असावीच लागते. तिसरी गोष्ट, केतकीने ज्या बळाचा प्रयोग बैलावर करून दाखवला त्या बळाचा प्रयोग तिने आपल्या पतीवर केला असता तर तो लंगडा, लुळा व निस्तेज होऊन गेला असता. मग तिचा संसार कधीच सुखाचा झाला नसता. म्हणून आपल्या शक्तीची कल्पना करून देण्यासारखा प्रसंग येईपर्यंत केतकी सर्व सहन करीत गेली. त्याला स्वतः धडा देण्याऐवजी तो स्वतःच धडा घेईल असा प्रसंग अनायासे घडून आला."
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंग होतांच बेताळ प्रेताबरोबर नाहीसा झाला आणि झाडाला जाऊन लोबंकू लागला.