मृत्यू देव
विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो झाडाजवळ येऊन पोचला, प्रेत खांद्यावर काढून घेतले आणि मौनपणे स्मशानांच्या दिशेने चालू लागला तेव्हा प्रेतात बसलेला बेताळ त्याला म्हणाला— "राजा! तुझे साहस वाखाणण्यासारखे आहे, पण लक्षात ठेव, मृत्यूशी असा खेळ केल्याचा परिणाम भोगावा लागतो. मृदुला नावाच्या एका सुंदर तरुण स्त्रीवर कसे कसे प्रसंग गुजरले हे तुला माहीत नसेल. मी तिची गोष्ट तुला सांगतो. लक्ष देऊन ऐक." असे सांगून बेताळ गोष्ट सांगू लागला.
एका दूर कोणत्या तरी देशात एका श्रीमंत कुटुंबात मृदुला नावाची एक मुलगी जन्मली. लहानपणापासूनच तिचे सौंदर्य पाहून शेजारपाजारची मंडळी, तिच्या वडिलांना म्हणत— 'तुमची मुलगी सामान्य माणसाला देऊ नका, बरं का! अहो स्वर्गातले देव तिला मागणी घालायला येतील.' वयाबरोबर तिच्या सौंदर्यात वाढ होत गेली आणि तिच्याशी विवाह करण्याच्या हेतूने थोर घराण्यातल्या तरुण मुलांच्या मागण्या येऊ लागल्या.
परंतु इतरांच्या तोंडी आपल्या सौंदर्याची वाखाणणी ऐकून मृदुलाचा गर्व वाढत गेला. म्हणून तिने थोरामोठ्यांच्या शब्दाला कधी मान दिला नाही. चांगली चांगली सांगून आलेली स्थळे नाकारली. तिच्या आईवडिलांनी कित्येक थोर कुटुंबातील मुलांना मुलगी दाखविली. त्यांनी मुलीला पसंत केले. पण मुलीसमोर आईबापांनी हात टेकले. पूर्वी तिच्या सौंदर्याची लोक वाखाणणी करीत, पण आता तिच्या गर्विष्ठपणाची निंदा होऊ लागली. आता कोणी मागणी घालायला येत नव्हता. मृदुलाचे घराबाहेर जाणे येणे देखील बंद पडले.
आईवडिलांना मुलीचे लग्न न झाल्यामुळे क्षणभर देखील चैन पडेनासे झाले. मुलीचे लग्न होऊ नये ही किती शरमेची गोष्ट आहे असे त्यांना वाटू लागले. एक दिवशी तिच्या आईने तिला प्रेमाने जवळ बोलावून विचारले— "काय ग, आता कसं? कोणी तुझ्याशी लग्नालाच तयार नाही!"
"आई! कोणी आलं नाही तर मृत्यू देवाशी तरी माझं लग्न होईलच. तो स्वतः चालून येईल आपल्या दारी. तू मुळीच काळजी करू नकोस." मृदुला म्हणाली.
त्याच दिवशी रात्री मृदुलाला झोप लागली नाही. ती अंथरुणावर तळमळत पडली होती. जरा गुंगी लागली असेल, तिला कोणीतरी तिचा हात धरल्याचा व 'मृदुला' म्हटल्याचा भास झाला. तिने डोळे उघडून पाहिले तर एक अप्रतिम सुंदर तरुण पुरुष समोर उभा होता. तो म्हणाला— "मी तुझ्याशी लग्नाच्या हेतूने आलो आहे."
मृदुलाला आश्चर्य वाटले. हा मनुष्य कोण बरे असेल, दार बंद होते तरी हा आत कसा काय आला? त्याला माझे नाव कसे कळले. हा मृत्यूदेव तर नसेल? तो विचाराने पायांपासून सरपर्यंत हादरली. सर्वांगाला घाम सुटला. तिच्या तोंडातून शब्दच उमटेना.
