प्रकरण ५
एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे पाहण्यासाठी. सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती.
“ गुड मॉर्निंग ” वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.
“ मी मदत करू का तुम्हाला?” त्याने पुन्हा विचारलं.
“ मला लागलं तसं काही तर सांगेन मी.” तुटकपणे ती म्हणाली.
“ मला चहा हवा होता.” वज्र म्हणाला.
“ बाहेर बस.” पण तिने चहा आणून दिला आणि बरोबर दोन बिस्किटे पण आणली होती.
चहा घेतला आणि वज्र आपल्या कामासाठी बाहेर आला.एवढ्यात सांझी सुद्धा बाहेर आली. तिने आपलं आवरलं होतं.
“ तू इथेच आहेस ना आज?” तिने विचारलं.
“ हो.पलाश ने सांगितलंय तसं.” वज्र म्हणाला.
“ आम्ही दोघं बाहेर चाललोय.” ती एवढंच म्हणाली.पलाश सुद्धा बाहेर आला.
“ काही लागलं तर सांग आणि कोणाला ओळखीच्यां व्यतिरिक्त इथे रात्र पाळीला सोडू नकोस.” पलाशने बजावलं.
आज काहीतरी खूप मोठं मार्केट आहे म्हणून ते दोघं तिकडे गेले होते.दुपारी दोन पर्यंत वज्रने एक गाडी धुतली.तिघांना जेवायला दिलं जे स्वतः सांझीने बनवून ठेवलं होतं.साधारण चार-सव्वा चार च्या सुमारास पलाश आणि सांझी परत आले. गाडी भरून सामान आणलं होतं.वज्रने ते सगळं सामान उतरवून किचन मधे नेऊन दिलं.
“ थँक यु शीर्ष.” सांझी प्रथमच त्याच्याशी नाव घेऊन आणि गोड आवाजात बोलली होती.
“ वेलकम.सांझी.” वज्र देखील ओघान म्हणाला.
पण हे संवाद पेट्रोल पंपा पलीकडे जे टपरी वजा हॉटेल होतं तिथे बसलेल्या एका माणसाने पाहिले होतं.त्याचे नाव विठ्ठल होतं. तो पंपावर हवा भरायला किंवा तसंच बसून राहायला अधून मधून येत असे.सांझीशी त्याचे ओळखीचे संबंध होते पण पलाशचा तो मित्र नव्हता.
संध्याकाळी सहा वाजता पलाश कडे कोणाची तरी गाडी आली म्हणून तो बाहेर गेला.सांझी रेस्टॉरंट मधे होती.वज्र सर्विसिंग च्या कामात होता.एवढ्यात विठ्ठल पंपावर आला. त्याने सांझीला हक मारली.
“ सांझी, जरा इकडे येते का?”
सांझी बाहेर आली. तिने विठ्ठल कडे बघितलं आणि पुन्हा आत जायला निघाली.
“ अग ऐक तरी.तो माणूस कोण आहे?” विठ्ठलने वज्रकडे बोट दाखवून विचारलं.
“ तो आमचा कर्मचारी आहे.” ती तोऱ्यात म्हणाली.
“ पगार किती देतोय तुझा नवरा त्याला?”
“ तुला काय करायचंय?”
“ हे बघ पलाश असाच अचानक बाहेर गेलाय आणि तू इथे एका परक्या माणसासोबत आहेस हे काही चांगलं नाही.” विठ्ठल म्हणाला.
हे ऐकून सांझी कडून काहीतरी उत्तर मिळेल अशी वज्रची अपेक्षा होती पण ती काहीच बोलली नाही. विठ्ठल हळूच तिच्या कानात काहीतरी म्हणाला आणि तिथून निघून गेला.
सांझीच्या चेहऱ्यावर आता चिंतेच्या अनेक रेषा उठल्या होत्या. ती सरळ आत गेली.वज्रला हे सगळं खूप विचित्र वाटलं पण त्याने तिकडे दुर्लक्ष केलं.रात्री पलाश परत आला तेव्हा तो खूप खुशीत होता.त्याने वज्रला सुद्धा जेवायला बोलावलं.
“ काय झालं सांझी? विठ्ठल आला होता का?” पलाश ने सहज विचारलं.
सांझीने होकारार्थी मान हलवली.
“ काय म्हणाला?” पलाश.
“ काही नाही. सहज चौकशी करत होता.” तिने पुन्हा एकदा तोच तुटकपणा दाखवला आणि पलाश शांत झाला.
रात्री झोपताना वज्रच्या मनात विठ्ठल आणि सांझीचं ते बोलणं सतत येत होतं.विठ्ठल नक्कीच काहीतरी वाईट विचार सांझीच्या मनात भरवत होता.वज्रने स्वतःशीच ठरवलं की आपण सावध राहायला हवं.