प्रकरण ६
रात्रीचे पावणे दोन वाजले होतं वज्र अजूनही तिची वाट बघत पेट्रोल पंपा जवळ एक खुर्ची टाकून बसला होता हातात सिगरेट पेटवून त्याचे झुरके घेण्यात मग्न होता. कोणतीच वाहनं आता येत नव्हती.
अचानक त्याला ती बाहेर आलेली दिसली. आपण नेमकं कुठे बसलो हे तिला कळावं म्हणून हातातल्या सिगरेटची ठिणगी तिला दिसेल अशा पद्धतीने त्याने हात हलवला. ती त्याच्या शेजारी येऊन खुर्चीत बसली.
"तू गोंधळात टाकलंस मला" ती म्हणाली.
"का?" त्याने विचारलं.
"सकाळी विठ्ठल जे काही बोलला त्यावर तू काहीच विचारलं नाही किंवा मला काही विचारलं नाही, का?" तिने विचारलं.
"मला ते जाणवलं होतं की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय पण मला ते विचारणं योग्य वाटलं नाही कारण मी इथे फक्त कामासाठी आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासाठी नाही" वज्र म्हणाला.
तिने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या कामाबद्दल बोलायला लागली.
"पलाश खूप भोळा आहे त्याला विठ्ठल कडून किती धोका आहे हे कळत नाहीये" ती म्हणाली.
"धोका? कसला धोका?" वज्रने काळजीने विचारलं.
"विठ्ठलला हा पेट्रोल पंप हवाय आणि त्याला ते भंगाराचं गोडाऊन सुद्धा ताब्यात घ्यायचं आहे. त्यासाठी तो काहीही करू शकतो." सांज सांगितले.
"पण पोलीस स्टेशन?" वज्रने विचारलं.
"पोलीस स्टेशन? इथे जवळच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये विठ्ठलची ओळख नाही असं नाही आणि पलाशच्या विरोधात तो काहीही खोटं नातं रचू शकतो." सांज उदासपणे म्हणाली.
वज्रला आता कळलं होतं की विठ्ठल आणि सांझी यांच्यातली ती चर्चा केवळ संवाद नव्हता तर विठ्ठल तिला कशा पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता.
"विठ्ठल पलाशच्या कोणत्या तरी गुपित बद्दल तुला सांगत होता का?" वज्रने पुन्हा एकदा विचारलं आणि या वेळी सांझी रडायला लागली.
"पलाशने एका ट्रक ड्रायव्हरचा खून केलाय असं विठ्ठलचे म्हणणं आहे आणि त्या ट्रक मधलं भंगार त्याने आपल्या गोडाऊनमध्ये लपवून ठेवलय असं विठ्ठल सांगतोय." ती हुंदके देत म्हणाली.
वज्रला धक्का बसला.पलाश जसा दिसत होता तसा तो नसावा का? पण त्याने लगेच सावरून घेतलं.
"तू काळजी नको करू सांज, मी या प्रकरणाचा शोध लावीन आणि पलाशला विठ्ठलच्या तावडीतून सोडवीन." वज्र तिला धीर देत म्हणाला.
दोघेही बराच वेळ तिथेच बसून राहिले आणि पहाटेची लक्षणं दिसायला लागल्यावर आपापल्या जागी गेले.