थोड्या वेळाने तो तरुण मनुष्य 'पुन्हा येईन' एवढेच सांगून निघून गेला. तो कोठे जातो हे पाहण्यासाठी मृदुला त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. तो मनुष्य गल्लीतल्या एका घरात शिरला. थोड्या वेळाने तो घराच्या बाहेर येऊन निघून गेला. तो गेल्यानंतर थोड्या वेळाने त्या घरातून रडण्याचा आवाज ऐकू आला.
ती मृत्यूदेवच होता याबद्दल मृदुलाला शंका उरली नाही. ती आपल्या घरी परतली. आपण मूर्खपणाने मृत्यूदेवाचे वरण केले, याबद्दल तिला आता पश्चात्ताप होऊ लागला. मृत्यूदेव वाटेल तेव्हा येऊन निश्चितच आपल्याशी विवाह करणार. परंतु ती गोष्ट आईवडिलांना तिने सांगितली नाही. जो प्रसंग येईल त्याला तोंड देण्याव्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही, असे तिने ठरविले.
एका आठवड्याने मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या खोलीच्या खिडकीबाहेरून तिला कोणीतरी हाक मारली. तिने अंथरुणावरून उठून खिडकीत जाऊन पाहिले, तोच तरुण होता. त्याने तिला विचारले— "तू त्या दिवशी माझ्या पाठीमागून काय पाहिलेस?"
"मी काही नाही पाहिले!" मृदुला म्हणाली.
"खरे बोलली नाहीस तर एका आठवड्यात तुझ्या वडिलांना मरण येईल." तो तरुण मनुष्य म्हणाला.
"मी खरेच काही पाहिले नाही." मृदुलाने तेच उत्तर पुन्हा दिले.
तो तरुण मनुष्य निघून गेला. त्याने सांगितल्याप्रमाणे बरोबर एका आठवड्याने खरोखरच मृदुलाचे वडील निवर्तले. तिच्या बापाला तिच्यामुळेच मरण आले हे ओळखून ती खूप रडली.
पुन्हा एक दिवशी तो तरुण आला आणि मृदुलाला हाक मारून खिडकीजवळ उभा राहिला. मृदुलासमोर येऊन उभी राहिल्यावर त्याने तिला तोच प्रश्न केला— "तू त्या रात्री काय पाहिलेस?"
काय उत्तर द्यावे हे तिला सुचेना. तो मृत्यूदेवच आहे की आणखी कोणी हे कसे ठरवायचे? तिला कळेना. म्हणून ती म्हणाली— "खरोखरच काही नाही पाहिले."
बरोबर एका आठवड्याने मृदुलाची आई मेली. मृदुलाला आपला असा आता कोणी उरला नाही. ती आईवडील गेल्याच्या दुःखात करीत पडली असतां एक दिवशी रात्री त्याच मनुष्याने खिडकीतून तोच प्रश्न विचारला. म्हणाला— "आता तरी खरे सांग, तू त्या रात्री काय पाहिलेस?"
या वेळी मृदुला गप्प बसून राहिली. काही बोलली नाही. दुसऱ्या दिवशी ती मरण पावली. शेजार पाजारच्या मंडळींनी तिचा देहसंस्कार केला आणि तिची चिता होती त्या जागी एक समाधी बांधली. त्या समाधीवर एक झेंडूचे झाड उगवले. त्याला एक सुंदर फूल लागले. त्याच दिवशी एक राजकुमार आपल्या मित्रमंडळीबरोबर त्या बाजूने जात असतां त्याची नजर त्या फुलांवर गेली. ते त्याने फूल तोडून आणून आपल्या झोपण्याच्या खोलीत फुलदाणीत ठेवले.
त्या दिवशी रात्री झोपण्याच्या वेळी नित्याप्रमाणे दूध पिण्यासाठी त्याने दुधाचा पेला हातात घेतला. पण तो रिकामा पाहून राजकुमार थक्क झाला. त्याला काहीच समजले नाही. आपल्या खोलीत शिरून दूध पिण्याची हिम्मत कोणी बरे केली असावी? दोन दिवस लागोपाठ असेच कोणीतरी दूध पिऊन जात असे. पण चोर सापडला नाही. स्वयंपाकघरात देखील कोणी खाऊन पिऊन गेल्याचे दिसून आले.
