देव तारी त्याला कोण मारी
विक्रमार्काने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा परतला व झाडावरचे प्रेत खांद्यावर काढून घेऊन स्मशानाकडे निघाला. तेव्हा प्रेतात बसलेला बेताळ त्याला म्हणाला— “कठीण काम करण्याचंच तू ठरविलेले दिसते आहे. परंतु तू एक गोष्ट विसरलास. कदाचित तिकडे तुझे लक्ष गेले नसेल. अरे, कित्येकदा लहानसहान कामे करणे देखील अशक्य होते. ही गोष्ट तुला कदाचित पटणार नाही. म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. तुझा थकवा पण, थोडा का होईना, कमी होईल.” असे सांगून त्याने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
एक राजा होता. एकाएकी त्याला मरण आले. त्याला एकुलता एक मुलागा होता,—अगदी तान्हा मुलगा. पण तोच बापाचा वारस असल्याने त्या देशाचा राजा झाला.
राजाला एक भाऊ होता. राजा मेल्यावर स्वतः गादी बळकावण्याची जबर इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली. पण युवराजाचा कांटा दूर केल्याशिवाय त्याला ते शक्य नव्हते. म्हणून गुप्तपणे त्याचा वध करण्याचे त्याने ठरविले. पण तान्ह्या मुलाचा वध करणे देखील त्याला वाटत होते तितके सोपे नव्हते.
त्याने एका परदेशी माणसाला त्या कामावर नेमले. त्याने त्याला राजमहालांत एका गुप्त स्थानी लपून बसायला सांगितले. नंतर त्याने युवराजाच्या खोलीच्या दरवाजावर एक खूण करून ठेवली. युवराजाची दाई व दासी सर्वांना काहीतरी निमित्त काढून दूर पाठवून दिले. नंतर त्याने मारेकऱ्याला युवराजाच्या खोलीत पाठविले. मारेकऱ्याने युवराज तेथे एकटा आहे. जा, आटप! आणि हे तुझे बक्षिस!” असे सांगून त्याच्या हातांत एक पिशवी दिली.
मारेकरी तलवार घेऊन युवराजाच्या खोलींत शिरला. त्याला आंत राजा दिसला नाही. एक लहानसे रांगते मूल दिसले. त्या मारेकऱ्याला युवराज म्हणजे ते रांगते मूल असेल याची कल्पना नव्हती. मुलाच्या हातांत एक संत्रं होतं. तें खाली पडलं. तें घेण्यासाठी तो रांगत पुढे निघाला. मारेकऱ्याला पाहून मुलगा “ब” “ब” असे काही बडबडला. मारेकऱ्याने तें फळ उचलून त्याच्याकडे फेकले. तान्हा युवराज आनंदाने हंसूं लागले. मारेकरी स्वतःचे काम विसरून मुलाशी खेळू लागला. थोड्या वेळाने दासी परत आल्या व त्यांनी शिपायांना बोलावून मारेकऱ्याला कैद करविले.
चौकशी केल्यावर मारेकऱ्याने खरेखरे सांगून टाकले. म्हणाला—“राजाच्या वध करण्याचे मी आंत गेलो होतो. पण त्यांच्या जागी एका तान्ह्या मुलाला मी पाहिले.
शिपाई म्हणाले— “आमचे महाराज वारल्यानंतर हे युवराजच आमचे महाराज झाले आहेत.”
“असे होय! तर मग तें मी मालकांना जाऊन सांगतो.” मारेकरी म्हणाला. कोणी तरी वेडपट दिसतो आहे असे समजून शिपायांनी त्याला सोडून दिले.
आपला बेत फसला ही गोष्ट राजाच्या भावाला कळली. त्याने त्या मारेकऱ्याला भेटण्याचे टाळले. शेवटी कंटाळून जाऊन मारेकरी स्वदेशी निघून गेला.
राजाच्या भावाने आणखी एक प्रयत्न करून पाहायचे ठरविले या खेपेस त्याने चोरांच्या टोळीच्या एका सरदाराला बोलाविले आणि म्हणाला— “शिवरात्रीच्या दिवशी सर्व लोक सांबाच्या देवळात जातील. तुम्ही वाटेत कोठें तरी लपून रहा. त्यांच्यावर अकस्मात छापा मारून त्यांना लुटून घेऊन जा. त्यांच्या बरोबर एक गोरा मुलगा असेल. त्याच्या अंगावर जे दागिने असतील ते तुम्ही काढून नेलेत तर तुमचे आयुष्यभराचे दारिद्र्य कायमचे नाहीसे होईल. इतर कोणाला ठार करा किंवा करू नका, त्या मुलाला मात्र ठार करून टाका.”
