प्रकरण ७
पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.
“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी आहे ही.तू मला थांबवू शकशील असं मनातही आणू नको.”
“ मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवले आहेत.सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे.खाली टाक ते आणि विचार कर शांतपणाने.” –पलाश
“ खाली टाकण्यासाठी मी ते हाहात घेतलेलं नाहीये.हा समोर आहे ना वज्र किंवा नाव काय शीर्ष सहानी, याला विचार.माझ्या रिव्हॉल्व्हर नेम कधीच चुकत नाही.”-सांझी
तिने वज्र कडे रोखून पाहिलं.तो ही तिच्याकडेच पाहात होता.पलाश पुन्हा हळूहळू पुढे यायला लागला तसं सांझीने एक गोळी पलाशच्या दिशेने झाडली. ती त्याच्या पायाजवळून जमिनीवर आदळली. पलाश आहे तिथेच थबकला.
“पलाश तुला मी जिवंत सोडलाय. पुढची गोळी छातीत असेल.माझा नाद करू नकोस. वज्र, ती बॅग घेऊन या ट्रक मधून खाली उतर आणि ती तिथे समोर ठेव.”
पलाश ची सांझीने पुन्हा एकदा फसवणूक केली होती.जी वेळ सांझी कडे होती, तो थोडा वेळ तिला मिळाला होता पण तिचा बेत फक्त पैसे घेऊन पळून जायचा नव्हता तर पलाश ला पण खड्ड्यात घालायचं तिचा प्लॅन होता. तिने त्या रिव्हॉल्व्हरचा वापर करून पलाश ला चूप बसवलं होतं.
“वज्र, तू पळू नकोस माझ्याकडे तुला देण्यासारखे खूप काही आहे पण सध्या ही बॅग मला महत्त्वाची आहे.पलाश, तू आता पोलीस स्टेशनला गेलास तरी तुला काही फायदा होणार नाही कारण हा सगळा भंगार माल चोरीचा आहे हे जगाला माहित आहे आणि ती विठ्ठलची हत्या सुद्धा तुझ्याच नावावर आहे.” सांज हसत म्हणाली.
वज्रला आता कळून चुकलं होतं की सांज ही केवळ एक सुंदर स्त्री नव्हती तर ती अत्यंत चलाख आणि धोकादायक होती.तिने विठ्ठलला पलाशच्या हातून मारायला भाग पाडलं होतं आणि आता पलाशवरच तो आळ आणला होता.
पलाश असहाय्यपणे कोलमडून पडला आणि सांज ती पैशांची बॅग घेऊन जंगलाच्या दिशेने पळायला लागली. वज्रने तिच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला कारण तिला पकडणं आता आवश्यक होतं.