तिसऱ्या दिवशी राजकुमाराने नित्यापेक्षा थोडे आधी दूध मागवून आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवायला सांगितले. पण तो दूध प्याला नाही आणि टेबलावर तसेच राहून देऊन त्याने झोपेचे सोंग केले. थोड्या वेळाने बांगड्यांचा व चालतांना पाताळाचा आवाज होतो तसा आवाज ऐकूून पाहिले तर ज्या जागी झेंडूचे फूल होते त्या जागेवरून उठून एक सुंदर स्त्री दूध प्यायला जात असल्याचे दिसले. ती दूध पिून स्वयंपाकघराच्या बाजूला जाऊ लागलेली पाहून राजकुमाराने तिचा हात धरला आणि गोड आवाजात विचारले— "कोण तू आणि झेंडूच्या फुलाच्या रूपाने तू किती दिवसांपासून आहेस?" तेव्हा मृदुलाने आपली जन्मकथा थोडक्यात सांगितली.
"मृत्यूदेवाशी तुझे लग्न झाले नाही ना? मग मी तुझ्याशी विवाह करून घेण्यास तयार आहे." राजकुमार मृदुला म्हणाला.
राजकुमाराने, आपल्या आईवडिलांना व आपल्या इतर नातेवाईकांना मृदुलाशी लग्न करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. मृदुलाचे रूपलावण्य पाहून राजकुमाराच्या नशिबाची सर्वांनी वाखाणणी केली. दोघांचा विवाह थाटामाटाने पार पडला. यथासमयी राजकुमार राजा झाला व मृदुला राणी झाली. त्यांच्या कारकीर्दीत त्यांची प्रजा सुखी झाली.
येथवर गोष्ट सांगून बेताळ म्हणाला— "राजा! मृदुलाला इतके कष्ट देऊन शेवटी मृत्यू देवतेने तिला योग्य पति कसा काय दाखविला आणि तिला सुखपूर्वक कां जगू दिले? या प्रश्नाचे उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर परिणाम तुला माहीतच आहे, तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर लोळू लागतील."
ते ऐकून राजा विक्रमादित्य म्हणाला— "मृत्यू देवतेचे मृदुलाशी वैर होते असे सांगता येत नाही. उलट त्याने मृदुलाचे हितच केले असे नाही का वाटत? तिच्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे ती दुःखी झाली ही गोष्ट खरी आहे. परंतु तिच्याशी विवाह करण्यास मृत्यूदेव येईल हे ती म्हणाली होती, तें तिचे म्हणणे खरे ठरले. मृत्यूदेव मृदुलाला घेऊन गेला. परंतु ठरलेल्या पेक्षा आधी आयुष्य संपविण्याची शक्ती प्रत्यक्ष मृत्यू देवतेला सुद्धा नाही, हे सिद्ध झाले. आईवडिलांचे जेवढे आयुष्य होते तेवढे उपभोगणे त्यांना शक्य झाले आणि त्यांना जो मृत्यू आला तो त्यांचे आयुष्य संपुष्टात आल्यावरच आला असे मानावे लागते. तरी मृदुलाला पश्चात्ताप करावा लागावा, तिचा घमेंडखोरपणा कमी करावा या हेतूने मृत्यूने तिच्या आईवडिलांना अकाली ओढून नेल्यासारखे दर्शविले. वस्तुतः मृदुलाचा मृत्यूच अकाली झाला होता. म्हणून तिला पुन्हा जिवंत होण्यासारखी परिस्थिति मृत्यू देवतेने निर्माण केली होती. त्याच्याच प्रयत्नाने तिला योग्य पती मिळाला आणि त्याच्याच इच्छेने तिचे विवाहित जीवन सुखी झाले."
अशाप्रकारे राजाचे मौन भंग होताच बेताळ प्रेतांसह अदृश्य झाला आणि झाडाला जाऊन लोंबकळू लागला.