कट ठरला. शिवरात्रीची जत्रा भरणार म्हणून लोक सांबाच्या दर्शनास निघाले. चोर झाडींत लपून बसले होते. दासी युवराजांना घेऊन देवदर्शनास निघाल्या. बरोबर कांही सैनिक पण होते. त्यांच्या पाठोपाठ चोरांची दुसरीच एक टोळी आली व संधी साधून त्यांनी शिपायांची कत्तल केली व सर्व दासींच्या अंगा खांद्यावर जे कांही सांपडले लुटून घेऊन गेले. युवराजांच्या अंगावरचे निवडक दागिने ते घेऊन गेले. मुलाच्या जिवाला मात्र काही अपाय झाला नाही. मुलाला वाटेल त्या एका धर्मशाळेत सोडून ते निघून गेले. युवराज तेथे बसून रडत होते.
थोड्या वेळाने एक दासी युवराजाला हुडकीत तेथे आली व युवराज सुरक्षित आहेत हें पाहून तिने देवाचे आभार मानले व त्यांना उचलून घेऊन राजवाड्यात परतली. अशा तऱ्हेने दुसरा कट पण फसला.
परंतु राजाचा भाऊ हताश होऊन बसला नाही. त्याने स्वयंपाक्याला पैसे चारून मुलाच्या दुधात विष घालून द्यायला सांगितले. स्वयंपाकी धनलोभाने ते नीच कर्म करण्यास कबूल झाला. त्याने एका पेल्यांत विष घातलेलं दूध आणून युवराजांना प्यायला देण्यासाठी दासीला आणून दिले. युवराज पेला लावून दूध पिणार एवढ्यांत दासीला शिक आली. युवराज त्यामुळे दचकले व त्यांच्या हातांतून तो पेला सुटला.
अशा तऱ्हेने राजाच्या भावाचा तिसरा प्रयत्न पण फुकट गेला. त्याने आणखी काय काय केलें असतें कोण जाणे? पण त्याच्या एका शत्रूने त्याचाच खून केला.
त्यानंतर युवराजांवर कोणत्याहि प्रकारचे संकट आले नाही. विसाव्या वर्षी त्यांचा रीतसर राज्याभिषेक झाला व त्यांनी आपल्या प्रजेला सुखी केले.
येथवर गोष्ट सांगून बेताळाने विचारले— “राजा! माझ्या मनात एकच शंका आहे. त्या एका तान्ह्या मुलाला ठार करण्यासाठी इतका खटाटोप करण्याची गरजच नव्हती. त्या एवढ्याशा मुलाचा गळा दाबून मारून टाकणें देखील राजाच्या भावाला अशक्य नव्हतें. पण तो होता भितरा असेंच म्हणावे लागेल. राजा होण्याची एवढी इच्छा असूनहि तीन-तीन प्रयत्न करून देखील त्याला तान्ह्या युवराजांचा कांटा दूर करतां येऊ नये, हें खरोखरी आश्चर्यच आहे. पण ही शक्य गोष्ट अशक्य का ठरली? ह्या प्रश्नाचे उत्तर माहीत असून तू दिले नाहीस तर तुला परिणाम माहीतच आहे! तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायांवर आदळतील!”
विक्रमार्क म्हणाला— “मुलाचे शैशव हेंच त्याच्या रक्षणास मूळ कारण झाले. समुद्राच्या लाटेने किंवा पुरांत मोठमोठी झाडे कोलमडून पडतात. पण गवत किंवा शेवाळ यांच्या अंगाला यत्किंचितहि धक्का लागत नाही, हें तू पाहिलेंच आहेस. रथाच्या चाका खाली दगड आणि गोटे फुटून चूर होऊन जातात. पण मातीला कांही त्रास होतो का? युवराज लहान होता म्हणूनच वाचला असे मला वाटते. तो मोठा असता तर कधींच वाचला नसता. लहानपण हें ईश्वराचे वरदान आहे.”
अशा प्रकारे राजाचे मौन भंग होतांच बेताळ प्रेताबरोबर नाहीसा झाला व पुन्हां झाडाच्या फांदीला जाऊन लोबंकू लागला.